Ad Code

Responsive Advertisement

बहिर्जी नाईक | Bahirji Naik Part 11 to 15 | बहिर्जी नाईक भाग ११ ते १५

 !!! बहिर्जी नाईक  !!! भाग ११ ते १५


बहिर्जी नाईक भाग १ ते ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बहिर्जी नाईक भाग ६ ते १० वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग - ११.


नाईक म्हणाले, "दख्खनमधे हिर्‍यांची कमतरता नाही, फक्त शोध घ्यावा लागतो. सध्या शिवाजीराजे दख्खनेतले हिरे शोधण्यचे काम करीत होते. पण हा सारंग हिरा मात्र स्वतः चालत माझेकडे आला. सारंग हा जंगलात दबा धरुन लुटमार करणार्‍या टोळीचा म्होरक्या होता. लहानपणापासून त्याचे हेच काम होते. एकदा याने मला अडवले. त्याच्या एकंदर वागण्या बोलण्यावरुन त्याला जंगलाचे अगाध ज्ञान असल्याचे माझे निदर्शनास आले. मग मी माझे कसब वापरुन त्याला स्वराज्याचे महत्व पटवून दिले. त्याच्यातील सुप्त असलेल्या गुणांचा वापर सत्कार्यासाठी करावा हे त्याच्या मनावर बिंबवले. त्या बदल्यात त्याला अपार धन मिळेल हे सांगितल्यावर तो त्याच्या टोळीतील विश्वासू साथीदारांसह तयार झाला. आतां तो काम करतो ते धनासाठी नाही तर स्वराज्यासाठी. त्याचा धनाचा मोह कायमचा संपला."


दोघेही शिरवळजवळ पोहचले. दूरवर मोठे तीन वटवृक्ष होते. दोघेही त्या वटवृक्षांपाशी पोहचले. त्या वृक्षांच्या छायेत एक थडगे होते. त्यावरील दगडांना पांढर्‍या चुन्याने रंगवले होते. त्यावर हिरवी मखमली चादर टाकली होती, तिथे जवळच ५० मौलवी व फकीर होते. बाजूलाच एक मशीद व तिथे वास्तव्यास असणार्‍या मौलवींसाठी निवासस्थान बांधले जात होते.

           

हा दर्गा म्हणजे नाईकांची निर्मिती होती. त्याचा उपयोग स्वराज्याच्या नवीन हेरांना इस्लामी शिक्षण देण्यासाठी करण्यात येत होता. विशेष म्हणजे या कार्याचा खर्च शिवराळचा ठाणेदार अमिनने उचलला होता कारण ५० पेक्षा जास्त हिंदूना कुठलीही जबरदस्ती न करतां या दर्ग्याचे फकिरबाबा चाॅंदमियाने इस्लाम धर्म स्विकारण्यास प्रेरित केले होते. हा चाॅंदमिया म्हणजेच नीळकंठ होता ! या शूर अशा स्वराज्य हेरांनी धर्म परिवर्तनाचे नाटक केले होते

           

यावेळी निघतांना दौलतरावांनी शारदेची व्यवस्थित समजूत घातली होती. "आपण आदिलशाहीत संदेशवाहकाचे काम करीत असल्यामुळे घरी येणे क्वचित होईल. दरमहा वेतन पोहचते होईल."


नाईकांच्याच नाही तर इतर हेरांच्या घरी सुध्दा असेच वेतन पोहोचते होत होते. सर्वांच्या घरी हे वेतन आदिलशहा कडून मिळते असे सांगण्यात आले होते, वेतन पोहोचवणारे पथक देखील वेगळे होते. स्वराज्य हेर असल्याची गुप्तता पाळण्यात आली होती.

               

आतां स्वराज्यकार्यासाठी एखाद्या गडाची आवश्यकता होती. पण त्यापूर्वी, पुणे जहागिरी सांभाळणार्‍या शिवाजीराजेंनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्याचे ठरविले. सर्व सवंगडी रायरेश्वर मंदिराच्या पटांगणात जमा झाले. तानाजी - सूर्याजी मालुसरे बंधू, जवळच असलेल्या कोढावळे गावचा एक साथीदार असे लोक तयारी करण्यासाठी तिथे आधीच पोहोचले  होते. राजेंबरोबरच्या साथीदारात सरदाराच्या वेषात बहिर्जी नाईक होते. त्यांचे वेशांतर इतके बेमालूम होते की, तानाजीशिवाय त्यांना कोणीच ओळखले नव्हते.

           

अभिषेकाची तयारी झाल्याचा निरोप मिळाला. पुजार्‍याच्या सूचनेवरुन राजे शिवलिंगावर विधिवत अभिषेक करीत होते. म्यानातून तलवार काढून राजेंनी शिवलिंगापुढे ठेवली. नतमस्तक होत हात जोडून राजे पुटपुटले,- - - - - 

"हे महादेवा! मातृभूमीच्या रक्षणासाठी ही तलवार हाती घेणार आहोत, तुमचा आशिर्वाद असू द्यात !" आणि राजेंनी अंगठ्याला हलकासा तलवारीचा स्पर्श करुन रक्ताचा अभिषेक पिंडावर करुं लागले. मग सर्वांनीच आपापल्या रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्यहितासाठी शपथ घेतली.

             

नाईक; रहीमबाबा बनून विजापूर मोहिमेवर निघाले होते. दिवसभर चालून थकल्यामुळे पाणी पिण्यासाठी एका ओढ्यावर थांबले असतां, त्यांचे कानी आर्त स्वरात घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज आला. त्या दिशेने बघितल्यावर ओढ्याकडे घरंगळत पडणारा घोडा व स्वार सुध्दा दिसला. नाईक धावत ओढ्याकडे आले. घोडेस्वार ओढ्यात दोन विशाल दगडांमधे अडकून निपचित पडला होता. त्याच्या तोंडावर बांधलेला कपडा बाजूला केल्यावर तो स्वार म्हणजे एक स्री होती असे त्यांना लक्षांत आले. तिच्या तोंडावर पाण्याचे शिपकारे मारल्यावर ती शुध्दीवर आली. नाईकांना समोर बघून चटकन उठून बसली व तोंडावर कपडा  बांधला. बाजूला पडलेल्या जखमी घोड्याच्या पोटात झाडाची फांदी घुसल्याने तो शेवटचे आचके देत होता, त्या स्रीने घोड्याच्या तोंडावर हात फिरवित, कुरवाळीत म्हणाली,

"अरेऽ बादल, माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचे बलिदान दिलेस. तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. बादल माफ कर.. माफ कर....." ती उर्दूत बोलत होती. नाईक सुध्दा हे करुणामय दृष्य बघून भावुक झाले होते. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज कानी आला. ती धावत निघालेली बघून नाईक म्हणाले,


"त्यांच्या तावडीतून तू वाचू शकणार नाहीस तू. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला वाचवू शकतो." आणि तिला घेऊन ते ओढ्याच्या दुसर्‍या टोकाने गेले; आणि घनदाट जंगलात प्रवेश केला. तिच्याजवळ दुसरा पर्यायही नव्हता. तशीच  वेळ आली तर ती एकट्याचा प्रतिकार करण्यास समर्थ होती पण पाठलागावर असलेल्या इतक्या स्वारांचा प्रतिकार करणे  तिलाही अशक्य होते.


🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

            

भाग - १२.

          

बराच वेळ प्रवास झाला. त्या स्त्रीने   आपले नांव मार्जिना सांगीतले. रहीमबाबा समवेत बराच वेळ प्रवास केल्यावर तिने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तिच्या प्रश्नांना टाळून ते म्हणाले, 

"आतां आपण मोगलप्रदेश सोडून विजापूर जवळ पोहोचत आहोत." 

त्यावर ती ओरडून म्हणाली,

"विजापूरला तर जास्त धोका आहे माझ्या जीवाला."

"कां?"

"मी आदिलशाही फौजदाराचा वध केला म्हणून, त्याचे सैन्य पाठलागावर होते." 

"कां हत्या केली त्याची?"

"एक वर्षापूर्वी त्याने माझे पिता अहमदखानची हत्या केली होती." नन्तर आवंढा गिळून ती म्हणाली, 

"दोघेही घनिष्ट मित्र होते; आणि दोघेही कुतुबशाहीत वतनदार होते.पुढे त्याने कुतुबशाही सोडून आदिलशाहीत सरदारकी मिळवली. तरीसुध्दा माझ्या  पित्याचा त्याचेवर आधीसारखाच  विश्वास होता.पण एक  दिवस त्याने दगा देऊन; धोक्याने पित्याची हत्या केली.मला आणि एकेकाळची असलेल्या सरदारपत्नीला (म्हणजे तिच्या आईला आणि तिला) त्याने विजापूरच्या जनानखान्यात दासी बनवले. मातेचे दुःख मला पाहवत नव्हते. ज्या फैजल खानामुळे आमच्यावर ही वेळ आली त्याला संपवण्याचा मी निश्चय केला."


पुढे तिने त्यास कसे संपविले ? याबद्दल तिने अशी माहिती सांगितली - - - 

          

एक दिवस पूर्ण तयारीनिशी मंगळवेढ्याच्या पायथ्याशी झुडपामधे दबा धरुन फैजखान येण्याची वाट बघत बसली. तिच्या पित्याशी निष्ठा असलेल्या एका आदिवासी सैनिकाकडून बादल नावाचा घोडा मिळवला. बादलला जंगलात सोडले. धनुष्यबाण मिळवले. दुसरा प्रहर संपण्याच्या सुमारास फैजलखान आपल्या लवाजम्यासह किल्ल्यातून बाहेर पडला. सशस्र सैनिक असल्यामुळे तिचा जीवही जाऊ शकतो याची तिला पूर्ण खात्री होती. ती उत्तम धनुर्धर होती तिने नेम धरला आणि बाण सुटला तो थेट फैजलखानाच्या मानेत घुसला.

  

अचानक हल्ल्याने सैनिक गोंधळले. त्या परिस्थितीचा लाभ घेऊन तिने धावत घोड्याजवळ जाऊन; घोड्यावर स्वार होण्याच्या गडबडीत तिच्या चेहर्‍यावरचा कपडा सुटल्यामुळे कांही सैनिकांनी तिचा चेहरा पाहिला. म्हणून तिने विजापूरकडे न जातां मोगल प्रदेशात जाण्याचे ठरविले. तोवर १००-१२५ घोडेस्वार तिच्यामागे लागले. त्यांच्यात अंतर बरेच होते. पित्याच्या हत्येचा सूड घेतल्याचे समाधान तिच्या मुखावर विलसत होते.

         

रहीमबाबा आणि मार्जिना रानवाटांनी जात विजापूरच्या बर्‍याच जवळ पोहोचले. घनदाट जंगलातील एका जीर्ण  मंदिराजवळ येऊन पोहोचले. मंदिर दिसल्यावर आनंदून म्हणाली, आपण कांहीवेळ विश्रांती घेऊ या का? कांहीच त्राण राहिले नाही. पाठीवरील भात्याचा पट्टा सोडून ती थोडी सैलावत बसली. थोडे अंतर ठेवून रहिमबाबाही बसले.

          

रहीमबाबांनी विचारले 

"तू तुझा प्रतिशोध घेतलास. आतां पुढे काय ठरविले आहेस? 


मार्जिना म्हणाली,

"प्रथम मातेला भेटून तिला तिच्या पतीची हत्या करणाऱ्याचा बदला घेतला हे सांगून; तिच्या चेहर्‍यावरचा आनंद मला पहायचा आहे. " 

"मग ही वार्ता तिला कळवल्यावर तुमची दास्यातून सुटका होईल का?" 

"नाही, पण तिला थोडा तरी आनंद मिळेल. तेवढेच मला पुरेसे आहे."

         

"जर आपण तिची नेहमीसाठी (कायमचीच) दास्यातून सुटका केली तर?" 

"पण कसे शक्य आहे? दासांवर कडक पहारा असतो. मीच तर मोठ्या मुष्कीलने बाहेर पडले." 

"तुझी माता पेठेपर्यंत तर येऊ शकते ना? मग नगराबाहेर आणण्याची जबाबदारी माझी !" 

"पण आमचं या जगात कुणीच नाही. जाणार कुठे?" 

"ती काळजी करुं नकोस. पुण्यात तुझ्या मातेसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था, प्रत्येक महिन्याला धनधान्य, गरजेच्या वस्तु उपलब्ध करुन देण्यात येतील." हे ऐकून तिला आनंद तर झालाच पण थोडी  साशंकही झाली - - -   

"पण तुम्ही आमच्यासाठी हे सगळे  करण्याचे प्रयोजन?" 

"मी नाही हे सर्व तूंच करणार आहेस."

"मीऽऽ?"

"होय; तुझ्या मातेची सुटका करुन तिच्याऐवजी आदिलशाही जनान्यात तू कार्य करायचे त्या बदल्यात ह्या सर्व सुविधा तुझ्या मातेला उपलब्ध होतील." 

"पण एवढ्या मोठ्या आदिलशाहीला मनवता (पटवता) येईल? माता निसटून गेल्यावर मला सौम्य वागणूक मिळेल?" 

"हे सर्व आदिलशाही करणार नाही, स्वराज्य करणार आहे." 

हे क्रांतीकारी विचार ऐकून ती स्वराज्याच्या कामी येईल; याची त्यांना खात्री आली. ती म्हणाली 

"स्वराज्य हे नांव मी प्रथमच ऐकते  आहे. काय प्रकार आहे हे स्वराज्य?"

      

"स्वराज्य हे असे राज्य आहे, ज्यात कुणी लहान मोठा नाही. या राज्यात कुणाही स्रीवर अन्याय होत नसून स्त्रियांचा  सन्मान केला जातो. मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. इथला कायदा प्रजेइतकाच स्वराज्याला लागू होतो. राजापेक्षाही जनतेचे हित प्रथम पाहिले जाते -- असे ते राज्य म्हणजे स्वराज्य!"


"असं राज्य आहे या भारत भूमीवर ?"

       

🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

             

भाग - १४.


बहिर्जी नाईकांनी मार्जिनाला हेरगिरीमध्ये योग्य प्रशिक्षित व सांकेतिक भाषा शिकवून चांगलेच तयार केले. दोघांनी मुस्लीम दाम्पत्याचा वेष धारण करुन विजापुरात प्रवेश केला. प्रवेशदारावर नोंद केली. इस्लामिक लोकांची, फकीर सामान्य नागरिक, मौलाना यांची फारशी चौकशी होत नसल्यामुळे, नाईकांनी "महमूद मियाॅं " व मार्जिनाने "मरियम"  नाव धारण केले होते. दोघेही पेठेतील जिवाजीच्या दुकानाजवळ पोहोचले. जिवाजीला ओळख पटली नाही म्हणून, नाईकांनी सांकेतिक शब्दात 'विहिंगराज' म्हणून ओळख करुन दिली. त्यांच्या भेटीने जिवाजीला अत्यंत आनंद झाला. नाईक इतर हेरांना याच नावांनेच भेटतात. असेच वेगवेगळे सांकेतिक शब्द ओळख म्हणून दिले जात असत. 

             

जिवाजीने शेजारी उभ्या असलेल्या मार्जिनाकडे दृष्टीक्षेप टाकल्यावर, ती बहिर्जी पथकाची हेर असल्याचा नुसता सांकेतिक इशारा केला. सांकेतिक इशार्‍याने कांही खबर आहे का, विचारल्यावर, आजूबाजूला कोणी नाही हे बघून जिवाजी म्हणाले,

"खूप मोठे राजकारण, खूप मोठी मोहीम आखली जात आहे." 

"कोणत्या दिशेने?" 

"वायव्य दिशेने! "

          

"राजेंनी तोरणा, कोंडाणा, सुभानमंगळ, पुरंदर किल्ले घेतल्यामुळे आदिलशहा चांगलाच तापला असून, राजेंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज पाठवणार आहे, सरदाराचे नांव कळले नाही." 

नाईक, मार्जीनाला म्हणाले, 

"जनानखान्यात मिळालेल्या खबरा या जिवाजीपर्यंत तूं पोहोचविणार  आहेस." 

आता तिची ओळख पटावी म्हणून, तिला "शाहीन" हे सांकेतिक नांव देण्यात आले. याचा उर्दू अर्थ होता "बाजपक्षी"! तसंही बाजपक्षी हा बहिर्जी पथकाचे प्रतीक होते. वेगवेगळ्या मोहिमेवर असलेल्या हेरांसाठी "बाज" आणि एकाच जागी स्थायिक असलेल्या हेरांसाठी "वटवृक्ष" हा सांकेतिक शब्द दिले होते. "बाज" संकेत असणारे हेर आपापल्या लक्ष्यावर तीक्ष्ण नजर ठेवून असत. आणि "वटवृक्ष" संकेत असणारे हेर वटवृक्षासारखे विशाल व सर्व बाज पक्षांना आश्रय देऊन मोहिमांसाठी माहिती पुरवीत असत. मार्जिनाही आता सज्ज झाली होती. आदिलशाही जनानखान्यात प्रवेश मिळणे सहज सोपे नव्हते. कांही दिवसांत स्वराज्यावर पहिले आक्रमण होणार! या आक्रमणाची सर्व माहिती काढण्यासाठी बहिर्जी पथकाचे विजापुरातील सर्व हेर सक्रीय झाले होते. नाईक स्वतः विजापुरी थांबणार होते.

          

विजापुरातील एका सामान्य वस्तीतील एका घरात नाईक व मार्जिना मुक्कामास होते. हे घर एका आदिलशाही शिपायाचे होते, याचीच मदत नावाड्याच्या सुटकेसाठी झाली होती. विजापूरमधे बहिर्जी पथकाचे  हेर पेरण्याच्या कामी या शिपायाचे महत्वाचे योगदान होते. तो आतां स्वराज्य हेर होता. महत्वाचे म्हणजे तो विदेशी इराणी वंशाचा होता. नांव होते हबीबुल्ला हुसैन ! 

          

साहजिकच मनात प्रश्न निर्माण होतो की; या गैर हिंदूवर नाईकांचा इतका विश्वास कसा बसला? याचे कारण म्हणजे त्याने बहिर्जी पथकाची मुळे विजापूर दरबारात रोवली. कारण केव्हातरी शहाजीराजेंनी त्याच्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवून त्यांच्या पुत्रास मदत करणे हा मुख्य उद्देश ! शिवाय त्याचे परममित्र कान्होजी जेधेंच्या शब्दाचे पालन करणे, पण त्याहीपेक्षा शिवाजींची स्वप्ने, स्वराज्यविषयीची तळमळ, निःस्वार्थ, निरपेक्षपणे सामान्य जनतेचे हित, सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सुखे समोर हात जोडून उभी असल्यावर त्या सुखाचा उपभोग न घेता, मराठी राज्य निर्माण करीत असलेल्या त्यांच्या ध्येयाबद्दल बहिर्जींनी त्याला माहिती दिल्यामुळे तो अतिशय प्रभावित होऊन स्वराज्याशी जोडला गेला होता. 

            

त्या दोन खोल्यांच्या घरातील आतल्या खोलीत मार्जिनाची झोपायची व्यवस्था केली होती.  इतके दिवसांपासून एका सुंदर, रुपवान ; तारुण्याने मुसमुसलेल्या स्रीसोबत बहिर्जी राहत असून, चुकूनही त्यांचे मनी कुविचार किंवा तिच्याबद्दलची अभिलाषा मनात आली नाही. ज्या राजाचा हेरपथक - प्रमुख इतका चारित्र्यवान, महान आहे तर मग तो राजा किती महान असेल ? या विचाराने आपण एका अद्वितीय; महान शासकासाठी जीवन खर्ची करत असल्याचा अभिमान मार्जिनाला वाटत होता. 

        

बाहेरच्या खोलीत नाईक आणि हबिबुल्ला बोलत होते. हबिबुल्ला म्हणाला, "नाईक, मार्जिनाला जनानखान्यात पोहोचविण्यास एक मोठी समस्या आहे. तिची आई तिथे असली तरी, सहजासहजी शाही जनानखान्यात तिला प्रवेश मिळणे कठीण आहे कारण ही एकदा पळून जाऊन बराच काळ बाहेर राहिलेली आहे. तिला जनानखान्याबाहेर ठेवले तरी संशय येऊ शकतो.  दुसरा पर्याय आहे पण, तुम्हाला व तिलाही पटेल की नाही...

           

🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

             

भाग - १५.


म्हणजे काय? नाईकांनी विचारल्यावर, हबीबुल्ला चाचरत म्हणाला! "मार्जिनाला अत्यंत वाईट परिस्थितीतून तिथं पोहचावे लागेल. नोकर, दास यांची नोंद ठेवणार्‍या अधिकार्‍याला....." नाईक आणि आणि राजेंच्या विचार पध्दतीत असे चारित्र्यहनन कार्य कधीच मान्य होणारे नव्हते. मार्जिना स्वतः तल्लख बुध्दीमान असून हेरगिरीसाठी समर्थ आहे. पण या मार्गाने अशक्य. नाईकांनी निःस्वास टाकला. तेवढ्यात खोलीतून बाहेर येत मार्जिना म्हणाली, 

"नाईक, जास्त विचार करण्याची गरज नाही. एकदा माणूस मेला की, त्याचे फक्त कलेवर उरते. माझा मृत्यु तर कधीच झाला आहे. या पवित्र स्वराज्यासाठी हे कलेवर अर्पण करायला तयार आहे. तेव्हा एका अधिकार्‍याला वश करणे काय विशेष? त्या अधिकार्‍याला मी चांगली ओळखते."

           

नाईक बोलणार तोच त्यांना थांबवत मार्जिना म्हणाली, "नाईक, ही मोहीम मी कोणत्याही किंमतीवर पूर्ण करेन. एकदा मी जनानखान्यात पोहचून विश्वास संपादन केला की स्वराज्याच्या दिशेने जाणार्‍या सर्व वाटा व आक्रमणांची माहिती आयुष्यभर पुरवत राहीन. मी जाणून आहे, तिथे मला कोणत्या यातना सहन कराव्या लागणार आहे. आदिलशहाच्या भोगविलासी वृत्तीचा सामना मी व माझ्या आईने आधीही केलेला आहेच.  पण यावेळी त्या यातना वाटणार नाही. स्वराज्याचा झेंडा जेव्हा आदिलशाही किल्ल्यावर फडकेल तेव्हा माझ्या बलिदानाचे सार्थक होईल."

          

मार्जिनाचे बोलणे ऐकून दोघेही प्रभावित -- पण विचलितही झाले. अशा स्थितीत मार्जिनाला जनानखान्यात पाठवणे त्यांच्या मनाला पटत नव्हते. पण तिच्या ठाम निश्चयापुढे त्यांचा नाईलाज झाला.

          

एवढ्यात दाराची कडी वाजवण्याचा आवाज आला. दार उघडून बघितले तर -- बाहेर नगर-रक्षक उभा होता. त्याने हबिबुल्लाकडे नजर टाकली व सरळ आंत आला. तातडीने दरवाजा बंद करण्यात आला. तो पूर्ण इस्लामी वेषात होता. आत येताच नगररक्षकाने नाईकांना नमस्कार केला. नाईक म्हणाले,

"प्रतापराव, कसे वाटले विजापूर?"

"एकदम उत्तम. पूर्वी ज्या विजापूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत मरणाची वाट बघत होतो आज त्याच विजापूर नगराचा नगर रक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे."

           

"हा प्रतापराव तोच नावाडी आहे ज्याची सुटका विजापूर तुरुंगातून नाईकांनी केली होती त्याने इस्लाम धर्म स्वीकारुन नगर रक्षक दलात नोकरी करीत होता. पदोन्नती होऊन तो अधिकारी झाला होता. धर्माबरोबरच त्याने चेहरा मोहरा बदलवून, नावही  बदलवले. आता त्याला अकबरुद्दीन नावाने ओळखले जाते. अजूनपर्यंत तरी त्याला तुरुंगकैदी म्हणून कुणी ओळखले नव्हते."

        

"ही तर सुरुवात आहे. एक दिवस विजापूर तख्त शिवाजीराजेंच्या इच्छेनुसार चालेल. प्रतापराव, तुम्हाला एक जबाबदारी पार पाडावी लागेल. ही मार्जिना;  बहिर्जी पथकाची नवी सदस्या आहे. शाही जनानखान्यातून हिच्या आईची सुटका करुन नगराबाहेर काढायचे आहे."

        

"आतां लवकरच स्वराज्याची पहिली महिला हेर आदिलशाहाच्या वैयक्तिक जीवनाच्या निकट जाणार, त्यामुळे बहिर्जी पथकाला सर्व खर्‍या व खात्रीलायक खबरा वेळेत मिळतील." आणि काही दिवसातच मार्जिनाचा प्रवेश शाही जनानखान्यात मोठ्या हिकमतीने करवून देण्यात आला. 

            

शाही महालाच्या बाजूला असलेल्या मंत्रणाकक्षात एका रुबाबदार धिप्पाड सरदाराने प्रवेश केलेला शाही महालाच्या खिडकीतून मार्जिनाने बघितले. मार्जिनाने दोनच दिवसांपूर्वी, प्रतापरावांच्या सहाय्याने शाही जनान खान्यात प्रवेश मिळवला होता. त्याच महालातून तिच्या आईची सुटका केली होती. त्या सरदाराला बघून मार्जिनाचे डोळेच क्षणभर थिजले. त्या सरदाराचे क्रूर किस्से तिने ऐकले होते. त्याचे सामर्थ्य ती जाणून होती. तो होता फत्तेखान! त्याची प्रत्येक मोहीम फत्ते होत होती. कोणत्याही मोहिमेवर तो विशाल फौज घेऊन जात असे. वाटेत येणारा प्रदेश, बायकांची अब्रू लुटणे, रयतेवर मनमानी अत्याचार करण्याची त्याने सैनिकांना खुली सूट दिली होती. 

            

फत्तेखान मंत्रणाकक्षात गेल्यावर तिथे काय मसलत ठरते याची माहिती कशी मिळवावी या विचारात असतांनाच, आणखी एक सरदार मंत्रणा कक्षात जातांना दिसला. तो होता बाळाजी हैबतराव. आदिलशाहीतला मोठा सरदार, अतिशय क्रूर त्यालाही बोलावले होते. ती चिंतेत पडली.....

  

🙏🙏🙏🙏

( वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )