!!! बहिर्जी नाईक !!! भाग १६ ते २०
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग - १६.
नुकत्याच धार लावलेल्या चकाकणार्या तलवारी हबिबुल्लाखानाने एका हातगाडीवर लादून शस्रागारात आणल्यावर, शस्रागार अधिकारी मोसेखान आनंदून म्हणाला,
"आतां मराठ्यांचा अंत जवळ आला. काय खेळी खेळतात वजीर मुसाफखान? तिकडे अफझल खानने दक्षिणेत शहाजीराजे भोसलेंना कैद केले आणि आतां थोरल्या व धाकट्या भावांना संपवणार!"
हबिबुल्लासाठी ही बातमी नवीन तितकीच धक्कादायक होती. त्याला कळून चुकले ही सारी तयारी शिवाजीराजेंवर आक्रमण करण्यासाठी आहे. त्याहीपेक्षा तो शहाजीराजेंच्या कैदेच्या बातमीने जास्त व्यथित झाला. पण चेहर्यावरचे भाव जराही दिसू न देता; उलट जबरी हास्य चेहऱ्यावर आणून आनंद व्यक्त केला त्याने. मोसेखान त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला,
"लवकरच शहाजींचे हाल हाल होतील सोबतच त्यांच्या दोन्ही पुत्रांना खतम करुन त्यांचा वंशच संपवणार आहेत आपले वजीरसाहेब ! मी पण फत्तेखानसोबत या मोहीमेवर जात आहे."
मोसेखानच्या तोंडून शिवाजीराजें प्रति निघणार्या अपशब्दांनी हबिबुल्लाचे मस्तक भडकत होते, परंतु तो मोठ्या प्रयासाने स्वतःवर काबू ठेवत होता. क्रोध नियंत्रित करुन उसने स्मित करुन, रिकामी हातगाडी शस्रागाराबाहेर घेऊन निघाला.
फत्तेखान, बाळाजी हैबतराव, मोसेखान, फजलशहा, शरफशहा, मानोजी घाटगे, बाबाजी नाईक, आशफशाह, अशा मोठ्या सरदार लांडग्यांची झुंड सह्याद्रीच्या सिंहावर चालून जात होती. ही जीवघेणी खबर, जिवाजी --- दुकान बंद करण्याच्या वेळी आलेल्या नाईकांना देत होते. जिवाजीने दुकान बंद करुन घेतले; आणि दोघेही आत जाऊन चर्चा करुं लागले.
"जिवाजी, घाबरु नका. लांडग्यांना मारण्याचा जुना अनुभव माझ्यागाठी आहे. सह्याद्रीवर जाणार्या लांडग्यापैकी एकालाही जिवंत सोडायचा नाही. नाईक, शाहीनने (मार्जीना) या मोहिमेबद्दल अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.... सैन्यसंख्या, त्यांचे मार्ग.. पण त्याआधी हबिबुल्लाने दिलेली दुःखद वार्ता आहे. हिम्मतच होत नाही बोलायला... पण नाईक, ही बातमी लवकरात लवकर राजेंपर्यत पोहचायला हवी."
"बोला, जिवाजी, लवकर बोला,"
"नाईक... नाईक.. मुस्तकखान व अफझलखानाने शहाजी राजेंना कैद केले आहे." क्षणक्षर नाईक सुन्न झाले. पण स्वतःला सावरुन खोल निःश्वास टाकून म्हणाले,
"फार मोठी चूक केली या दोन्ही यवनी सरदारांनी... मला तात्काळ राजगडावर पोहचून राजेंना खबर द्यायला हवी!"
जिवाजी म्हणाले,
"शाहीनने खात्रीशीर माहिती गोळा केली आहे.... वीस दिवसांनी फत्तेखान ३०,००० फौजेनिशी कूच करणार असून त्याने सर्व वतनदारांना फौजेत दाखल होण्याचे फर्मान काढले आहे."
"ठीक आहे. या पुढील सर्व बातम्या राजगडी पोहचायला हव्यात. हरकत नाही. रात्रभर प्रवास करुन पहाटेच राजगडी मी पोहचतो." जिवाजीने हळूच दरवाजा उघडून बाहेर कुणी नसल्याची खात्री करुन झाल्यावर नाईक दुकानाबाहेर पडले.
नाईकांनी वाटेतल्या गुप्तस्थळी जाऊन सरदाराचा वेष धारण करुन तिथल्याच एका वेगवान घोड्यावर आरुढ होऊन, राजेंचा सरदार मित्र म्हणून थेट राजेंपर्यत पोहचले. दोघे खलबतखान्यात बसले. नाईक सांगत असलेल्या बातम्या राजे शांतपणे ऐकत होते. फत्तेखानच्या आक्रमणाची बातमी वेळेआधी दिल्यामुळे युध्दतयारी करण्यास अवधी मिळाल्यामुळे राजेंनी त्यांचे कौतुक केले, पण नाईकांचे लक्ष नसून, गंभीर चेहरा बघून राजेंना त्यांच्या मनस्थितीची कल्पना आली. वाईट बातमी त्यांना आधीच कळली होती.
"राजे, आपल्या.... ठाऊक आहे. कान्होजी जेधेंनी दक्षिणेतून जासूद पाठवला होता."
"राजे, माॅंसाहेबांना? होय, त्यांचेपासून लपवायचे होते पण..... त्यांना शत्रूंच्या कारवायांची माहिती असणे आवश्यक असल्यामुळे..."
"राजे, या हरामखोरांची हिम्मत नाही की, आबासाहेबांना समोरुन पकडायची म्हणून त्यांचा झोपेत घात केला आणि आतां आपले जेष्ठ बंधू शंभूराजेंना पकडण्याची धडपड करीत आहे."
"करुं देत... आम्हाला खात्री आहे, आमचे बंधू दादासाहेब त्यांच्या हातावर तुरी ठेवतील. राहिला प्रश्न आबासाहेबांचा... त्यांनाही लवकरच सोडवू.!"
"बहिर्जी, दौलताबादला प्रमुख पदी शक्य तेवढ्या लवकर हेर स्थापित करा. नाईक, फत्तेखान चालून येत आहे, ही आपल्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे आपली ताकद दाखवण्याची! आदिलशहा अजूनही आम्हाला फक्त शहाजीराजेंचे पुत्रच समजतो. आम्ही दख्खनचे राजे आहोत ही ओळख करुन देण्याची वेळ आलेली आहे.
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - १७.
बहिर्जी नाईक म्हणाले,
"पण राजे, फत्ते खानची 'सैन्यसंख्या' विशाल आहे."
"होय ! हीच एक काळजी आहे. असू द्यात. आपल्या स्वराज्यातील एक एक मावळा १००-१०० जणांना भारी आहे. आपण आणखी युक्तीची जोड लावू. नाईक इतर हेरांसोबत तुम्ही पण फत्तेखानच्या सैन्यात सामील व्हा. स्वराज्या विरुध्द हे युध्द फत्तेखान नाही, बहिर्जी नाईक लढतील, कसे लढायचे ते तुम्ही ठरवा."
"राजे, तुमची योजना आली लक्षात."
"फत्तेखान स्वराज्याच्या निकट येत नाही तोवर गाफील असल्याचे सोंग घ्यायचे."
"जनतेत अफवा पसरवा की, फत्तेखान युध्दासाठी नाही तर कोंढाण्याचा किल्लेदार म्हणून येत आहे. त्यामुळे जनतेत धांदल उडणार नाही. तो जवळ आला की, पवित्रा बदलवू. बहिर्जी पथक या युध्दात झोकून द्या. हेरच या युध्दाचा निकाल करतील."
"आम्ही राजगडावरुन पुरंदरला जातो त्या मुळे त्याला सरळ स्वराज्यात घुसता येणार नाही आणि मोहिमेबरोबरच आबासाहेबांकडेही लक्ष असू द्या. आम्ही मातोश्रींना सांभाळतो."
चारही बाजूंनी संकटांनी घेरल्यावर सुध्दा, इतके संयमी राजेंना बघितल्यावर नाईकांना धन्यता वाटली.
या स्थानी थोडेसे विवेचन आवश्यक आहे. युद्धतंत्र कसे असावे याचेच हे उत्कृष्ठ उदाहरण आहे म्हणून आवर्जून देत आहोत.
पांच "शाह्या" विरुद्ध शिवरायांचा हा उठावच तर होता ना ? उठाव फसला तर त्यास बंड म्हणून हिणवले जाते; आणि यशस्वी झाला तर क्रांति म्हणून गौरविले जाते. म्हणूनच कोणत्याही युद्धाचे किंवा क्रांतिचे तीन चरण लक्षात घ्यायला हवेत.
(१) युद्धपूर्व (२) प्रत्यक्ष युद्ध (३) युद्धोत्तर । यापैकी कोणत्याही स्तरावर युद्ध हारण्याची शक्यता असतेच. आता शिवराय आणि बहिर्जी पथकाची रणनीती बघा. युद्धपूर्व काळात बुद्धिबळाप्रमाणे मोहरे हलवणे सुरू केले आहे. महत्वपूर्ण स्थानी प्रहार करायचं ठरलं आहे. ऐन वेळी शत्रूला धोबीपछाड देऊन खच्ची करून पराभूत करायची ही योजना आहे. या योजनेतील प्रथम चरणाचे दायित्व बहिर्जीनी राजाज्ञेने स्वीकारून उत्तम प्रकारे पार पाडलंय. *** द्वितीय चरण म्हणजे प्रत्यक्ष युद्ध ! ऐन वेळी पलटी मारून विजयावर अक्षरशः झडप आहे या योजनेत. त्यासाठी अफवा पसरवून शत्रूस गाफील ठेवणे आहे. शेवटचा चरण म्हणजे युद्धोत्तर स्थिती. यावर पूर्ण नियंत्रण शिवाजी महाराजांचे आहे. या प्रस्तुतिचा तो विषय नाही; म्हणून त्यावर विवेचन करणे टाळीत आहोत.
पति शत्रूच्या बंदिवासात, थोरल्या व धाकट्या पुत्राला शत्रूने घेरलेले, या बातम्यांनी राजेंचे प्रेरणास्थान असलेल्या मातोश्री मनाने प्रचंड खचल्या. विशाल फौज घेऊन फत्तेखान स्वराज्यावर चालून येत होता. राजेंपुढे मोठी आव्हाने होती. अशा परिस्थितीत रयतेत घबराहट पसरु नये म्हणून राजे स्वतः सकारात्मक राहून खबरदार राहत होते. मुजरा करुन नाईक जाण्यास उठले असतां, राजे म्हणाले,
"स्वराज्या बरोबर स्वतःचीही काळजी घ्या नाईक."
संकटांनी घेरलेल्या या महामानवाच्या मुखातून निघालेल्या प्रेमळ शब्दांनी नाईक गहिवरले. डोळ्यातील अश्रू मागे परतवत नाईक निघून गेले. आतां बराच काळ आपला परम मित्र नजरेपासून दूर राहील ही हुरहूर दोघानाही होतीच.
कोंडाण्याला विशाल सेनेसह निघालेल्या फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसरे या वस्ती पासून कांही अंतरावर तळ टाकला होता. रात्रीच्या वेळी कांही सैन्य वस्तीत शिरुन, धनधान्य लुटत होते, स्त्रियांना ओरबाडत होते. सगळीकडे एकच हाहा:कार माजला होता. वृध्द, बालके; पोरं, बायका, माणसं वाट दिसेल तिकडे पळत सुटले होते. कित्येक स्त्रिया अब्रू रक्षणार्थ विहिरी जवळ करीत होत्या.
अशाच एका घरात बाहेरचा आरडाओरडा ऐकून एका महिलेस आलेल्या संकटाची जाणीव झाली. धाकटी बहीण गंगा व आई भीतीने थरथरत होत्या. अंगणात झोपलेल्या वडिलांची शेवटची आर्त किंकाळी तिघींनीही ऐकली होती. सहजासहजी दरवाजा उघडूं नये म्हणून दरवाज्याला मोठे अडसर लावले होते. बाहेरुन दरवाज्यावर सतत धडका बसत होत्याच. अखेर दरवाजा कोलमडून पडला. सशस्र सैनिक घरांत घुसले. तिघीही मोठमोठ्याने किंचाळू लागल्या. त्या केविलवाणेपणाने आपल्या जीवाची, अब्रूची भीक मागत होत्या, त्याने ते नराधम आणखीनच चेकाळत होते. राक्षस पुढे सरकत होते.
दरम्यान झपझप चालत सारंगाने जंगलातील बरेच अंतर कापले होते. सुभानमंगळच्या आसपास जंगलात सैन्यांना लपण्यासाठी मोक्याच्या जागा बनवायला राजेंनी सांगीतले होते. वेळेच्या आधीच काम पूर्ण झाल्याच्या समाधानात मनी कांही विचार करीत चालत असतांनाच त्याला कसला तरी सळसळणारा आवाज कानी पडला बहिर्जी पथकात काम करणार्या प्रत्येक हेराचे ज्ञानेंद्रिय सदैव जागृत असे. त्यांना प्रशिक्षणच तसे दिले जायचे. त्याला खात्री झाली, नक्कीच जवळपास कुणीतरी लपलेले आहे.
आपल्यावर कुणी पाळत तर ठेवत नसेल? पण विजापूरचे हेर इतके दक्ष नाहीत आणि ते जंगलाच्या दिशेने फिरकणारही नाही. मग कोणी पशू असता तर त्याचा गंध या शिवरायाच्या हेराच्या नाकाने नक्कीच ओळखला असता. शेवटी त्याने दरडावलेच.
"कोण आहे? बर्या बोलाने लवकर बाहेर ये."
त्याला बहिर्जी पथकाच्या गुप्तस्थळी जायचे असल्यामुळे, कुणी पाठलागावर तर नाही ना ही खात्री करुन घ्यायची होती. तो तलवारीने झुडपांवर प्रहार करुं लागला. तोच एका झुडपाच्या आडोश्याकडून एक स्रीची किंकाळी आली. बाभळीचे काटे तिच्या मांड्यात रुतले होते. जखमांमधून रक्त वाहत होते. विव्हळत, घामाघूम, घाबरलेल्या कावेरीच्या अंगावर सगळीकडे रक्त उडालेले ! तिने नक्कीच कुणाला तरी मारले होते. सारंगाने पटकन खड्ग खाली टाकले व तिच्या अंगातील रुतलेले काटे काढू लागला. त्याच्या तलवारीच्या प्रहाराने बाभळीचे काटे तिच्या शरिरात घुसले होते. तो अपराधी भावनेने तिची क्षमा मागू लागला. त्याची विनयता बघून तिची भीती नष्ट झाली. उठण्याचा प्रयत्न गेला पण तिला ते शक्य झाले नाही. थरथरत ती तशीच बसून राहिली.
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - १८.
कावेरीची अवस्था फारच वाईट होती. तिने न सांगताही तिच्या स्थितीचा अंदाज आला होता. अशा भयाण जंगलात एकटी स्री उगाच नाही फिरकणार! फत्तेखानच्या सैन्याच्या अत्याचारातून ही निसटून, जीव वाचवत या जंगलात पोहोचली असेल. आणि सारंगाचा लुटारुसारखा अवतार बघून ती आणखी घाबरली असेल. तिला पाणी पाजण्यासाठी जवळ काहीच नसल्यामुळे, तिलाच उचलून ओढ्याकडे नेऊ लागला तोच त्याला झाडाच्या आडोश्याला कुणी तरी लपले असल्याचे जाणवले. त्याने आजूबाजूला नजर फिरवली पण कुणीच दिसले नाही. तिला तो ओढ्याजवळ आणून पाणी पाजू लागला. पण तो अत्यंत सावध होता. प्रत्येक बारीक आवाजावर त्याचे कान लागले होते. कावेरी आतां थोडी सावरली होती. ती म्हणाली,
"खूप उपकार झाले तुमचे...! या भयाण जंगलात देवासारखे धावून आलात."
कावेरीच्या बोलण्याने सारंगाच्या चेहर्यावरचे भाव जराही बदलले नाहीत. शिवरायांच्या हेरांचे हे खास वैशिष्ट्य होते. सर्व भावना त्यांच्या अधीन असतात. इच्छेविरुध्द ते हसू, रडू, किंवा कोणतेही भाव चेहर्यावर उमटू देत नाहीत. बहिर्जी हेर पथकात सामील होण्यापूर्वीच स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे धडे गिरवावे लागत असत. सारंग म्हणाला,
"जवळच्या गावात कुणी नातेवाईक असेल तर तिथे पोहचवून देतो."
त्यांचे बोलणे सुरु असतांनाच दोन वेळा घुबडाचा आवाज आला. तो वातावरणातील हालचाली पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागला. परत तीन वेळ घुबडाचा आवाज ऐकल्यावर, सारंगाने जवळचे दोन दगड उचलून विशिष्ट प्रकारे दोन्ही दगड एकमेकांवर आपटले. याचा अर्थ बहिर्जी पथकातील सांकेतिक भाषेत "तुम्ही समोर येऊ शकता." तीन वेळा घुबडाचा आवाज म्हणजे कांही अडचण आहे का? "
कोण होता तो हेर? सारंगने तोंडातून विशिष्ट आवाज काढला, अर्थ होता,
"जवळ या."
कावेरीला हा प्रकार नवीन होता, तिला कांहीच उमगत नव्हते. खरं म्हणजे ती अजूनही सावरली नव्हती. घडलेले प्रसंग सारखे डोळ्यासमोर उभे रहात होते. पूर्ण भानावर आल्यावर, आपल्या कुटुंबातील कुणीही जिवंत नाही हे आठवून ती रडू लागली. तिच्याशी तो कांही बोलणार तोच, हेर कंदिल घेऊन समोर आला आणि त्याने विचारले ,
"सारंगा काय झाले? कोण ही स्री?"
तो हेर पूर्णपणे विजापूर सैन्यवेषात होता. सारंगाने निरखून बघितल्यावर, त्याने त्या हेराला वाकून नमस्कार केला.
"नाईक, डोंगरापलीकडच्या गावात आदिलशाही सैन्यायाने घुसून खूप लूटमार केली. गांव उध्वस्त केले. या स्रीच्या कुटुंबातील कुणीच जिवंत राहिले नाही. ही कशीबशी जीव वाचवून जंगलात... "
"नाही.. नाहीऽऽ मी जीव वाचवून पळून नाही आले, तर त्या नराधमाला संपवून आले. त्या राक्षसांनी माझ्या आई व बहिणीच्या शरीराचे लचके तोडले. त्या दोघी व माझी अब्रू नाही वाचवू शकले, पण त्या नराधमांना नरकात ढकलून आले."
"कायऽऽ ?"
कावेरी सांगू लागली...
"चार हत्यारबंद विजापुरी सैनिक दरवाजा तोडून आत घुसले. आम्ही विनवत, अब्रूची भीक मागत राहिलो. आम्हाला जाऊ द्या म्हटल्यावर, असं कसं जाऊं देऊ? आम्ही सह्याद्री लुटायला आलोय, तर हर एक वस्तु लुटून नेणार!" असं बोलू लागले. तेव्हा आई म्हणाली, तुम्ही माझे वाटेल तसे हाल करा, पण माझ्या दोन्ही मुलींना सोडा" -- आणि असे म्हटल्याबरोबर एकाने तिचे केस धरुन ढकलले, तिचा तोल जाऊन तिचे डोके दगडी वरवंट्यावर आपटल्याने, ती बेशुध्द पडली रक्त वाहत होते. बिचारी आपल्या मुलींचे रक्षण नाही करुं शकली. दोन्ही मुलींच्या डोळ्यासमोर बेशुध्दावस्थेत असलेल्या आईवर एकाने बलात्कार केला. नंतर दोघींकडे वळले. दोघींनी ही ओरडून मदतीसाठी टाहो फोडला पण, गावात एकही मर्द उरला नव्हता. कावेरी कसे तरी अत्याचार सहन करीत होती, पण लहान बहीण गंगा अत्याचारा दरम्यानच गतप्राण झाली. आई तर आधीच गेली होती. कावेरी सुन्न नजरेने दोघींच्या नग्न कलेवराकडे बघत होती. दोघींच्याही अंगावर माराच्या, चावल्याच्या, क्रूरतेच्या खुणा दिसत होत्या. त्या दैत्यांनी गंगाच्या ओटीपोटाच्या आसपासची, दंडावरची चामडी दातांनी सोलून काढली होती. चेहरा ओठापासून गालाच्या हाडापर्यंत फाडला होता. तिचा अंत अतिशय वेदनामय व क्रूररित्या झाला होता."
ते नराधम आळीपाळीने कावेरीवर बलात्कार करत होते. त्यांचा राक्षसी उपभोग घेऊन झाल्यावर, तिला मारुन टाकण्यासाठी तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. सुटण्यासाठी कावेरी हातपाय आपटत असतांनाच तिच्या हाती तलवार लागली. क्षणार्धात तिच्या अंगावर वाकून गळा आवळणार्याच्या कमरेत तिने तलवार घुसवली. त्याची पकड ढिली पडल्याबरोबर तिने पटकन उठून त्याच तलवारीने त्याचा गळा चिरला. हे पाहतांच तिघेही तिच्यावर धावून येत असतां एकजण गंगाच्या पार्थिवाला अडकून पडल्याबरोबर कावेरीने त्याचाही गळा चिरला. तिसर्याला भिंतीवर ढकलले, चौथा कपडे घालत पळण्याच्या बेतात होता.
भिंतीवर आदळलेला सैनिक विवस्र होता. तो बाजूला पडलेल्या तलवारीजवळ पोहचण्याच्या प्रयत्नात असतांनाच कावेरीने आईच्या डोक्या जवळचा वरवंटा उचलून त्याच्या डोक्यात घातला. अशी कहाणी तिच्या तोंडून ऐकल्यावर सगळेच सुन्न झाले.
एकट्या स्रीने आपल्या तीन साथीदारांना संपवल्याचे बघून चौथा तलवार घेऊन तिच्याकडे आला असतां, तिने सर्व शक्तीनिशी हातातील तलवार त्याच्या मानेत घुसवली.
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - १९.
त्या चारही आदिलशाही राक्षस सैनिकांना मारुन, कावेरीने कांही अंशी आपला प्रतिशोध घेतला. आई व बहिणीचे पार्थिव देह झाकले. डोळ्यातील अश्रू आटले होते. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला. सैनिक येण्याच्या आत ती मागच्या दाराने बाहेर पडली.
कावेरीने कथन केलेला ह्रदयद्रावक प्रसंग ऐकून नाईक व सारंग सुध्दा हेलावून गेले. नाईक म्हणाले,
"खरोखर तूं माॅं दुर्गेचे रुप धारण केले होतेस तू मुली!" त्यांना तिच्याबद्दल अनुकंपाही वाटत होती व शौर्याचे कौतुकही!
"मी फक्त चारच लांडगे मारु शकले, पण या मुलखात असे असंख्य लांडगे कधीही येतात, गरीब रयतेची पिळवणूक करतात. द्रव्य, व बायकांची अब्रू लुटतात. पण या सैतांनांचा कोण विनाश करणार?"
"अगऽ! या दुष्टांना संपवण्यासाठीच सह्याद्रीच्या पोटातून शिवाजीराजे नावाचा लाव्हारस बाहेर पडला आहे."
सांरगचे हे बोलणे ऐकून तिला थोडा दिलासा मिळाला, पण नाईकांच्या अंगावर शत्रुसैन्याचा पोषाख बघून ती बुचकाळ्यात पडली. तिच्या मनीचे भाव ओळखून नाईक मोठ्या कष्टाने म्हणाले,
"मी विजापूरच्या सैन्यात चाकरी करतो" "अशक्य! पटत नाही."
"ठीक आहे. योग्यवेळी तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल."
"नाही.. मला आतांच उत्तर हवंय."
तिने हट्टच धरला. खरे तर तिला बहिर्जी पथकात सामील करुन घ्यायचा विचार नाईक करीतच होते. तत्पूर्वी तिच्या मनाचा सखोल अंदाज त्यांना घ्यायचा होता.
नंतर नाईकांनी कावेरीची पूर्ण परीक्षा घेऊन तिला बहिर्जी-पथकात सामील करुन घेतले व स्वतःची ओळखही दिली. कावेरीला फत्तेखानचा प्रतिशोध घेण्याची संधी प्राप्त झाली. बहिर्जी पथकासाठी संपूर्ण जीवन ओवाळून टाकण्याची शपथ घेतली. नाईक म्हणाले, "सारंगा, ही सतत तुझ्यासोबत राहून काम करेल. तिला प्रशिक्षित करायचे. तिच्याशी प्रत्यक्ष लग्न न करतां ती तुझी पत्नी आहे असे लोकांना वाटायला हवं."
"पण नाईक, ही एक स्री; आणि, माझ्या सार्या मोहिमा घनदाट जंगलातल्या असतात."
"ती आत्मरक्षण करण्यास सक्षम आहे. तुझ्याबरोबर राहिल्याने तुला यशच मिळेल. कारण ती शत्रूगोटातून अति- महत्वाच्या बातम्या आणि किल्ल्याच्या वाटाविषयी अचूक माहिती मिळवू शकेल."
"पण नाईक, एका स्रीला शत्रूगोटातून घेऊन जाणं...."
"प्रथम तूं डोक्यातून काढून टाक की, ती स्री आहे. ती आहे, शिवाजीराजे आणि जिजाऊ साहेबांच्या स्वराज्यातील रागिणी! कावेरी, आजपासून तुझं नाव "रागिणी" असेल."
"खूप छान. आवडले मला."
नाईक म्हणाले,
"तूं एक दिवस फार मोठी मोहीम फत्ते करशील."
"नाईक, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात. माझ्या कुडीत प्राण असेपर्यत तुमचा विश्वास सार्थ करुन, स्वराज्याचे रक्षण करेन."
किती सहजतेने कावेरीने स्वतःचे व परिवाराचे उध्वस्त दुःख मागे सारले. परिवारातील जिवलगांचा इतका ह्रदयद्रावक अंत तिच्या नजरेसमोर झालेला बघून सुध्दा, ती बहिर्जी पथकात सामील झाली. नुकत्याच झालेल्या ओल्या यातना विसरुन ती स्वराज्य मोहिमेवर निघाली.
जंगलाच्या मध्यभागी गर्द झाडीतील एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका गुफेसमोर कित्येक महिन्यापासून पेटलेल्या धुनीसमोर एक नागा साधु चिलमीचे झुरके घेत बसला होता. संपूर्ण अंगावर राख फासलेली, लंगोटी शिवाय दुसरे वस्र नव्हते, गळ्यात रुद्राक्ष माळा, नखे व व जटा वाढलेल्या, समोर एक त्रिशूळ; जवळच खंड्या नावाचा काळा कुत्रा बसलेला !.
नाईक, सारंग आणि कावेरी तिथे पोहोचले. हे बहिर्जी पथकाचे गुप्त स्थान होते. हा नागा साधू देखील बहिर्जी पथकाचा हेर होता. त्याने हे घेतलेले सोंग आयुष्यभर धारण करुन, या स्थळाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. सह्याद्रीच्या चोहो बाजूंनी, चारही दिशांनी अशी गुप्त स्थाने निर्माण केली होती, या गुफांमधे तळघरं असत. गुफेतून तळघरात जाण्याचा मार्ग नवख्या व्यक्तीला कधीच सांपडणार नाही अशी व्यवस्था केली होती. प्रत्येक गुप्तस्थळ निर्मितीत सारंगचे फार मोठे योगदान होते.
बहिर्जी पथकातील काही हेरांचा थेट संबध राजेंशी आणि फार मोजक्या व महत्वाच्या लोकांशी होता. बाकी सर्व हेर आपले संपूर्ण जीवन समर्पित करुन, स्वराज्याचे हात बळकट करीत होतेच. नागासाधुने विचारले,
"नाईक, ही स्री?"
"ही रागिणी! आपल्या पथकात नवीन सामील झालेली."
लगेच तिने त्या नागा साधूला झुकून नमस्कार केला.
"रागिणी, गुफेच्या उजव्या बाजूस कुंड आहे, स्नान करुन गुफेत आराम कर! पहाटे तुझ्या परिवाराचा अंत्यविधी आटोपून सारंग व तू, ठरल्याप्रमाणे शिरवळच्या मोहिमेवर निघायचे आणि एक लक्षात ठेव... वैयक्तिक भावनांना स्वराज्य हेरांच्या जीवनात तिळमात्र जागा नाही. आपल्या सार्या भावना माता भवानीसाठी. प्रेम म्हणजे शिवाजी राजे, कर्तृत्व म्हणजे गोपनीयता! आपण सामान्य असूनही असामान्य आहोत. आपण नियतीला मुठीत घेतले आहे." हा मूलमंत्र नाईकांनी तिला समजावून सांगीतला.
क्रमश: आपल्या लक्षांत येऊ लागलं असेल आता -- की बहिर्जीनी माणसे कशी निवडली ? कशी पारखली ? कशी प्रशिक्षित केली ? तरबेज केली ? ही सगळी खरोखरच रत्ने होती -- आणि त्यांच्यासाठी जणू व्रतच बहिर्जीनी घालून दिलं होतं - - -
"दावितील शिवराय - त्या पंथे मी जाईन ।
उमटतील पाऊले त्यांची - त्या धुळीत मी न्हाईन ।।"
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - २०.
नाईकांनी दिलेला बहिर्जी पथकाचा "मूलमंत्र" ऐकून निश्चयी स्वरात कावेरी म्हणाली "जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत या पथकाचा मूलमंत्र मी कायम लक्षात ठेवेन." उत्कृष्ट हेर होण्याची तिची तळमळ नाईकांनी ओळखली. तिला स्नान व विश्रांतीसाठी पाठवून दिले. कावेरीच्या रुपात एक पराक्रमी महिला हेर बहिर्जी पथकाला लाभल्याचा मनस्वी आनंद नाईकांना झाला. तेथील खडकावर नाईक व सारंगने अंग टाकले. पडल्या पडल्या नाईक विचार करत होते, कांही दिवसात फत्तेखान चालून येणार. स्वतः नाईकांनी त्याच्या शिबिरात जाऊन फत्तेखान व हैबतरावाला पारखले होते. पुढचे पाऊल उचलण्यासाठी त्यांनी पन्नास हेर नेमले होते, ते सारे दोन दिवसांत नाईकांना भेटणार होते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाजी हैबतराव शस्राभ्यास करीत होता. तेवढ्यात छावणी रक्षकाने कांही धोका असल्याचा इशारा केला. बाळाजीने उंच मनोर्यावर चढून पाहिले असतां, ५०-६० सशस्र सैनिकांसह एक घोडे स्वार छावणीकडे येतांना दिसला. ही शिवाजी राजेंची कांही चाल असेलसे वाटून, सर्व सैनिकांना त्याने सतर्क राहण्यास सांगितले. फत्तेखान निद्रिस्त होता, केवळ ५०-६० सैनिकांसाठी त्याची झोपमोड करणे त्यास उचित वाटले नाही. एवढ्यात एका सैनिकाने ओरडून सांगितले,
"त्या घोडेस्वाराने पांढरा ध्वज उंचावला आहे."
"म्हणजे ते युध्द- हेतूने आले नाही तर? कोणी वतनदार आपल्या सैन्यात दाखल व्हायला आला असावा."
"घेऊन या त्याला आमच्यासमोर."
स्वार आल्यावर हैबतरावांना नमस्कार केला व स्वतःची भीमाजी देशपांडे म्हणून ओळख दिली तो सरळ मुद्यावर येऊन सांगू लागला...
"शिवाजी भोसलेंनी आम्हाला पुरंदरचा किल्लेदार बनवण्याचे आश्वासन दिले होते, पण ऐनवेळी त्यांनी शब्द फिरवला. त्यांनी विश्वासघात केल्याने किंवा वेळेवर आम्हाला शहाणपण सुचले म्हणा, किंवा कदाचित आपली भेट घडायची असेल, म्हणून तुम्हाला सामील होण्यास आलोय."
बाळाजी म्हणाले,
"आमचे प्रचंड सैन्य आहेच; शिवाजींवर सहज विजय मिळवू शकतो असे असतांना तुमच्या ५०-६० सैन्याने काय फरक पडेल?"
भीमाजी म्हणाला,
"आम्हाला शिवाजींचे सारे बारकावे माहित आहे हे पुरेसे नाही का?"
"ठीक आहे. आतां आमच्याशी द्वंद करुन स्वतःच्या ताकदीचा परिचय द्या."
दोघेही मैदानात उतरले. दोघांची स्पर्धा चांगलीच जुंपली, कुणीच कुणाला हार जात नव्हते. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. बाळाजीस; आपल्यापेक्षा वरचढ होत असलेला भीमाजी -- सहन होणे शक्यच नव्हते. बाळाजी आणखी त्वेषाने तलवार चालवू लागला. पण त्याच्यापेक्षाही सरस वार भीमाजी करत होता. भीमाजी त्याचे सर्व वार परतवून लावत होता. शेवटी भीमाजीच्या एका जबरदस्त वाराने हैबतरावच्या तलवारीचे दोन तुकडे झाले. भीमाजीने त्याच्या छातीवर जोरदार धडक दिल्याने हैबतराव खाली पडला. त्याचा चेहरा धुळीने माखला गेला. तो त्वेषाने उठणार तेवढ्यात भीमाजीने त्याच्या गळ्याला तलवारीचे टोक लावले. इतक्यात टाळ्यांचा आवाज आल्याने त्या दिशेला बघितले तर स्वतः फत्तेखान होता. एका सेवकाने फत्तेखानला खबर दिली होती की, शिवाजीराजेंवर असंतुष्ट होऊन भीमाजी देशपांडे नावाचा सरदार आला असून त्याची परीक्षा घेण्यासाठी बाळाजीने आव्हान केल्यामुळे दोघांत चांगलीच चुरस सुरु आहे हे ऐकून फत्तेखान मैदानात आला होता. -----
"वाऽऽ ! भीमाजी! क्या तलवारबाजी है? आमच्या सैन्यात तुम्हाला सामावून घेत आहोत."
भीमाजीने त्याला कमरेत वाकून नमस्कार केला. आत्ताचे हारणे हैबतरावाच्या जिव्हारी लागले. पण प्रसंगानुसार त्याने पवित्रा बदलला. तो म्हणाला ---
"भीमाजी, तुम्ही एक पराक्रमी योध्दा आहात. तुमच्यासारख्या वीरावर शिवाजींनी अन्याय केलाच कसा?"
"आम्हाला याचाच तर प्रतिशोध घ्यायचा आहे," भीमाजी म्हणाले.
फत्तेखान मनोमन आंनदित झाला, खास शिवाजी गोटातील अति-पराक्रमी सरदार आपल्याकडे आल्याचा! आतां आपला विजय नक्की आहे ते ही सैन्यहानी जास्त न होता !
"भीमाजी, तुम्ही शिवाजीला पकडून देण्यास आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हची शिफारस करुन कोंडाण्याची किल्लेदारी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो."
"माझ्या मनातलं बोललात हुजूर!" येवढ्यात त्याला एकाने येऊन सांगितले की, शिवाजी पुरंदरवर पोहचले. त्याला बक्षिस देऊन तो म्हणाला,
"मला शिवाजींची प्रत्येक खबर मिळायला हवी!"
त्यावेळी तिथे ----- गाण्याची मैफील सुरु होती.पण भीमाजी भाग न घेता एका पहारेकर्याशी बोलत होते. तो बहिर्जी पथकाचा हेर होता. सांकेतिक भाषेत फत्तेखानच्या हेरावर लक्ष ठेवण्यास सांगीतले. भीमाजीच्या वेषातील ते स्वतः बहिर्जी नाईक होते. पहारेकर्याला रात्रीच निघण्यास सांगून भीमाजी छावणीकडे निघून गेले.
क्रमशः🙏🙏🙏🙏
(वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )
