!!! बहिर्जी नाईक !!! भाग १ ते ५
भाग - १.
जिजामाता आणि शिवाजी महाराज पुण्यात आले तेव्हा संपूर्ण पुणे शहर उजाड, उध्वस्त झालेले होते. जिजाऊ आणि बाल शिवाजींनी आपल्या अथक प्रयत्नाने व कर्तृत्वाने पुण्याचा कायापालट करुन चेहरा मोहराच बदलून टाकला होता. पुणे सोडून गेलेल्या लोकांना परत बोलावून त्यांचे पुनर्वसन केले होते. त्यांच्या शेती, उद्योग धंद्याची व्यवस्था केली पण त्याच्या या प्रगतीला बाध आली, ती उच्छाद माजवलेल्या लांडग्यांमुळे. राजेंनी घोषणा केली, जो कोणी लांडग्यांना मारुन त्यांच्या शेपट्या आणून दाखवील त्याला सुवर्णकडे बक्षिस दिले जाईल. राजेंची घोषणा रामोशी वस्तीतही गेली. दौलतरावाने पण ऐकली. त्यापूर्वी शिवाजीराजेंची कीर्ती त्याच्या कानी गेली होतीच. त्याला राजेंना भेटण्याची तीव्र अभिलाषा झाली होती. त्याचवेळी ही घोषणा ऐकल्यावर आयतीच संधी मिळाली असे त्यांस वाटले.
नेहमी मित्रांसोबत ससा, डुकरांची शिकार करणारा १६-१७ वर्षाचा हा दौलतराव आज एकटाच लांडग्यांच्या शिकारीसाठी निबिड अरण्यात घुसला. शिवाजीराजेंची इच्छा आहे ना मग सर्व लांडग्यांचा फडशा पाडण्याच्या निर्धाराने त्यांनी १४-१५ लांडग्यांची शिकार करुन त्यांच्या शेपट्या एका दोरीत बांधून रात्रभर आपल्या झोपडीत तो सूर्योदयाची वाट पाहत होता. दिवस उजाडताच प्रातःर्विधी आटोपून त्याने लाल महालाचा रस्ता धरला. मनात धाकधुक होती, एवढे तालेवार शिवाजीराजे एका रामोश्याच्या मुलाला भेटतील? होय नक्कीच भेटतील. त्यांचेबद्दल ऐकल्यानुसार राजे जातपात, उच्चनीच बघत नाही. बघतात फक्त धाडस, पराक्रम, साहस.
दौलतरावाला बक्षिसाची अभिलाषा मुळीच नव्हती. होती फक्त राजेंना पाहण्याची, भेटण्याची. शाबासकीची, पाठीवर थाप मिळण्याची. यासाठीच त्यांनी एवढा अवघड पराक्रम एकट्याने केला होता. इतक्या लांडग्यांच्या शेपट्या बघून राजे खूष होतील या विचारात तो लाल महालात दाखल झाला. पहारेकर्याला सांगितल्यावर; एकट्या पोराने लांडगे मारुन इतक्या शेपट्या जमा केल्या यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. जेव्हा त्यांनी ठामपणे पटवून दिले तेव्हां आत जायला परवानगी देत म्हणाला,
"आंत राणोजीआप्पांना भेट. ते तुझी भेट जिजाऊसाहेबांशी घालून देतील." आत लाल महालाचे सौंदर्य निरखत, शिवबांना भिरभिर शोधत जात असतांना राणोजी आप्पा जे लालमहालाचा कारभार पाहत होते, त्यांनी दौलतरावांना हटकले.
"आपणच राणोजीआप्पा का?"
"होय! बोल काय काम?"
"मला शिवाजीराजेंना भेटायचे आहे. ह्या मारलेल्या लांडग्यांच्या शेपट्या त्यांना दाखवायच्या आहेत."
"राजे तर महालात नाहीत पण जिजाऊसाहेब येतील, त्यांच्या हातून बक्षिस घे,"
"मला राजेंनाच भेटायचे होते, राहू द्या उद्या येतो."
"अरेऽ पण उद्यापर्यंत शेपट्यांना दर्प सुटेल. आजच बक्षिस घेऊन जा, चागले २-३ सुवर्णकडे मिळतील." "नको. आज दिवसभर शिकार करुन उद्या परत एवढ्याच शेपट्या घेऊन येतो"
असे म्हणून दौलतराव जाण्यासाठी निघाला; तोच जिजाऊसाहेब साक्षात समोर उभ्या. त्यांना पाहून पटकन कमरेत वाकून वाकून त्यांना मुजरा करत म्हणाला,
"माॅं साहेब उद्या येतो."
"अरेऽ पण बक्षिस?"
"मला शिवाजी राजेंच्याच हातून घ्यायचेय! एकदा तरी त्यांच्या दर्शनाने हे जीवन पुनित करायचेय!"
"इतके लांडगे तूं एकट्याने मारलेस? "
"होय माॅंसाहेब! पण बक्षिसासाठी नाही तर राजें ना बघण्यासाठी."
शिवबांप्रती एवढे प्रेम पाहून त्याही भारावल्या. प्रेमाने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवल्यावर तर त्याला नवल वाटून म्हणाला,
"माॅंसाहेब, मी नीच जातीचा... मला स्पर्श केलात आपण ?"
"अरेऽ आम्हास माॅंसाहेब म्हणतोस, आणि जात पात? जसा शिवबा तसाच तू... या मावळातील सर्व मुले आम्हास शिवबासारखीच आहेत."
माॅंसाहेबांच्या बोलण्याने दौलतरावांचे मन भरुन गेले. डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाले,
"माॅंसाहेब, जन्मदात्री हे जग सोडून कधीच आम्हाला पोरके करुन गेली. पण आतां ती खंत नाही. तुमच्या रुपात आज आई परत मिळाली."
दौलतरावाकडे नजर टाकून जिजाऊ मनी म्हणाल्या, "स्वराज्यकामासाठी शिवबाला एक हिरा मिळाला, त्याला पैलू पाडणे बाकी आहे."
"तुला शिवबांना भेटायचे ना, जा.. मग जवळच्या रानात शिवबा खेळत आहेत. आम्ही पाठवले म्हणून सांग." नमस्कार करुन आनंद विभोर होऊन धावतच तो रानाकडे निघाला. त्याला पाठमोरे बघून जिजाऊंंच्या चेहर्यावर एक अनमोल रत्न मिळाल्याचे भाव होते.
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - २.
शिवाजीराजे आपले सवंगडी तानाजी, सूर्याजी मालुसरे यांच्यासोबत तलवारीचे हात करीत एकमेकांवर वार प्रतिवार करीत होते. शिवबा हरण्याच्या बेतात असतांनाच तानाजीकडून शुल्लक चूक झाल्यामुळे तानाजी हरल्यावर, शिवाजी म्हणाले,
"तानाजी, तुम्ही थोडा संयम राखला असतां तर? शेवटपर्यंत झुंझायचे असेल तर बुध्दी आणि शक्तीचा अचूक वापर करायचा असतो. आपल्यावर स्वराज्याची जबाबदारी असणार म्हणून या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. शत्रू संधी देत नसतो, सरळ गर्दनच उडवतो. नुसते बलिदान देऊन नव्हे तर शत्रूला नेस्तनाबूत करुन स्वराज्य उभे करायचे आहे."
शिवाजींच्या प्रेरणादायी शब्दांनी तिथे असलेल्या मुलांमधे स्फूर्ति निर्माण झाली. ती सर्वच मुले एकापेक्षा एक सरस होती. राजेंनी पारख करुन निवडलेले हिरेच होते ते ! कुणी धनुर्विद्या, कुणी दांडपट्टा, तर कुणी भाला फेकण्यात तरबेज होते. सर्वांनी सर्व विद्या आत्मसात करण्यास शिवरायांनी सर्वानाच सांगितले होते. आतांपर्यत शिवबा जे शिकले ते सर्व सहकार्यांना शिकवत प्रोत्साहित करत होते. शिवबांमधे लहानपणापासूनच नेतृत्वगुण असल्यामुळे; याच गुणांनी मावळातील मुले नीट पारखून ते संघटित करत होते. स्वराज्य स्थापण्याचे स्वप्न शिवबा आणि जिजाऊंनी ध्येयात परिवर्तित केले होते. शिवबांना कोणाची चाकरी करणे पसंत नव्हते. त्याचा एक सवंगडी म्हणाला होता, आम्हाला दांडपट्टा शिकवा की! तेव्हां शिवराय म्हणाले ---
"दांडपट्टा कोणीही चालवू शकेल पण तुमच्याजवळ कुंचला चालवण्याची कला आहे ती स्वराज्याच्या कामी फार उपयोगी पडेल. आपल्याला हवा असलेल्या किल्ल्याची नीट पाहणी करुन संपूर्ण चित्र रेखाटून नकाशे बनवू शकता, परिणामी आपल्या सैन्याची नासाडी वाचवूं शकू."
बोलणे सुरु असतांनाच एक धिप्पाड सशक्त मुलगा हातात चार सुवर्ण कडे, अंगात बंडी, गुडघ्यापर्यत पांढरे मळकट धोतर, धोतरावर रक्ताचे डाग, कमरेत खंजीर खोचलेला अशा वेषात शिवबांना नजरेने पाहत येत असतांना दिसला. शिवबांचे मोहक रुप बघून तो जागीच खिळून उभा राहिला. शिवबांच्या आवाजाने तो भानावर आला.
"राजे, मी रामोशी दौलतराव."
हातातील कडे दाखवत म्हणाला,
"माॅं साहेबांना शिकार केलेल्या लांडग्यांच्या १५ शेपट्या दाखवल्याबद्दल ही सुवर्णकडे आणि नाणी दिलीत."
"१५ शेपट्या? तुम्ही एकट्याने?"
"होय महाराज! नवनवीन युक्त्यांनी सापळा रचून शिकार करणे माझा आवडता छंद! आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती. माॅंसाहेबांच्या आज्ञेने आपल्याला भेटायला आलोय!" स्वराज्यात सामावून घेण्याचा माॅंसाहेबांचा इशारा शिवबांनी ओळखला."
"कोणकोणती शस्रे चालवता येतात?"
"भाला, खंजिर, तलवार, दांडपट्टा आणि धनुष्यबाण. वेश बदलणे, कधी वासुदेव, जोगत्या बनून गावोगावी हिंडून उदर्निर्वाह करु शकतो. तसेच हुबेहुब नक्कल करणे, पशुपक्षांचे वेगवेगळे आवाज काढून सावजाला निशाण्यावर आणून शिकार करतो." आवाक होऊन शिवबा दौलतरावाकडे पाहत राहिले.
आणि दौलतरावांनी कांही पशु पक्षांचे आवाजाची हुबेहुब जशीच्या तशी नक्कल करुन दाखवली. एवढेच नाही तर कोणाही स्री- पुरुषाची नक्कल करु शकतो. असे म्हणून राणोजी आप्पाची नक्कल करुन दाखवली. दौलतरावच्या अंगचे हे अद्भूत कौशल्य पाहून शिवबांना खात्री पटली, स्वराज्यासाठी अनमोल हिरा, तिसरा डोळाच जणू गवसला होता त्यांना.
नंतर दोघेही एका झाडाखाली बसले. राजे म्हणाले,
"आपण मराठी राज्य, आपल्या लोकांसाठी स्वराज्य स्थापन करणार आहोत. हे राज्य रयतेचे असेल ज्यात दीनदुबळ्यांवर अन्याय होणार नाही, परकीय दुष्ट आक्रमकांपासून आपल्या भूमीचे, रयतेचे रक्षण करु. हे सगळे सवंगडी या कार्यात साथ देणार आहेत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुध्दा आमचे सवंगडी होऊ शकतां."
क्षणाचाही विचार न करतां दौलतराव म्हणाले,
"राजे, या क्षणापासून हे शरीर, हा प्राण शेवटच्या क्षणापर्यंत तुमचाच राहील, वचन देतो."
शिवबा म्हणाले,
"आजपासून तुम्ही स्वराज्य रथाचे सारथी झालात."
"राजे, एक प्रश्न विचारु? आपण शहाजीराजेंचे पुत्र असून, तुम्ही तुमच्या सहकार्यांना जंगलात आणून शस्राचे शिक्षण कां देता ?"
त्यांच्या अंगगुणांचा परिचय शिवबांस तर झाला होताच, आतां त्यांच्या तीव्र बुध्दीच्या अचूकतेचे दर्शन घडले. कारण तो येत असल्याचा इशारा झाडावर बसलेल्या त्यांच्या साथीदाराने दिल्याबरोबर सर्वांनी आपापली शस्त्रे लपवून ठेवली होती. शस्र शिकवतांना त्याने बघितलेले नव्हते.
"तुम्हाला कसे माहित?"
"मी येत असतांना तलवारीच्या घर्षणाचा आवाज ऐकला होता. मी येण्याची चाहूल लागताच तुम्हाला कोकीळेच्या आवाजातील इशारा ऐकला होता. या ऋतूत कोकीळ नसते आणि एका झुडपा खालून तलवारीची मूठ पण दिसली."
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ३.
राजेंचे व दौलतरावांचे बोलणे ऐकून त्यांच्या निरिक्षण शक्तीने सारे विस्मयचकित झाले. तानाजीने विचारले;
"तुम्हाला कसे माहित?"
"सोप्प आहे. काढलेला आवाज सूचनेसाठी, सावध करण्यासाठीच होता."
आनंदित होऊन राजें त्यांना मिठी मारत म्हणाले,
"तुमच्या सारखा अलौकिक तल्लख बुध्दीचा मित्र आम्हाला मिळाला."
लाल महाली गेल्यावर शिवबानी मातोश्रींंना दौलतरावांबद्दल हे सर्व सांगितले होते. दुसर्या दिवशी दौलतराव मातोश्रींना भेटायला आले तेव्हा शिवबांनी त्यांना भेट दिलेले वस्र; डोक्यावर पिवळे पागोटे घालून आले होते. त्यानी मातोश्रींना चरणस्पर्श केला तेव्हा उठवत त्यांना म्हणाल्या,
"तूं खरोखरच अलौकिक शक्तीचाच धनी आहेस. तुझ्यासारखा चाणाक्ष मित्र शिवबाच्या सोबत असेल तर प्रत्येक युध्दात विजय नक्की मिळेल. पण युध्दापेक्षाही युध्दाचे नियोजन तेवढेच महत्वाचे असते. युध्दात योग्य वेळेची वाट बघण्यापेक्षा ती वेळ निर्माण करायची तर कशी कराल? "
"सापळा रचून सावज गारद करायचे." "अगदी बरोबर! हीच जबाबदारी तुला पेलायची आहे." मातोश्री म्हणाल्या.
"माझी ?"
"होय दौलतराव तुझीच! शत्रूगोटात जाऊन त्याची संपूर्ण माहिती काढून शिवबाला पोहचावयाची. वेळ पडली तर, राजेंविरुध्द, स्वराज्याविरुध्द लढावे...."
"राजेंविरुध्द लढणे माझ्या जिवंपपणी तरी शक्य नाही."
"अरेऽ तुला शिवबांचे हेरखाते सांभाळायचे आहे."
हे ऐकून दौलतराव सुन्न झाले. पण क्षणभरच ! एवढी मोठी जबाबदारी विश्वासाने आपल्यावर टाकल्याने त्यांना परमानंद झाला.
दोन दिवसांनी कर्नाटकवरुन कान्होजी जेधे, शहाजीराजेंचे विश्वासू सरदार येतील. ते गनिमीकाव्याचे उत्तम जाणकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने तुझ्या बुध्दीमत्तेला अधिक धार, चालना मिळेल. तुझ्या कौशल्याचा अचूक उपयोग कसा करायचा हे तुला नीट समजावून सांगतील. जाण्याची अनुमती मागून दोघांनाही मुजरा करून दौलतराव निघून गेल्यावर मातोश्री म्हणाल्या,
"शिवबा, तुम्हाला ईश्वराने तुमच्या साथीला महान आत्म्यास पाठवले ही गोष्ट कायम लक्षात ठेवा."
डोंगराच्या पायथ्याशी दाट राईच्या जंगलात दौलतराव रामोश्यांची वस्ती होती. सर्व वस्ती गाढ झोपलेली पण दौलतरावांना बिलकुल झोप येत नव्हती. सागरासारखं अथांग मन असलेल्या शिवाजीराजेंनी जातपात न पाहतां अलिंगन दिलं, स्वराज्य हेर खात्याची जबाबदारी टाकली. आतां जगायचं तर फक्त आणि फक्त शिवाजीराजे आणि स्वराज्यासाठी. शत्रूगोटातून माहिती काढून आणून शिवबांचा विजय निश्चित करायचा. यानंतर शिकार जंगलातील नाही तर शाही किल्ल्यातील जनावरांची करायची असा ठाम निश्चय करुन पुन्हा निद्रेची आराधना करुं लागले.
दरम्यान कर्नाटकवरुन मोठा फौजफाटा घेऊन दादोजी कोंडदेव कान्होजी जेधेसह आले. शिवाजी राजेंबरोबर दौलतराव पण सामोरे आले. शिवबांनी दादोजींना चरणस्पर्श केला. त्यांना उठवत दादोजी म्हणाले,
"एक वर्षात तुम्ही नुसत्या उंचीनेच नव्हे तर कर्तृत्वानेही फार मोठे झाला. जिजाऊसाहेबांनी तुम्ही केलेल्या तयारीबद्दल आम्हाला सांगीतले आहेच."
"काका, हे माझे सवंगडी तानाजी आणि दौलतराव!"
दादोजीं दौलतरावांकडे बघून स्मित करत म्हणाले,
"आमच्या बरोबर कान्होजी जेधे आलेत ते तुम्हाला सगळ्या विद्येत पारंगत करतील. नंतर आम्हीही तुम्हाला निष्णात करु."
कान्होजी जेधेंचे व्यक्तिमत्व बघून दौलतराव चांगलेच प्रभावित झाले होते. हेरगिरी तेच शिकवणार, धडे देणार होते. दौलतरावांनी प्रथम जेधेंना आणि नंतर दादोजींना चरणस्पर्श केला.
दुपारचा प्रहर संपल्यावर मोकळ्या जागेत शिवबांना दांडपट्टयाचे नवे तंत्र कान्होजी जेधे शिकवत होते. दोघेही खेळून चांगलेच घामाघूम झाले. बर्याच वेळेपासून सराव चालू होता. जेधेंनी शिवबाला थांबवून दौलतरावांना बोलावले. दौलतराव दांडपट्टा घेऊन आले व कान्होजींना वाकून नमस्कार केला. खेळ सुरु झाला. दौलतरावांच्या वारात वेगळेपण होते. चपळतेबरोबर शक्तिचे वेगळे मिश्रण होते. संयम आणि योग्य वेळी योग्य पवित्रा घेण्याचे त्यांचे कसब बघून जेधे मनोमन थक्क झाले. दौलतरावांच्या वारांसमोर दुसरा कुणी असता तर टिकला नसतां. त्याच्या जीवावर बेतले असते. तरी एक निसटता वार जेधेंच्या खांद्याला स्पर्शून गेलाच.
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ४.
दांडपट्टयाचा हलकासा वार कान्होजी जेधेंच्या खांद्याला स्पर्शून गेल्यामुळे त्याच्या पांढर्याशुभ्र अंगरख्यावर रक्ताचे डाग दिसताच दौलतराव पुढे येऊन म्हणाले,
"गुरुदेव, माफ करा."
"दौलतराव याहीपेक्षा मोठ्या जखमा झेलल्यात या शरीराने, काळजी नसावी. पण तुम्ही खरच महान योध्दा आहात. तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, तिथे तलवार किंवा दांडपट्टयाची फारशी गरज भासणार नाही. संध्याकाळी चर्चा करायची आहे. या तुम्ही."
"आज्ञा गुरुदेव!"
"अरेऽ, गुरुदेव नको म्हणूस. मी सुध्दा शिवाजीराजेंचा सरदार आहे."
यावर स्मित करत दौलतराव म्हणाले,
"तुम्ही माझे प्रथम गुरु आहात. तुमची विद्या आणि राजनीतीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी राजेंनी माझेवर सोपवली आहे." राजेंना मुजरा करुन कान्होजी निघून गेले. राजेंनी संध्याकाळच्या थाळ्याला तानाजीला थांबवून घेतले.
संध्याकाळी मंत्रणाकक्षात जिजाऊ साहेब, शिवाजीराजे, कान्होजी जेधे आपापल्या आसनावर बसले होते. समोर तानाजी व दौलतराव उभे होते. जेधेंनी बोलण्यास सुरुवात केली.
"स्वराज्यविस्तार करण्यासाठी आपल्या चौफेर असलेल्या तीन इस्लामिक शाह्यांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या ३००-३५० वर्षापासून हे शासक खूप प्रबळ झालेले आहे. आपल्याजवळ एवढी सैन्या संख्या नाही की, त्यांचेशी लढा देऊ शकू ! त्यासाठी "गनिमीकावा" या युध्दनीतीचा उपयोग करावा लागेल. गुप्तहेर बनून शत्रूगोटातून अचूक खबरा काढून, गुप्तरित्या राजांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष तयारीची आवश्यकता आहे."
"त्यासाठी स्वराज्यहेर, शत्रूगोटात उच्च पदावर स्थापित करावे लागेल. असे काम स्वराज्य विस्ताराआधीच केले तरच आपल्याला यश मिळू शकेल."
जिजाऊंनी दौलतरावांचे मत विचारल्यावर ते म्हणाले,
"गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे तीन्ही शाह्यांचा सामना करण्यासाठी, प्रथम त्यांची भाषा, त्यांचे धार्मिक संस्कार, चालीरिती वगैरे माहिती आत्मसात करावी लागेल. त्यासाठी इस्लामधर्म स्विकारण्याचे नाटक करावे लागेल."
"पण तुमची तयारी आहे का?" राजेंनी विचारले.
"होय महाराज! स्वराज्यासाठी मान कापून देऊ शकतो, हे तर नाटक. काय मोठी गोष्ट?"
पण हे कसे जमावे ?
कान्होजी म्हणाले,
"ती व्यवस्था मी करुन देतो. पण दौलतराव, तुम्ही जन्मजात मुसलमान आहात हे तुमच्याकडे बघून वाटायला हवय!"
विश्वासपूर्ण स्वरात दौलतराव म्हणाले,
"स्वराज्यासाठी, कुणाला संशय येणार नाही इतपत इस्लाम माझ्या अंगात भिनलेला असेल."
राजे आणि मातोश्रींना गहिवरुन आले. राजकीय नीती म्हणून का होईना, दौलतरावांनी धर्म बदल करावा हे मनाला पटत नव्हते. पण इस्लामिक शासक तलवारीच्या जोरावर दीनदुबळ्या जनतेला धाक दाखवून धर्मांतराला विवश करत होते हे थांबवण्यासाठी पाऊल उचलणे भाग होते. दौलतरावांच्या त्यागावरच मराठी दौलत उभी राहत असेल तर, त्यांना त्याग करावाच लागेल.
राजेंच्या डबडबल्या डोळ्यांकडे बघून दौलतराव म्हणाले,
"राजे मन घट्ट करा. तुमचा हा मित्र सोंगाड्या आहे आणि तो फक्त सोंग वठवणार ! आत्मा, मन नाही होणार इस्लाम !
राजानी आसनावरुन उठून दौलतरावांना घट्ट मिठी मारली. पाठ थोपटली. तानाजींनाही गहिवरुन आले.
कान्होजी म्हणाले, "दोन वर्षे तुम्ही विजापूरच्या दर्ग्यात थांबायचे, माझी माणसे तुम्हाला मदत करतील. पण त्यांना कळतां कामा नये की, आपण मुद्दाम करत आहोत. दर्ग्यात राहून इस्लामिक ज्ञान प्राप्त करावे लागेल." शिवबा म्हणाले, "तुम्ही तिथून आल्यावर आपल्या हेरखात्याचा विस्तारास सुरुवात होईल."
दौलतरावांचा बालविवाह झाला होता त्यावेळी तशीच पध्दत होती. पत्नी गर्भवती होती. खरेतर तिला यावेळी पतीची जास्त गरज होती. मनात माफी मागत म्हणाले,
"कर्तव्यपूर्तीसाठी दोन वर्ष तुला सोडून जावे लागत आहे. कार्य गुप्त असल्यामुळे तुला न सांगता, कदाचित घरादाराचा कायम त्यागही करावा लागेल."
तिला बिचारीला कल्पनाही नव्हती की, आपला पती आपल्याला अनिश्चित काळासाठी सोडून जात आहे. ती याच भ्रमात होती की, नेहमीप्रमाणे आपला पती शिकारीला जात आहे. दौलतरावांचे अंतःकरण जड झाले. आवंढा गिळला. डोळ्यातील अश्रू पापणीआड केले.
🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ५.
दुसरे दिवशी सकाळी हसतमुखाने पत्नीला दौलतराव म्हणाले, "यावेळी शिकारीला जास्त दिवसांसाठी जात आहे उशीर झाल्यास काळजी करुं नकोस." आणि दौलतराव मनात म्हणत होते ---
"शारदेच्या प्रेमात कमकुवत होण्याआधी प्रेम, सुख, परिवार, या बंधनात मन गुंतण्यापूर्वी निघायला हवय! स्वराज्यावर जीव ओवाळला आहे तर त्याग अनिवार्य आहे."
नेत्रात शारदेचे चित्र कैद करुन ते तिथून झपाट्यााने निघाले. डोळ्यांना धारा लागल्या होत्या,पण त्या शेवटच्याच! ते वस्तीपासून, प्रिय पत्नीपासून दूर दूर जाऊ लागले.... मागे वळून न पाहतां.
पांढर्याशुभ्र घोड्यावर स्वार दौलतराव भीमानदीजवळ पोहचले. पत्नीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. तिला गर्भावस्थेत सोडून जाणे त्यांना जास्त पीडादायक वाटत होते. मनातच प्रार्थना पण चालली होती -- "हे परमेश्वरा! माझ्या शारदेची काळजी घे. मी वेळेवर न गेल्यामुळे माझी वाट बघत डोळ्यात प्राण आणून आत बाहेर करीत असेल. मी तिला कांहीही सांगू शकत नव्हतो. 'त्याग' हा हेर घडवण्यासाठीचा पहिला आघात आहे. या भूमीवरच्या लाखो जीवांच्या रक्षणासाठी, सुराज्य स्थापित होण्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवबांच्या कार्यपूर्तीसाठी! हे ईश्वरा! मला शक्ती दे!" असे पुटपुत वाकून ओंजळीत पाणी घेऊन तोंडावर सपकारा मारला, तेवढ्यात पाठीवर एक हात आला. गरकन वळून बघितले तर...
"गुरुदेव आपण? तुम्ही सांगितल्या ठिकाणी पोहचतच होतो."
"ठीक! इथे जवळच ती असलेली झोपडी पण तुला दिसली नसती? "
दौलतरावांचा दुःखी,कष्टी चेहरा बघून कान्होजींनी कारण विचारल्यावर, म्हणाले;
"कांही नाही गुरुदेव!"
"तू विवाहित आहेस?"
"होय!"
"तरीच! परिवार सोडून आल्याचे दुःख तुझ्या चेहर्यावर उमटले आहे."
"आपण आतां ज्या झोपडीत विसावणार आहोत, त्या झोपडीच्या दुःखापुढे तुझी वेदना फार कमी आहे."
"कशी गुरुदेव? "
"ही झोपडी माझ्या नावाडी साथीदाराची आहे. एकदा पावसाळ्यात नदी ओलांडून जाण्यासाठी त्याच्या नावेत बसलो होतो त्यावेळी ओळख झाली. बोलताबोलता कधी जिवलग झालो कळलेच नाही."
बोलणे सुरु असतांना त्याच्या हसर्या मुखामागे प्रचंड दुःख लपले असल्याचे लक्षात आले. त्याच्या खांद्यावर थोपटत दिलासा देत विचारले
"मनातले शल्य मोकळेपणे कथन कर, कांही करता आले तर बघू या!"
"मालक किनारा आलाय! विजापूरला जाण्यासाठी किनार्यावर तुमचे दोन रक्षक घोडी घेऊन उभी आहेत."
"जायचे तर आहेच, पण तुझ्या दुःखाचे कारण जाणल्यावरच! शक्य झाल्यास तुझे दुःख निवारण करीन." नावाडी गोंधळून म्हणाला,
"पण तुम्ही विजापूर आदिलशहाचे सरदार आहात ना? "
"आहे आणि नाहीही."
"म्हणजे?"
"आम्ही शहाजी राजेंचे वफादार सेवक आहोत."
हे ऐकल्याबरोबर नावाड्याच्या चेहर्यावर तिरस्कारयुक्त हास्य बघून कान्होजी स्तब्ध झाले. त्यांना समजेना की शहाजी राजेंनी याचं काय वाईट केलंय ? त्यांचं नांव उच्चारताच याच्या चेहर्यावर तिरस्कार कां उमटावा? कान्होजींनी त्याच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवून म्हणाले,
"तुला मनापासून मित्र मानले आहे. तू कांही तरी भयंकर लपवत आहेस."
"मित्र...?" असे म्हणून नावाडी चालू लागला. कान्होजी निराश झाले पण त्याचेबद्दल आपुलकी निर्माण झाल्यामुळे त्याचे दुःख जाणून घेतल्याशिवाय पायही निघत नव्हता. न राहवून आर्ततेने त्याला हाक मारली...
"हे बघ, तूं सांगीतले नाहीस तर, मी इथून हलणार नाही. बोल मित्रा, कोणते दुःख आहे?"
कान्होजीची विनवणी ऐकून तो थांबला व सांगू लागला...
"माझी पत्नी.. तिला या झोपडी समोरील पारिजातकाच्या खोडाजवळ पुरले."
त्याच्या डोळ्याला धारा लागल्या.
"पत्नीचं काय झालं? कसा झाला स्वर्गवास?"
"तुमच्या विजापूरच्या सरदारांनी ओरबडले तिला..."
कान्होजींना अश्या घटना नवीन नव्हत्या. पण आपला मित्र नावाडाच्या बाबतीत घडल्यामुळे व्यथित झाले. मित्र कान्होजींना सांगत होता ---
"या नदीतीरी आमचे तीन कुटुंब होते. त्या दिवशी आदिलशहाचे सैन्य नदीपार करुन दिले आणि त्यांची नजर आमच्या स्त्रियांवर पडली. स्त्रियांची अब्रू लुटली. मुलांचे हालहाल करत मारले. पुरुषांच्या पोटात तलवारी खुपसून... नावाड्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते... मला नदीपार करण्यासाठी जिवंत ठेवले."
ही करुण कहाणी ऐकून दौलतराव व्यथित झाले. आतां तो नावाडी विजापूर दरबारात चाकरीवर आहे हे ऐकून दौलतराव आश्चर्यचकित झाले. झोपडीत असलेल्या दोन खाटांवर दोघे आडवे झाले. "गुरुदेव, नावाडी विजापूर दरबारी कसा?" मीच प्रवेश मिळवून दिला. ज्या सरदाराने त्याच्या परिवारावर अत्याचार केला त्याचा प्रतिशोध घ्यायचा आहे. त्या सरदाराचे नांव नावाड्याला माहित नव्हते, पण चेहरा मात्र चांगला लक्षात आहे."
🙏🙏🙏🙏
बहिर्जी नाईक भाग ६ ते १० वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
बहिर्जी नाईक भाग ११ ते १५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
( वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )
