!!! बहिर्जी नाईक !!! भाग ६ ते १०
बहिर्जी नाईक भाग १ ते ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
भाग - ६.
कान्होजी पुढे सांगू लागले... "दीड वर्षापासून नावाडी वेष बदलून विजापूर दरबारी आहे. तिथे त्याची भेट झाल्यास तो तुझ्या कामी येऊ शकतो."
"पण, मी त्याला ओळखणार कसा?" "त्याच्या कपाळावर उजव्या बाजूने जखमेची मोठी खूण आहे." पण एवढ्याश्या खुणेवरुन एवढ्या मोठ्या दरबारात त्याला ओळखणे कठीण होते.
दुसर्या दिवशी सकाळी दोघेही विजापूर दरबारी पोहचले.
कान्होजींच्या ओळखीच्या मौलवीकडून दौलतरावांच्या इस्लामिक शिक्षणाची सोय केली. नंतरच्या दोन वर्षात दौलतरावांनी पूर्णतः इस्लामिक धर्म अंगिकारिला होता. नगरापासून कांही अंतरावर असलेल्या दर्ग्यात रहीमबाबा नाव धारण करुन ते रहात होते. कान्होजींनी त्यांस स्वराज्याच्या गुप्तहेर पथकाचा प्रवास कसा सुरु करायचा याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काम पूर्णत्वास न्यायचे होते. पण तत्पूर्वी त्यांना एक फार मोठे महत्वाचे काम पार पाडायचे होते.
अंधारकोठडीतील एका कैद्याची दौलतरावांना सुटका करायची होती. त्यासाठी त्यांनी तिथल्या पहारेकर्याच्या मदतीने तुरुंगातून निघणार्या घाणपाणी वाहून नेणार्या नाल्यातून त्या कैद्याच्या कोठडीतील संडासापर्यंत केवळ हातांच्या बोटांच्या नखांच्या सहाय्याने भुयार खोदले होते. आज त्याची सुटका करायची होती. तुरुंंगाच्या एका पहारेकर्याला भरपूर धन देऊन फितवले होते. त्याने कैद्यापर्यंत निरोप पोहचवला होता.
नेहमीप्रमाणे दौलतराव भिक्षा मागण्यास निघाले होते. अंगात हिरव्या रंगाचा ढिला कुर्ता, कमरेला निळी लुंगी, डोक्यावर हिरवा फेटा, एका हातात मोरपिसांचा गुच्छ (मोरचेल); दुसर्या हातात मातीच्या भांड्यात धुनी पेटलेली, डोळ्यात सुरमा, वाढलेल्या दाढीमिश्या अशा वेषात ते नगर परकोटाच्या आंतल्या बाजूस असलेल्या प्रत्येक दुकानासमोर उभे राहून धूर सोडत होते. दुकानदार कांहीना कांही त्यांच्या झोळीत टाकत होते. असे करत करत परकोटाजवळ पोहचले आणि फितवलेल्या पहारेकर्याच्या सहाय्याने तुरुंगातून निघालेल्या मल-विसर्जनाच्या नाल्याजवळ येऊन थांबले आणि त्या घाणीभरल्या नाल्यातून खोदलेल्या भुयारातून हळूहळू कैदी बाहेर आला.
एवढा महत्वाचा कैदी होता कोण? ज्याच्यासाठी रात्री रात्री जागून हळूहळू नखांनी पोखरुन भुयार बनविले होते. तो होता त्यांच्या गुरुदेवांचा मित्र नावाडी!
कान्होजीनींच नावाड्याला विजापूर दरबारी आचार्याची जागा मिळवून दिली होती. तोही संयमपूर्वक विजापूरच्या सैन्यात वावरत होता. एके दिवशी ज्या सरदार नदीममियांने त्याच्या कुटुंबाची निर्दयपणे वाताहात केली होती तो त्या नावाड्याला दिसला. त्याच रात्री त्याच्या जेवणात विष घालून त्याने या सरदाराला ठार केले. चौकशीअंती तो पकडला गेला व तीन वर्षे यातनामय कैद आणि मृत्युदंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच नावाड्याची सुटका दौलतरावांनी अत्यंत गुप्तपणे, अविरत परिश्रम घेऊन केली होती.
आतां रहिमबाबा उर्फ दौलतरावांचे विजापूरातील काम संपले होते. इस्लामिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. सह्याद्रीत राहून त्यांच्याच तोडीचे निडर, धाडशी, कुशाग्रबुध्दीचे युवक हेरुन त्यांना प्रशिक्षित करायचे होते. त्या आधी त्यांचे आराध्य दैवत शिवाजी राजेंना भेटण्याचे वेध लागले होते. त्यांचेपासून दूर राहणे फार पीडादायक होते, पण भविष्यासाठी सवय करुन घ्यावी लागणार होती. कारण त्यांचे कार्य दरबारात नाही तर शत्रूगोटात राहून करायचे होते.
दौलतराव आपले कार्य पूर्णपणे जाणून होते.
"उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता -- जिस मुल्क की सरहद की निगेहबान है आंखें।" आणि याचसाठी आता त्यांना असे डोळे तयार करायचे होते. देवराज इंद्राला "सहस्राक्ष" म्हणजे सहस्र नेत्र होते असे म्हणतात. यामुळेच तो सगळीकडे नजर ठेवून दक्ष असे. *** आणि या दौलतरावानी तर सहा हजार डोळे (तीन हजार हेर) तोडीस तोड असे तयार केले -- हे वर्णन पुढे येईलच. असो.
शिवाजीराजांच्या ओढीने अत्यन्त अधीरतेने ते झपाझप पावले टाकीत त्याच पेहरावात पुण्याकडे निघाले. रस्त्यात एका ओढ्याजवळ पाणी पिण्यासाठी थांबले असतां, घोड्यासह एक विजापुरी स्वार दिसला. रहिमबाबा उर्फ दौलतरावांनी त्यास क्षणात ओळखले की हा सैनिक नसून संदेशवाहक आहे. रहिमबाबाने आपल्या मिठ्ठास बोलण्याने त्याचे बरोबर दोस्ती केली. त्या स्वार मित्राने आग्रह करुन घोड्यावर बसून चालण्याचा आग्रह केल्यामुळे दोघेही घोड्यावर बसून निघाले. बोलण्यातून दौलतरावांना समजले की शिरवळला जाऊन बाजी घोरपडेने पुण्याला ससैन्य जाऊन आक्रमण करायचे; हा आदिलशहाचा संदेश घेऊन तो स्वार निघाला होता. पुण्यावर मोठे संकट उद्भवणार ही महत्वाची खबर आता पुण्याला लवकरात लवकर जाऊन राजेंना पोहचवणे आवश्यक होते. थोड्याच वेळात दोघेही भीमानदी काठी पोहचले. तो स्वार नदीपार करुन शिरवळकडे निघाला आणि रहिमबाबा उर्फ दौलतराव आजची रात्र मुक्काम करण्यासाठी त्या नावाड्याच्या झोपडीकडे वळले.
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ७.
झोपडीजवळ येऊन दौलतरावांनी आपली ओळख दिल्यावर नावाड्याने त्यांना आदरपूर्वक झोपडीत आणले. त्यांचे पायावर नतमस्तक होऊन भरल्या नयनाने म्हणाला,
"तुमच्यामुळे माझे प्राण वाचले. हे उपकार आजन्म विसरु शकत नाही. हे प्राण आतांपासून तुम्हाला अर्पण!" त्याला प्रेमाने उठवत दौलतराव म्हणाले,
"मी निमित्तमात्र आहे, खरे तुला बाहेर काढले शिवाजी महाराजांनी. फार महान आहेत ते. त्यांना आपल्या मराठी माणसांसाठी मराठी राज्य स्थापन करायचं आहे, जिथे कुणावर अन्याय होणार नाही, आयाबहिणींची अब्रू शाबूत राहील. त्यासाठी त्यांना हरहुन्नरी माणसांची गरज आहे. तुम्ही विजापूर दरबारी जे काम केले ते कोणी सामान्य व्यक्ती करुं शकत नाही. तुमची इच्छा असेल तर, स्वराज्य कार्यात महत्वाचे योगदान देऊ शकता."
"काय? मी?"
"बाबा! तुम्ही मला शिवाजीराजेंच्या प्रेरणेने तुरुंगाबाहेर काढले. हे उरलेले आयुष्य त्यांचेचरणी अर्पण आहे. तसही या धेय्यहीन जीवनात काय उरलं आहे? कुणसाठी जगण्याचं प्रयोजनच राहिलेलं नाही. सांगा काय करायचेय मला? सैन्यात भरती होऊ?"
"नाही. सैन्यासाठी पुष्कळ मिळतील पण तुमच्यासारखा माणूस गुप्तहेर पथकात असायला हवा."
"जमेल मला?"
"कां नाही? तुम्ही पत्नीच्या व भाऊबंदाच्या संहाराचा बदला घेण्यसाठी जसं कार्य केल तसंच कार्य करायचं आहे. फक्त स्वतःवर बेतल्याशिवाय कुणाची हत्या करायची नाही."
"ठरलं! शिवाजीराजेंना अर्पण केलेले हे शरीर कोणतेही कार्य करण्यास सिध्दआहे." प्रसन्न मुद्रेने नावाडी म्हणाला.
"बाबाऽ!"
"बाबा नाही. माझं नाव दौलतराव
आहे."
"आणि माझं नांव प्रताप कोळी!"
"प्रतापराव आधी तुम्हाला वेष बदलावा लागेल. आदिलशाही सैन्यातील कोणी ओळखले तर परत कारावासात जावे लागेल."
"पण दौलतराव, माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी पत्नीचा दाहसंस्कार करतो. तिला वचन दिले होते, तिची हत्या करणार्याचा वध केल्याविना दाहसंस्कार करणार नाही. असा निश्चय करुन एक ना एक दिवस तो हत्यारा सांपडेल या आशेने परत नाव चालवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी कान्होजींची मदत झाली आणि त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचवले."
त्याचे पत्नीवरील प्रेम बघून, दौलतरावांनी अंतर्मनात दाबून ठेवलेल्या प्रिय पत्नीची--शारदाची आठवण झाली. त्या दिवशी ते परतले नसल्यामुळे गरोदर पत्नीचे काय हाल झाले असेल. बाळ कसा दिसत असेल? नकळत आलेले अश्रू पटकन मागे परतवले. अश्रू स्वराज्याच्या हेराला शोभत नाहीत. प्रतापच्या सांत्वनासाठी ते झोपडी बाहेर पडले. प्रथम राजेंना बाजी घोरपडेच्या आक्रमणाची खबर देऊन नंतर शारदेला भेटायचे ठरविले.
दौलतराव लाल महालाजवळ पोहचले आधीपेक्षा लालमहालाबाहेर सैन्य बंदोबस्त वाढलेला दिसला. राजेंनी पुण्याच्या कारभाराची घडी नीट बसवली होती. दिवसेंदिवस जनतेच्या मनातील भीती कमी होऊ लागली होती. राजे स्वतः वतनातील न्यायनिवाडे करुन जनतेला दिलासा देत होते. एक दिवस एका स्रीचा निवाडा राजांच्या समोर आला. तिला सासरकडून मानसिक छळ होत होता. राजानी काय केले? तर त्यांनी तिच्या कडून राखी बांधवून घेतली. हेतू हा की, तिचे खचलेले मनोबल; शिवाजी राजासारखा पाठीशी भाऊ आहे या विचारानेच उंचावले होते आणि शिवाजीच्या बहिणीला त्रास देतांना सासरच्या मंडळींना दहा वेळा विचार करावा लागेल.
दौलतराव लाल महालाबाहेर पोहचले तेव्हा त्यांचा वेष रहिमबाबाचाच होता. पहारेकर अदबीने म्हणाला,
"बाबा, सध्या राजेंना भेटतां येणार नाही."
"कां? मी फकीर आहे म्हणून? साधू असतो तर भेटू शकलो असतो का? " त्यांनी मुद्दामच डिवचले.
"तसं नाही बाबा, सकाळपासून न्यायदानाचं काम करुन राजे थकले असतील..."
तेवढ्यात शिवबांचा बालमित्र नारायणराव बाहेर आला. दौलतरावांनी त्यांना ओळखले; पण नारायणराव नाही ओळखू शकले. करड्या आवाजात त्याने विचारले,
"राजेंची भेट तुला कश्यासाठी हवीय ? तूं फकिराच्या वेषात शत्रूचा हेर आहेस."
"होय मी हेरच आहे."
नारायणरावाने त्यांचेवर झडप घालून त्यांचा गळा आवळू लागले.
"सांग येण्याचा हेतू ?"
"माझं कर्तव्य..."
वेदना असह्य होत होत्या. मग बाबाही आपले कसब दाखवू लागले. दोघांची झटापट चालू असतांनाच पहारेकर्याने बाबाला साखळदंडात जखडले. राजेंसमोर त्यांना हजर करण्यात आले.
"महाराज, हा शत्रूचा हेर आहे."
एवढे ऐकले मात्र ! तानाजी बाबांच्या अंगावर चवताळून गेले. रहिमबाबाचे लक्ष मात्र कुणाकडेच नव्हते, मंत्रमुग्ध होऊन एकटक राजेंकडे बघत होते. दोन वर्षानंतर आपल्या इष्ट देवताचे दर्शन झाले होते. राजेंनी त्यांच्या नजरेतला प्रेमभाव ओळखून त्यांचे चेहर्यावर स्मित पसरले.
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ८.
रहिमबाबांची प्रेमार्द्र नजर पाहून राजेंच्या चेहर्यावर आलेले स्मित तानाजीच्या नजरेतून सुटले नाही. राजे म्हणाले ---
"तानाजी, फकीरबाबांना साखळदंडातून सोडवून त्यांना घेऊन तुम्ही खलबत खान्यात या." शिवाजींची साथ सावलीसारखी करणार्या तानाजींनी आता मात्र झटकन ओळखले फकीरबाबांना. दौलतरावांना ओळखले. त्यांच्याबद्दलची गुपितं तानाजींना माहीत होती. हे गुपितच राहावे म्हणून सदरेत ओळख न दाखवतां खलबत खान्यात यायला महाराजानी सांगितले.
शिवाजीराजे, स्वराज्याचे प्रथम शिलेदाराची बर्याच कालावधीनंतर भेट होईल म्हणून मंत्रणाकक्षात प्रतिक्षा करीत होते. तोच तानाजींसह रहीमबाबांनी प्रवेश केला. रहीमबाबाने राजेंना मुजरा घातला. "मुजरा नको दौलतराव गळाभेट द्या" म्हणत राजेंनी उठून दौलतरावांना मिठीत घेतले.
"काय रहीमबाबा विजापूरची काय खबर?"
"राजे, बाजीराव घोरपडे मोठ्या सैन्यासह पुण्यावर चालून येत आहे."
हे ऐकूनही राजेंच्या चेहर्यावर थोडीही चिंता नव्हती.यावरुन त्यांना बातमी आधीच कळल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नंतर तिघांची मसलत सुरु झाली. हेर कसे निवडून, पारखून पथकात दाखल करावे? त्या हेरांच्या परिवाराची व्यवस्था ठेवणे, हेरांची पूर्णतः गुप्तता राखणे, त्यांच्या परिवाराला सुध्दा माहिती नसावी, सांकेतिक भाषा, नांवे, त्यांची वेषभूषा त्यांच्या नावाशी विसंगत असावी, तसेच हेर कोणतेही बहुरुप घेऊ शकतील अशा सर्व प्रकारचे त्यांना प्रशिक्षण द्यावे.
पथकाचे नांव "बहिर्जी" ठेवण्याचे निश्चित झाले. तानाजींनी शंका विचारली, राजे "बहिर्जी हेच नांव कां निवडले?"
राजे म्हणाले, "बहिर्जी नावात पथकाचा अर्थ दडला आहे. बहिर्जीचा अर्ध आहे बहुरुपी हेर."
"कसे राजे?"
" 'ब' म्हणजे बहुरुपी, 'हीर' म्हणजे हेर आणि 'जी' म्हणजे राजांनी दिलेला सन्मान. हेर पथकाच्या प्रमुखाचे नांव असेल "बहिर्जी नाईक" आजपासून दौलतरावांचे सांकेतिक नाव असेल "बहिर्जी नाईक"! सदरेवर तुमची ओळख सरदार बहिर्जी नाईक म्हणूनच असेल."
"दौलतराव तुमचं तिसर्यांदा बारसं झालं. दौलतराव, रहीमबाबा आणि आतां बहिर्जी नाईक.. "खोडकरपणे तानाजींनी म्हटल्यावर दौलतराव म्हणाले,
"यानंतरची भेट होईल तेव्हा चौथे बारसे झालेलं असेल."
रामोश्याच्या दौलतचे आता स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख "बहिर्जी नाईक" म्हणून रुपांतर झाले होते. (बखरींमध्ये दौलतराव रामोशी यांचा उल्लेख दौलतराव जाधव असा देखील आहे.) शिवाजीराजेंनी हेरखात्याची संपूर्ण जबाबदारी बहिर्जी नाईकांवर सोपवली. राजे फक्त सल्ला देतील. बाकीचे सर्व निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचेय! इथे एक गोष्ट बघा --- राजांनी पूर्णपणे पारखूनच बहिर्जीना हा "स्वयं निर्णयाचा" हक्क; अधिकार आनंदाने बहाल केलाय. सर्वसाधारणपणे असे कोणत्याही राज्यकर्त्याने केलेले दिसत नाही. आम्हास वाटते की असा सन्मान पहिल्यांदाच आणि शेवटचा पण --- मिळवणारे बहिर्जी हे एकमेवाद्वितीय व्यक्तित्व होय !
बैठक संपली आणि राजें उठले; त्या बरोबर दोघेही उठून उभे राहिले. राजेंनी आपल्या दुशेल्यातील म्यानबंद कट्यार पुढे धरत बहिर्जीना म्हणाले,
"ही मौल्यवान कट्यार आमचे पिताश्री शहाजीराजेंनी आम्हाला दिली होती. आमची ही अत्यंत प्रिय कट्यार तुम्हाला माझेकडून भेट..."
दौलतरावांनी पुढे होऊन भक्तीभावाने ती कट्यार स्वीकारुन मस्तकाला लावली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या अरबी बनावटीच्या कट्यारीचे वेगळे वैशिष्ट्य होते. कट्यारीच्या मुठीवर दाब दिल्यास दुभंगून कात्रीत रुपांतर होऊन तिसरे धारदार पाते बाहेर येते त्यावर विषाचे लिंपण केलेले आहे. या विषाने शत्रू जिवंत राहू शकत नाही.
बहिर्जी भावनिक होऊन म्हणाले, "आजपासून या कट्यारीचे नाव "शिवतीर्थ" असेल. राजे, या कट्यारीच्या रुपाने तुमची उर्जा सतत माझे सोबत राहील."
"नाईक, तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीतच. तुम्ही या शिवबाचे आणि स्वराज्याचे तृतीय नेत्र, महान शक्ती आहात. तुम्हीच शिवाजी भोसले, तुम्हीच स्वराज्य आहात. तुम्ही या शिवाजीचे नुसते हेर नाही तर तीव्र दृष्टी आहात."
बहिर्जींनी वचन दिले,
"शत्रूची खडान् खडा माहिती आपल्याला कळवण्यात येईल हे या रामोश्याचे, बहिर्जीचे वचन आहे." राजे संतुष्ट होऊन म्हणाले, "हेरांची गुप्तता भेदणार नाही व बहिर्जी पथकाच्या खजिन्याची व्यवस्था गुप्त राहील. तुम्ही कामाला लागा."
आता बहिर्जी नाईकांना पत्नी शारदेच्या भेटीची ओढ लागली. रहीमबाबाचा वेष उतरवून सामान्य वेषात पण वाढलेल्या दाढी मिश्या तश्याच ठेवून वस्तीकडे निघाले. ते वस्तीतल्या बाभळीच्या झाडाला टेकून उभे होते अचानक शारदा समोर आली तर तिला काय उत्तर द्यावे या विचाराने ते अस्वस्थ झाले. दीर्घ श्वास घेऊन घराकडे जाण्यास पाऊल उचलले. ते आतां शिवरायांचे हेर नव्हते तर शारदेचे पती दौलतराव होते.
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ९.
शारदेला भेटण्यास बहिर्जी नाईक घराकडे निघाले, तोच एक कणखर आवाज त्यांच्या कानावर आला.
"कोण आहे रेऽ?"
बहिर्जींनी वळून बघितले तर तो त्यांच्या बालपणीचा जिवलग मित्र नीळकंठ होता. पण त्याने ओळखले नव्हते. त्याची थोडी मजा घेतल्यावर मात्र पटकन ओळखले.
"तूं दौलतरावच ना? अरे तूं जिवंत आहेस ?
तूं शिकारीला गेला होतास आणि दोन वर्षापूर्वीच वारलास ना? मग जिवंत कसा?"
"नाही रेऽ, मी फार मोठ्या कार्यास गेलो होतो."
नीळकंठ हा रामोशी नव्हता. तो होता एका श्रीमंत बापाचा मुलगा! पण त्याच्याबरोबर शिकारीला जात असे. रात्रंदिवस दौलतरावांबरोबर रामोशी वस्तीतच रहात असे.
"मला कां नाही नेलेस?"
"तुला माहीत आहे ना, तुझ्यासाठी मी पित्याच्या व्यवसायाला लाथ मारली होती?"
"रागावू नकोस. सांगतो सारे सविस्तर. तुला पण माझे बरोबर काम करण्याची संधी देतो. शांत हो! पण आधी माझ्या जेवण्याची व्यवस्था कर."
"पित्याने घरातून हाकलून दिल्यावर हेच माझे घर! इथूनच कोणाकडून मागून आणतो. "
"मला दुसरीकडून नकोय शारदेच्या हातचीच आणून दे."
हे ऐकून नीळकंठ गंभीर झाला. आशंकेने दौलतरावाने विचारले,
"काय झाले? सर्व ठीक आहे ना?"
"पतीचा मृत्यु झाल्याचे ऐकून ती फक्त कलेवर रुपात मुलगा दामोदरसाठी माहेरी जिवंत आहे. उद्याच भेटतो तिला."
"हो भेट, पण परत तिला नको सोडून जाऊस."
"जावे तर लागेलच, पण पुढे ती रडणार नाही याची काळजी घेईन."
शारदा जिवंत आहे हे कळल्यावर दौलतराव थोडे निश्चिंत झाले. मग नीळकंठला आपल्या कामाची थोडक्यात कल्पना देऊन विचारले,
"तुझी इच्छा असेल तर माझ्याबरोबर सहभागी होऊ शकतोस."
उखडून निळकंठ म्हणाला,
"तुला विचारायची गरजच कां पडली? अरेऽ, मी तुझी सावली. जिथे तूं तिथे मी! शिवाजीराजेंसाठी काम करण्याची संधी मिळते यासारखे दुसरे भाग्य ते कोणते?" भरल्या गळ्याने नीळकंठ पुढे म्हणाला,
"एवढ्या मोठ्या महत्वाच्या कामात तू मला सहभागी करुन घेत आहेस, मी कधीही तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."
"एखादेवेळी कदाचित तुझ्याकडून जर का तडा गेला तर, मित्र म्हणून मी तुला माफ करेनही पण स्वराज्य आणि राजेंच्या कामात चुकीला माफी नाही."
"दौलत, जिथे माणूस सर्वस्वी झोकून देतो तिथे मरणाची भीतीच उरत नाही, चुकण्याचा संभवच नसतो. मला धन, संपत्तीचा लोभ कधीच नव्हता. स्वतः साठी सारेच जगतात. यापुढे मी स्वराज्यासाठी जगेन."
दौलतरावास त्याच्यातील बुध्दीमत्ता, निडरता परिचयाची होती. तो सर्वथा उत्तम हेर होण्यास योग्य होता. मित्राच्या बोलण्याने दौलतराव भारावून गेले. म्हणाले, "पण आपली सोबत जास्त दिवस राहणार नाही. कदाचित वर्षानुवर्षे भेटूही शकणार नाही. दोघांच्या मोहिमा वेगवेगळ्या असतील. हरकत नाही. सोबत नसलो तरी कार्य एकच करत राहणार आहोत. एका महान राज्यासाठी खारीचा वाटा उचलणार आहे याचाच अभिमान आहे."
"पण इतकी विश्वासू, हरहुन्नरी, प्रतिभावंत माणसं शोधणार कशी?"
"नीळकंठा, हे कार्य एका दिवसाचे नाही. आतां आपण बीजारोपण केले की, हळूहळू त्याचे वटवृक्षात रुपांतर होईल आणि त्याच्या फांद्या लांब लांब पसरून; पारंब्या पसरुन शिवाजीराजेंपर्यंत पोहोचतील. हेरखातं म्हणजे स्वराज्यरोपण केलेला वटवृक्षच! हेर म्हणजे गगनात भरारी मारणारा 'बाज' पक्षी ! ठरलं !बाजपक्षी. वटवृक्ष हे बहिर्जी पथकाचे निशाण असेल."
किती सार्थ बोलत होते दौलतराव ? आणि हेच खरं नव्हे काय की -- लष्कराचा कणा म्हणजे गुप्तहेर ! जेवढी ही यंत्रणा सक्षम तेवढे विजयाचे गणित सोपे होत असते; विजयाची निश्चिती कमी वेळात होऊ शकते ?
बोलत बोलत दोघेही शारदेच्या माहेरच्या वस्तीजवळ आले. दुरुनच अतिशय कृश झालेली शारदा त्यांस दिसली. गर्भावस्थेत तिला किती यातना झाल्या असतील? शारदा अंगणातल्या चुलीवर भाकर्या थापत होती. तिचे गळत असलेले डोळे बघून, तिची आई म्हणाली,
"या वेळी अश्रू काढू नये, अपशकून होतो."
"आता कोणता अपशकून व्हायचा राहिलाय अजून ?"
"नाही मामी, अपशकून नाही! उलट आठवण काढली की, ती व्यक्ती समोर हजर होते." असे म्हणून दोघेही जवळ आले.
पतीचा आवाज ऐकून शारदा क्षणभर सुन्न झाली. काया थरथरु लागली. विश्वासच बसत नव्हता. पतीला डोळ्यात सामावून घेत डोळे घट्ट बंद केले. डोळ्याला धारा लागल्या. दौलतरावांची अवस्था सुध्दा वेगळी नव्हती.
शारदाचे वडिल समोर येत म्हणाले, "तुम्ही? कुठे गेला होता अशा परिस्थितीत पत्नीला टाकून?" शेवटी पत्नीने त्यांना थांबवले. शारदेला वाटले की आतां जाऊन पटकन मिठी मारावी.
पण - - - - - -
ती लगबगीने घरात जाऊन कपाळावर कुंकू रेखाटून बाहेर आली. तोवर दौलतरावांनी मुलाला जवळ घेतले होते.
"इतके दिवस होता कुठे?"
"मोगलांच्या तुरुंगात."
निळकंठाने चक्रावून त्याचेकडे बघितले, पण त्याच्या हजरजबाबीपणावर विश्वास होता. पण तुरुंगात कां.....
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - १०.
हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागले असेलच की; दौलतराव आपल्या कार्यासाठी हरहुन्नरी लोक कसे जमवीत होते. आता मूळ कथानक पुढे बघू .
दौलतरावांना त्यांच्या सासर्यानी मोगलांच्या तुरुंगात जाण्याचे कारण विचारल्यावर मनगढंत गोष्ट सांगून त्यांनी त्यांचे समाधान केले. रात्री गोडाधोडाचे जेवण झाले. सर्व निजानीज झाल्यावर, शारदेला एकांत मिळताच ती आपला रुसवा प्रगट करत म्हणाली,
"इतके दिवस कां नाही आलात? "
"अगऽ, तुरुंगातून कसा येऊ शकणार होतो?" पत्नीचे प्रगाढ प्रेम पाहून खरेच दौलतरांच्या डोळ्यात आलेले अश्रू बघून कावरी बावरी होत म्हणाली,
"मला कांही त्रास नाही. सुखात होते मी! पण तुमच्याशिवाय जगणे शक्य नाही. आतां नाही ना सोडून जाणार? आधी वचन द्या."
"आयुष्यात कधी काय घडेल, कोणाला सांगता येते? मग तुला कसे देऊ वचन? पण एक वचन नक्की देतो, यापुढे तुला व दामोदरला माझ्यामुळे एवढे दुःख होऊ देणार नाही." ती एकदम त्यांच्या कुशीत शिरली. सहा महिन्यानंतर....
बेलसरपासून कांही अंतरावर असलेल्या घनदाट जंगलातून नीळकंठ एकटाच चालला होता. दुपारची वेळ असूनही निर्धास्तपणे चालला होता . झाडी एवढी दाट होती की, सूर्याची किरणे जमिनीपर्यत पोहोचत नव्हती. चालत असतांना त्याला एक टेकडी दिसली. सावध नजरेने कुणी पाठलागावर नाही, याची पूर्ण खात्री केल्यावर ती टेकडी चढू लागला आणि अचानक कसलीशी सळसळ त्यास ऐकू आली. तो पटकन आडोश्याला झाला.समोरुन दोन माणसे येतांना दिसली. पिळदार देहयष्टी, आखूड धोतर, हातात कुर्हाड, गळ्यात काळ्या दोराचा गोफ एका खांद्यावर घडी केलेली काळी घोंगडी अशा वेषात ते येत होते. नीळकंठने लपवलेली कट्यार डोक्याच्या वरच्या झाडावरच्या फांदीवर आवाज होणार नाही ही दक्षता घेत रुतवली आणि त्याच कट्यारीच्या आधाराने तो झाडावर चढला. ते दोघे त्याच झाडाखाली येऊन पोहोचले. त्यातल्या एकाला जिथे कट्यार अडकवली होती तिथून चिकट पदार्थ स्त्रवतांना दिसला. त्याने वर बघितले तर वर कुणीच नव्हतं. कारण नीळकंठ दाट पानां च्या आड लपला होता.
"शंभो शिव हर हर..."! एक जण हळूच पुटपुटला. ही सांकेतिक खूण होती. याचा अर्थ हे दोघेही हेर होते. नीळकंठ सरसर झाडावरुन उतरुन त्या दोघांपुढे येऊन उभा राहिला. बहिर्जीच्या बेमालूम वेशांतरामुळे त्यांनाओळखता आले नाही. त्याने अगदी निरखून बघितल्यावर हळूच नीळकंठ पुटपुटला...
"नाईक?"
"नाईक, तुम्हाला लहानपणापासून बघत आलोय; तरी ओळखता आले नाही."
"अरेऽ ओळखता आलं असतं तर मग तो हेर कसला? "
तिघेही निःशब्द टेकडी चढू लागले. टेकडीच्या विरुध्द दिशेने एका नैसर्गिक गुहेत प्रवेश केला. ती गुफा आतून बरीच मोठी होती. आंत गडद अंधार होता. मशाल न पेटवता तिघेही चालत राहिले. पाऊले मोजत नाईकांनी छतात असलेले चक्र डाव्या बाजूने वळवताच एक दगड सरकला. व दुसर्या खोलीत प्रवेश केला. ही अंतरगुफा नैसर्गिक नव्हती. छतावरील चक्र सुध्दा नैसर्गिक नव्हते. हे संकेत फक्त बहिर्जी पथकातील हेरांनाच माहीत होते. तिघेही गुप्त गुहेच्या आंत आले. गुहेच्या तोंडावरील दगड पुन्हा पूर्ववत केला. तिथे असलेली मशाल नीळकंठने पेटवली. खोलीत दर्पण आणि एक पेटी होती.पेटीत हेराला वेष बदलण्यासाठी लागणारे सर्व सामान होते. ही गुफा बहिर्जी पथकाचे गुप्त स्थान होते.
तिघेही स्थिरावल्यावर, नाईक म्हणाले, "इथलं काम बरचसं संपत आलं. सारंगा, आतां नाणेघाटात गुप्तस्थळाचं काम पूर्ण करा. या गुफेची देखभाल करण्यासाठी राघोजी नावाचा हेर कायम वस्ती करुन इथे राहत होता. आणि एवढ्या घनदाट जंगलात राघोजी एकटे राहणार असल्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था नीट करण्यात आली आहे."
नंतर नाईक आणि नीळकंठ फकीराच्या वेषात शिरवळजवळ असलेल्या एका दर्ग्याकडे निघाले. चारही बाजूंनी बहिर्जी पथकासाठी गुप्त स्थळे निर्माण करण्याची जबाबदारी सारंगावर सोपवली. अर्थात हे काम नक्कीच सोपे नव्हते. पण सारंगाला दख्खनची इत्थंभूत माहिती, होती. वेगवेगळ्या दिशांना जाणार्या रानवाटा, चोरवाटा माहीत असल्यामुळे तो नुसते गुप्तस्थळे निर्मितीचेच काम करीत नव्हता तर, बहिर्जी पथकाच्या हेरांना विजापूर, दौलताबाद इत्यादी ठिकाणी पोहोचवणार्या अगदी जवळच्या चोरवाटा ज्या सहसा कोणाला माहित नव्हत्या त्याही त्याने नीट बघून ठेवल्या. कोणी मनुष्य त्या निर्जन जंगलातून जाण्याचे साहस करणार नाही अशा वाटेने त्यांना इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम सारंगा करीत असल्यामुळे, सारंग व त्याच्या साथीदारांवर दुसरी कोणतीच हेरगिरीची जबाबदारी सोपवली नव्हती. त्यांच्याकडे असलेलेच कार्य म्हणजे जणू पथकांचं ब्रम्हास्राचं काम होतं. त्यांच्यामुळेच कमी वेळात अगदी वेगाने स्वराज्यात बातमी ते पोहोचवू शकत होते.
" नाईक, सारंग हिरा कुठल्या खाणीत सांपडला? "
कुतुहलाने निळकंठाने विचारले.
🙏🙏🙏🙏
( वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )
