Ad Code

Responsive Advertisement

बहिर्जी नाईक | Bahirji Naik Part 36 to 40 | बहिर्जी नाईक भाग ३६ ते ४०

 !!! बहिर्जी नाईक  !!! भाग ३६ ते ४०


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

भाग १ ते ५

भाग ६ ते १०

भाग ११ ते १५

भाग १६ ते २०

भाग २१ ते २५

भाग २६ ते ३०

भाग ३१ ते ३५

              

भाग - ३६.


रघुनाथ बल्लाळांनी सेनेसह राजपुरीत

छावणी टाकली होती. सिद्दींना किनार्‍यावरुन हाकलून राजपुरीवर ताबा मिळवला होता. कोकणवासियांना व स्वराज्यास त्रास देणार नाही असा तह झाला, पण त्यांचेवर विश्वास ठेवता येणार नव्हता. त्यांच्या कायमच्या बंदोबस्तासाठी अधिक सैन्य तुकडी मागवावी असे त्या गांवच्या  संभाजी पाटलांचे म्हणणे होते, पण जंजिरा लढवतांना बरीच हानी झाली होती. जंजिरा सोडून बाकी आसपासचा किनारी भाग स्वराज्याशी जोडला होता. सध्या एवढी जरब सिद्दयांना पुरेशी होती.

            

सैन्य माघारी परतल्यामुळे संभाजी पाटील हिरमुसले. कारण त्यांंचा मुलगा रामजी याची सिद्दी जाफरने हत्या तर केलीच; पण त्याच्या मृत देहाला भाल्याने भोसकले व डोळे काढले होते. ही त्याच्या शवाची विटंबना त्यांना सलत होती. रघुनाथ बल्लाळच्या तंबूतून बाहेर पडून संभाजी एका बाजूला असलेल्या मोरोबांच्या जवळ जाऊन त्यांस  रघुनाथपंताचा निरोप त्यांनी  सांगितला.


राजेंच्या सूचनेनुसार मोरोबांना मार्गदर्शक म्हणून रघुनाथ बल्लाळांनी त्यांना सोबत घेतले होते. मोरोबा म्हणाले,

"सगळेच सिद्दी जंजिर्‍यात लपून बसलेत. उद्या राजपुर सोडतांना पुन्हा जनतेवर अत्याचार करतील." आणि या विचारानेच  ते अस्वस्थ झाले होते.

             

मोरोबा नावाने सैन्यात वावरणारे सावजी होते. ते शिवरायांचे गुप्तहेर आहेत हे कुणालाही माहीत नव्हते. युध्दसमयी राजपुरी परिसर, वाटा, व सिद्द्यांच्या डावपेचांची माहिती  त्यांनीच तर रघुनाथरावांना पुरविली होती. पण जंजिरा हाती आला नाही म्हणून ते हताशही  झाले होते. जंजिरा मोहीम सावजीवर सोपविल्यावर ते श्रीवर्धनवरुन राजापुरीत राहायला आले होते. अवघ्या दीड महिन्याच्या वास्तवात त्यांनी सिद्दयांचे आचार विचार, त्याची मजबूत व कमकुवत बाजू जाणून घेतली होती. शिवरायांच्या आज्ञेवरुन सावजी मुस्लिम व्यापार्‍याचा वेष धारण करुन राजापुरीत दाखल झाले होते; आणि  पेठेत फिरत होते. राजापुर घेरण्यासाठी त्यांनी सुयोग्य रस्ते शोधून ठेवले होते. कारण शत्रूची पूर्ण ताकद ओळखल्यावरच राजे मोहिमेची आखणी करीत असत. 

      

एक दिवस सावजी असेच फिरत असतांना, आवजी व हिरोजी; एका मुलीला सोडण्याबाबत हबशी सैनिकांची विनवणी करीत होते व हबशी त्यांना चाबकाने मारत होते. त्या हबशी अधिकाऱ्याने या दोघांना पोत्यात घालून दर्यात सोडण्याची सेवकास आज्ञा दिली. हिरोजीची पत्नी, मुलगी व मुलगा आर्त स्वरात रडत होते. सावजीचे हृदय हे दृष्य बघून हेलावले. पण हेरांना मनावर ताबा ठेवण्याचे प्रशिक्षण मिळालेले असते. त्यांना आवजी हिरोजीला सोडवण्याची तीव्र इच्छा झाली; पण संपूर्ण कोकणवासीयांचा विचार करुन त्यांनी मोठ्या मुष्कीलने स्वतःवर  संयम ठेवला.

           

अधिकारी म्हणाला, 

"याच्या बायकोला जंजिर्‍यास पाठवा गुलाम म्हणून विकता येईल व मुलीला माझेकडे राहू द्या." 

      

मुलगा आईला नेणार्‍या घोड्यामागे ठेचकाळत धावत होता, पडत होता पुन्हा उठून धावत होता. आपल्या समोर घडत असलेला अत्याचार बघूनही या परिवाराला वाचवू शकत नसल्याचे सावजीला अतिशय दुःख झाले पण मुलीला वाचवण्याचा मात्र निश्चय केला. मोहिमेवर असणार्‍याने नियोजनाबाहेर वागायचे नसते हे जरी खरे असले तरी, शिवाजींचा योध्दा असले निंद्य प्रकार डोळ्यासमोर घडत असलेले बघून ते दृष्कृत्यही डोळ्याआड करु शकत नव्हता.

           

सावजी त्या हबशी अधिकार्‍याचा पाठलाग करत त्याच्या निवासस्थानापर्यत पोहोचले, तेव्हा त्यांना दिसले की, ती पंधरा वर्षाची काशीबाई नावाची मुलगी त्या हबशी अधिकार्‍याच्या तावडीतून कशीबशी निसटून जंगलाच्या दिशेने पळाली आहे. त्या अधिकार्‍याचे दोन सैनिक तिचा पाठलाग करीत होते. अंतर फार कमी होते. अनवाणी पायांना होत असलेल्या जखमांची पर्वा न करतां धावत ती एका विशाल वटवृक्षाच्या आडोश्याने लपून उभी होती. भयंकर धाप लागली होती. ग्लानी येत होती. ते सैनिक तिच्याजवळ पोहचणार एवढ्यात दोघांच्या पाठीत दोन खंजीर वेगाने येऊन घुसले व ते खाली कोसळले. सावजींना बघून ती मुलगी पळण्याच्या बेतात असलेली बघून सावजी म्हणाले,

"घाबरु नकोस. तुझ्या पाठलागावर असलेले सैनिक मारले गेले आहेत. 

तिचे भय कमी झाले. सावजींनी तिच्या पायांच्या जखमेवर रुईची पाने बांधली. ती परिवाराची आठवण काढून रडू लागली.

"रडू नकोस बाळा, वेळ फार कमी आहे. शोक करायलाही वेळ नाही. प्रथम इथून बाहेर पड." 

"पण जाऊ कुठे? " 

"राजापुरीतून बाहेर पडली की, एक दर्गा दिसेल. तिथे एक वृध्द फकीरबाबा दिसतील, त्यांना भेटून सांग, 

  

"सैयद असीम अलीखानने आश्रय देण्यास सांगितले आहे. असे सांगितलेस की, ते तुला सुरक्षित ठिकाणी पोहोचवतील." 


तिची संशयित नजर पाहून ते म्हणाले, 

"विश्वास ठेव! मीच नेले असते, पण याहीपेक्षा महत्वाचे काम राजपुरीत आहे." तिला विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 

   

यानन्तर शत्रूच्या खास गोटात सावजीनी नियोजनपूर्वक कसा शिरकाव करून घेतला -- हे पुढील भागांत येईल. 

     

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

               

भाग - ३७. 


राजेंचे हेरखाते (आणि सर्वच खाती) किती क्षमतावान होते -- हे या प्रस्तुतिमध्ये दिसून येईल आपल्याला ! याचं प्रमुख कारण एकच ! सर्वांपुढे ध्येय होते. त्यासाठी कठोर प्रशिक्षणाच्या दिव्यातून सर्वजण तावून सुलाखून निघाले होते. सर्वांचीच विचारक्षमता अद्वितीय अशीच होती. त्यात तर्कशुद्धता होती. त्यांचं मंदिर होतं "स्वराज्य ! "दैवतं" होती -- शिवाजी राजे आणि जिजाऊ ! म्हणूनच या सर्व इतिहासाचा मागोवा घेत गेलो तर -- अनावश्यक तर्कटे न लढवता; अहंकाराची त्याला धग न लागू देता; स्वतःच्या प्रज्ञेने ते सर्वजण निर्णय घेत असत हे लक्षात येतेच !  इथे "बुद्धी"ने निर्णय असं म्हणणं आम्ही जाणीवपूर्वक टाळलं आहे. प्रज्ञा हाच शब्द योजिलेला आहे. कारण प्रज्ञा ही बुद्धीच्याही पलीकडची असते. शिवरायांच्या प्रत्येक खात्याच्या याच गुणांमुळे आपण संशयाची वावटळ न उडवता; त्यांच्या इतिहासाचा सौरभ आकंठ घेऊ शकतो; आणि म्हणूनच आपला हृदय-गाभारा सुगंधित होऊन जातो. याचंच प्रत्यंतर आपण पुढील सर्वच प्रस्तुतींमधून घेणार आहोत. आता मागील कथानक पुढे बघू. 🚩


सिंधुसागराने चारही बाजूंनी वेढलेल्या  अभेद्य जंजिरा किल्ल्यात दोन हबशी सैनिकांची हत्या केल्याच्या आरोपावरुन, साखळदंडाने पाठीमागे हात बांधून, गळ्यात काटेरी वर्तुळाकार चक्र घालून, आतल्या बाजूने धारदार पातं, ज्यामुळे गळ्याच्या नसा कापण्याचा संभव असल्यामुळे, सावजींना खाली मान घालून कैदी अवस्थेत सरदार फताहखानासमोर आणण्यात आले. कदाचित त्यांना क्रूर शिक्षेला सामोरे जावे लागेल. सैनिकाने त्यांना पकडले तेव्हाच शिक्षा देण्यात आली असती, पण त्यांचे नाव त्यांनी 'सय्यद असीम अली खान' सांगितल्यामुळे राजपुरीहून जंजिर्‍यास आणले होते. फताहखानला सावजी म्हणाले, 

"मालिक, मी सैनिकांना ओरडून सांगत आहे, मी तुमचा शत्रू नाही, मी कुणाही तरुणीला वाचवलं नाही. मी फक्त आत्मरक्षणासाठी हत्या केली, पण हे सैनिक ऐकून घ्यायलाच तयार नाहीत." 

"तरी सुध्दा तुला शिक्षा होईलच."

निर्भिडपणे सावजी म्हणाले, 

"याचा परिणाम वाईट होईल." 

"आम्हाला धमकी? इतनी जुर्रत? आजवर या जंजिर्‍या किल्ल्यात येऊन आमच्या समोर बोलण्याची कोणाची हिम्मत झाली नाही." फताहखान स्वतःला जंजिर्‍याचा राजा समजत असला तरी, होता तर तो केवळ  मांडलिकच!

"मालिक, धमकी नाही. अदबसे कह रहा हूँ। तुम्ही चुकीच्या माणसाला सजा देत आहात. मी तर पांच वेळचा नमाजी मुसलमान, श्रीमंत व्यापारी, तोही विजापूरचा." 

विजापूरचे नांव ऐकताच, सरदार दचकला. त्याने शांत स्वरात विचारले, 

"व्यापाराचा परवाना आहे तुझ्याजवळ?" कमरेत खोचलेला परवाना काढण्याच्या प्रयत्नात  सावजीना मानेभोवती असलेल्या धारदार चक्राचा मानेला स्पर्श झाल्यामुळे मानेला जखम झाली. परवाना काढायला त्रास होतोय असे बघून एक सैनिक पुढे आला आणि  त्यांच्या कमरेतला परवाना काढून सरदाराच्या सुपूर्द केला. सरदाराने परवान्यावर विजापूरच्या वित्तमंत्र्याचा शिक्का बघून सावजींना साखळदंडातून मुक्त करण्याचा आदेश दिला आणि जंजिरा, दांडा, राजपुरी मधे व्यापार करण्याची अनुमती देऊन तसा परवाना देखील सावजीस दिला.

            

सावजीची युक्ती, रणनीती कामी आली. समुद्राच्या मधोमध असलेल्या जंजिर्‍यात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी मुद्दामच राजपुरीत स्वतःला कैद करवून घेतले होते. या मोहिमेवर येण्याआधीच त्यांनी परवाना मिळवला होता. आतां या संधीचा फायदा घेऊन, जंजिर्‍याची अर्थात किल्ल्याची इत्थंभूत माहिती ते गोळा करणार होते.

           

एकोणीस बलदंड बुरुजांनी वेढलेल्या, अर्धा मैल लांब, दीड मैल परिघाचा मजबूत दुर्ग -- जंजिर्‍याचे निरीक्षण करीत सावजी किल्ल्यावरील पेठेत आले होते. आजूबाजूला बघत, पहार्‍याची जागा लक्षात ठेवत होते. आता पेठेतील एका सराफ दुकानासमोर उभे राहून पेठेतील सैनिकांवर नजर फिरवत होते. दुपारची वेळ असल्यामुळे पहार्‍यात थोडी शिथिलता आली होती. बुरुजावर व परकोटावर सैनिक तैनात होते.

           

सावजी थेट सराफ दुकानात शिरले. त्यांचे स्वागत करुन दुकारदाराने विचारले, 

"काय हवंय महाराज?" 

"कांही नाही विजापूरहून व्यापार  करायला आलोय! तुम्ही दुकानात अव्वल दर्जाचे सोने ठेवता अशी माहिती मिळाली."

"बरोबर आहे. आमचा माल थेट पार्शीयाहून येतो." 

"आणि इथून जाणारा माल त्याहीपेक्षा अधिक मौल्यवान असतो, होय ना?" 

"म्हणजे तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?" 

"त्याही व्यतिरिक्त इथल्या मुली आहेत ना?"


सराफ दचकला. त्यांना आतल्या बाजूस घेऊन गेला आणि विचारले,


"तुम्ही जाणतां या निर्यातीबद्दल? माझ्या मुलीला द्याल परत आणून?" 

"नक्कीच!"

          

सराफ त्यांच्या पायावर लोटांगण घालून म्हणाला, 

"मी तुम्हाला माझी अर्धी संपत्ती देतो पण कसेही करुन माझी मुलगी परत आणून द्या." 

"मला तुमची संपत्ती नको पण जंजिर्‍याची खडा न् खडा माहिती हवी आहे. सिद्दयांकडे तोफखाना, शस्रे किती आहेत ? सैनिक क्षमता ?  किनार्‍यावरुन किल्ल्यात येण्यास कोणती वेळ योग्य राहील ? पहारे कसे चुकवता येईल ?" असेच अनेक प्रश्न त्यांनी सराफासमोर ठेवले.

         

"तुम्ही जंजिर्‍यावर म्हणजेच आदिलशहा, सिद्द्यांवर आक्रमण करणार? खरंच माझी मुलगी परत द्याल आणून? पण विश्वास कसा ठेवू?"  

"गौरासाठी!" 

सराफाने चमकून बघितले. 

"माझ्या मुलीचे नांव तुम्हाला कसे माहीत? कुठे भेटली का?" 

त्याने काकुळतीने विचारल्यावर, सावजी म्हणाले,  

"तुमची मुलगी गौरा तर सुरक्षित आहेच त्याचबरोबर तिच्यासोबतच्या ५०-६० स्त्रियांही सुरक्षित आहेत. सिद्दी त्यांना सागरपार नाही नेऊ शकला." सराफाला अतिशय आनंद झाला. 

"सिद्द्यावर आक्रमण करण्यासाठी आवश्यक ती माहिती द्या. सिद्द्यांचा निःपात करुन त्याला इथून संपवायचे आहे," सराफ संशयाने म्हणाला,

"पण हे कसे शक्य आहे? सिद्दी आदिलशाहीचे मांडलिक असल्यावर, आदिलशहाच कसा आक्रमण करेल?" 


सावजींना क्षणभर असलियत सांगण्याचा मोह झाला, पण जर का, चुकून सराफ पकडला गेला आणि यातना सहन न होऊन त्याने हे सांगितले तर, पूर्ण मोहीमच फसेल, म्हणून शेवटी असंच थातूरमातूर सांगून त्याचे समाधान केले.

        

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

         

भाग - ३८.

        

सराफाची खात्री पटल्यावर, त्याने माहिती देण्यास सुरुवात केली. बहामनी साम्राज्याच्या कालखंडात गुलाम म्हणून आणलेले हे सिद्दी कसे वरचढ होत गेले ? नंतर निजामाचे कसे मांडलिक झाले ? जंजिरा किल्ला उभा राहण्याआधी तोच; रामभाऊ कोळी पाटलाचा मेंढकोट होता. निजामाचा सुभेदार मलिक अहमद परिमल खान आणि कांही सिद्दयांनी पाटील व त्याच्या लोकांचा धोक्याने घात करुन त्यांची कत्तल केली व मेंढकोट ताब्यात घेतला. नंतर मजबूत जलदुर्ग उभारला तोच हा "जंझिरा महेरुब" (जंजिरा) ! हा जंजिरा अभेद्य आहे. पुढे सराफाने किल्ल्याची अंतर्गत व्यवस्थेची अगदी बारीक-सारीक तपशीलवार माहिती पुरविली. मनात सावजी म्हणाले,

"असा किल्ला स्वराज्यात हवाच!" 

          

सराफ म्हणाला, 

"मला जेवढी माहिती होती ती सर्व हातचे न राखतां तुम्हाला दिली. आता तरी माझ्या मुलीबद्दल सांगा." 

"विश्वास ठेवा सराफ; आता तुमची मुलगी ती आता माझी पण मुलगी आहे. तिला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची खात्री बाळगा. ती अतिशय सुरक्षित आहे. फक्त कांही काळ धीर धरा."

          

सावजींना सराफाकडून बरीच महत्वाची माहिती मिळाली. कांही दिवस जंजिर्‍यात राहून सिद्दयांची मानसिकता, युध्द कौशल्य इ.ची माहिती जाणून घेतल्यावर, सगळी माहिती शिवाजीराजेंना पुरवून जंजिर्‍यावर आक्रमणाचा दिवस ठरवायचा होता. म्हणूनच तर त्यांनी केवळ दीड महिन्यात सर्व माहिती गोळा करुन थेट राजेंसमोर ठेवली.

     

सिद्दयांचा निःपात करण्यासाठी राजेंनी, रघुनाथ बल्लाळ या शूर योध्याची नेमणूक केली. त्यांंच्या सैन्यांनी याअगोदर सिद्दयांचा कांही भूभाग जिंकल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला होता. त्याच उत्साहाच्या भरात अविचाराने त्यांनी जंजिर्‍यावर हल्ला चढवला. पण तिथल्या तोफांच्या मार्‍यात मराठ्यांचा टिकाव लागला नाही. त्यावेळी जंजिरा जिंकण्यासाठी आरमाराची निकड राजेंच्या लक्षात आली. त्यांनी सैन्य माघारी बोलावले. राजेंनी मनी ठरवले,"पुन्हा येऊ ते पूर्ण तयारीनिशी आणि  मराठ्यांचा झेंडा फडकाविण्यासाठीच !" 

           

आदिलशहाच्या मरणानंतर कारभार बडी बेगमसाहेबाच्या हाती आला. आदिलशहाच्या मृत्युचा आणि त्यामुळे आदिलशाहीत वातावरण दूषित झाल्याचा पुरेपूर लाभ; राजेंनी उठविला. अल्पावधीत राजेंनी बराचसा आदिलशाही मुलुख हस्तगत केला होता. जवळजवळ ४० किल्ले घेतले. हे आज दरबारात बेगमसाहेबाला कळल्यावर, शिवाजींचा हा वेग थांबवायलाच हवा असा विचार करीत असतांनाच तिची दासी व अंगरक्षक मार्जिना तिथे आली. ही तीच मार्जिना; जिला कांही वर्षापूर्वी नाईकांच्या गुप्त नियोजनावरून आदिलशाहाच्या जनानखान्यात बडी बेगमची प्रथम दासी म्हणून तिचा शिरकाव करवला गेला होता. नंतर बुध्दी-चातुर्याने  ती तिची अंगरक्षक झाली. मार्जिना म्हणाली,

"बेगम साहिबा, तुम्ही थोडा विश्राम करा."

"विश्राम?अरे सल्तनत नेस्तनाबूत हो रही और हम आराम फरमाए ? हा शिवाजी फार डोईजड होत चालला, त्याने लहानमोठे ४० किल्ले हस्तगत केलेत, अशीच घोडदौड चालू राहिली तर, एक दिवस विजापूर ताब्यात घेऊन भगवा फडकवेल तो !" 

             

आदिलशाही जिवंत ठेवायची असेल तर, कांहीतरी पावले उचलावीच  लागतील. उद्याच करते त्याचा बंदोबस्त ! मार्जिना उर्फ शाहीन सतर्क झाली......

"भविष्यात स्वराज्याला फार मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार तर?"

           

दुसर्‍या दिवशी बेगमने आपल्या वकीलास शहाजीराजेंना खलिता लिहायला सांगितला. मजकूर स्वतः सांगत म्हणाली, लिखो... 

"तुमचा धाकटा पुत्र शिवाजीचा उपद्रव आता तुमच्या जहागिरीपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही तर, आदिलशाहीतही आता तो धुडगूस घालीत आहे. ४० किल्ल्यावर त्याने ताबा मिळवला आहे. तुमच्यासारख्या धुरंंधर योध्यावर शिवाजीच्या कायमच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. पुत्रमोहापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व द्याल याबद्दल शंकाच नाही." खलित्यावर शिक्का उमटवून, वकीलाला "शहाजींकडून समाधान उत्तर हवय," बडी बेगम कडाडली. बेगमच्या मागे उभी असलेल्या मार्जिनाचा संताप अनावर होत होता, पण चेहर्‍यावर दिसू न देता ती तटस्थ राहिली.

             

जिवाजीच्या दुकानासमोर एक मिठाई-विक्रेता बराच वेळचा उभा होता. बहुतेक त्याला जिवाजीच्या दुकानात प्रवेश करायचा असावा. परंतु आज शुक्रवारचा बाजार असल्यामुळे पेठेत चांगलीच वर्दळ होती. जिवाजीचे सुध्दा लक्ष होतेच. जिवाजी मिठाईवाल्याला ओळखत होते खबरी पोहोचविणारा बहिर्जी पथकातील तो एक हेर होता. गर्दी  थोडी कमी झाल्यावर, जिवाजीने इशार्‍याने त्याला बोलावले. तो दुकानाजवळ येऊन म्हणाला, "सरकार, मिठाई हवी का?"


आणि मग दोघांची सांकेतिक भाषेत संदेशांची देवाणघेवाण झाली. हेराने

सांकेतिक भाषेत सांगितले की, "शहाजीराजेंना आपल्याच पुत्रावर हमला करायचा आदेश बडी बेगमने पाठविला आहे."

      

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

             

भाग - ३९.


शहाजीराजेंना बडी बेगमचा खलिता मिळाला त्यावेळी ते बंगरुळच्या महालात बसले होते. 

"नानाजीपंत, ही भूमी आमच्या पुत्राकडे परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आस लावून बसली आहे आणि आम्हीच त्यांना गुलामगिरीसाठी विवश करायचे?" 

"नकाराचा खलिता पाठवला तर, बडी बेगम संतापेल. आधीच तिने तिच्याविरुध्द असलेल्या सरदारांना संपवण्याचा सपाटा लावला.ती तुम्हाला सुध्दा..." 

"नाही पंत; ती असं करुच शकणार नाही. आमच्या विरुध्द पाऊल उचलण्याअधी तिला शिवबांचा सामना करावा लागेल. त्याच्यात मुघलांना धूळ चारण्याची ताकद आहे. आमची शक्ती व जिजाऊची नीति आहे त्यांच्यात ! ते आमच्यासारखे कोण्या शाहीचे गुलाम नाहीत. स्वतंत्र राजे आहेत." शहाजी राजे पुढे म्हणाले ---

          

"पंत, बडी बेगमला लिहा, शिवाजीस  समज देण्यास आम्ही असमर्थ आहोत; ते आमचं ऐकणार नाहीत. आम्ही त्यांना सांगून त्यांनी ऐकले नाही तर, आमचा अपमान होईल.बेगम साहिब शिवाजी विरुध्द जो कदम उचलतील त्याला आमचा आक्षेप नाही." 

लिहिताना पंतांचा हात थरथरत होता ते पाहून राजे म्हणाले, 

"तुम्ही निःसंकोच लिहा. विचारपूर्वकच लिहायला सांगत आहे. शांत वारा जेव्हा वादळात रुपांतरित होतो, तेव्हा त्याच्या अंगी मोठमोठ्या वृक्षांनाही उलथवून टाकण्याची क्षमता उत्पन्न होते याची प्रचिती नक्की येईल."

            

शहाजीराजेंचे हे उत्तर बडी बेगमला अनपेक्षित होते. वजीर रुस्तम व बाजी घोरपडें यांना दरबारात तातडीने बोलावण्यात आले. भर दरबारात शहाजीराजेंचा खलिता वाचून दाखवल्यावर सारे दरबारी अचंबित झाले. हा दरबाराचा व बडी बेगम साहिबाचा अपमान होता. तिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिच्या मागे उभी असलेली मार्जिना  तिच्या निर्णयाकडे श्वास रोखून वाट पाहत होती.बेगम म्हणाली,  

"प्रथम शिवाजीला झुकवावं लागेल. शिवाजीचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यत शहाजींविरुद्ध कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये."  

"पण शिवाजींचा निःपात करेल कोण? शिवाजींनी फत्तेखानचा कसा पराभव केला, शाही सैन्याची कशी धूळदाण उडवली? शिवाय तो चतुर, चलाख आहे. दख्खनची भौगोलिक संरचनेचे संरक्षण आहे." 

"आहे एक सरदार.त्याची रणनीती कोणीही भेदू शकत नाही.आजपर्यत एकही युध्द हरला नाही. त्याने मुगल शहजादा औरंगजेबलासुध्दा तावडीत पकडले होते." 


पण बेगमने त्या सरदाराचे नाव घोषित केले नाही.


अफझलखान आपल्या महाली बसला होता. एका संदेशवाहकाने खलिता त्याचे हाती दिला. खलित्यात लिहिले होते,

"शहाजीपुत्र शिवाजी आदिलशाहीचा पश्चिमी मुलुख कुरतडत असून त्याचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत असल्याने  त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब विजापुरी येऊन मोहीम हाती घ्यावी.  अफझल मनात म्हणाला,

"शिवाजी, तू फत्तेखानाच्या तावडीतून एकवेळ सुटलास, पण मेरे शिकंजेसे बचना मामुमकिन है।" आणि विजापूरला जाण्याची तयारी करण्याचा त्याने आदेश दिला आणि लगेच दुसरा आदेश दिला ---- 

"जनानखान्यात सूचना द्या." आणि स्वतः जनानखान्याकडे निघाला.

             

इकडे ------ 

शिवाजीराजे बसले होते. शेरबाजसिंग नांवाची कुणी व्यक्ती भेटायला आल्याचा निरोप आला. राजेंनी त्वरित आदेश दिला ; - - - - 

"त्यांना सन्मानाने आंत पाठवा." 

राजेंच्या समोर शेरबाजसिंगच्या रुपात बहिर्जी नाईक उभे होते. मुजरा करुन म्हणाले, "राजे, तब्बल एक वर्षानंतर आपले दर्शन होत आहे." दोघांनी एकमेकांना कडकडून अलिंगन दिले आणि दोघेही खलबतखान्यात आले. विचार-विमर्ष सुरू झाला. 

       

"फार आधीपासून आपल्या पथकाला औरंगजेबची ताकद, त्याची धूर्त चाल माहीत असूनसुध्दा आपण त्याला आग्र्याच्या तख्तावर बसण्यापासून रोखू नाही शकलो. अर्थात उत्तरेच्या तख्तावर कोणी बसावे-- ते नियंत्रित करण्याचे आपले ध्येय मुळीच नव्हते. फक्त शाहजाद्यांना झुंजवत ठेवून, संधीचा फायदा घेऊन स्वराज्यविस्तार  करणे हीच आपली योजना होती. दारा बसला असता तर आपल्या फायद्याचे होते म्हणून थोडे प्रयत्न केले पण दाराशुकोहापेक्षा औरंजेब कूटनीतीत माहीर असल्यामुळे तोच बसेल हेही आम्ही जाणून होतो.शिवाय मीरजुल्मची त्याला सर्वतोपरी साथ मिळाली."

     

"नाईक, तुम्ही व तुमच्या पथकामुळे आम्हाला महत्वाच्या खबरा वेळेवर पोहोचत असल्यामुळेच आम्ही राजकारणाचे डाव व्यवस्थित टाकून  मोहिमा आखू शकतो. तुम्ही हेरांचे जाळे कसे विणले हे तुमचे तुम्हीच जाणो ! सणासुदीलासुध्दा तुम्ही व तुमचे हेर परिवारापासून वर्षोनुवर्षे दूर राहून स्वराज्यासाठी झटत राहून प्रत्येक संकटावर मात करतां, कसं जमते नाईक तुम्हा सर्वांना? "


"राजे, सर्वच हेर प्रत्येक मोहिमेवर आपापले  पात्र (रोल) उत्कृष्ठरीत्या वठवून मोठमोठ्या धुरंधरांना मूर्ख बनवतात; तेव्हां जो आनंद हेरांना होतो, तो अवर्णनीय असतो. फक्त आम्हा सर्वांची एकच तीव्र इच्छा आहे, तुमच्या हातून परकियांचा नाश होऊन, संपूर्ण भारतावर 'भगवा' फडकावा. "

          

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

            

भाग - ४०.


"राजे, या दोन वर्षात स्वराज्याच्या वाढलेल्या सीमा बडी बेगमच्या डोळ्यात खुपत आहेत. आबासाहेबांना पाठवण्याचा तिचा बेत फसल्यावर ती अफझलखानला पाठवीत आहे. आपले मावळे त्याचासुध्दा फत्तेखानसारखा पराभव करतील." राजे म्हणाले, 

"येऊ द्या त्याला. त्याचा जुना हिशोब चुकता करायचाच आहे. दादासाहेबांचा त्याने दगाबाजीने घडवून आणलेला मृत्यु; आणि आबासाहेबांना दिलेल्या यातना आम्ही आणि मातोश्री विसरलो नाही."

            

राजेंनी, त्यांना (बहिर्जीना) कांही दिवस परिवारासोबत घालवा म्हटल्यावर, नाईक म्हणाले, 

"नाही राजे, अफझलखानाचा समाचार घेणे अधिक गरजेचे आहे. आपल्या  'बाज' हेराचे या मोहिमेत उत्तम योगदान मिळू शकते. प्रथम सातार्‍यात जाऊन त्याची भेट घेतो. हा 'बाज' आधीही अफझलखानाच्या गोटात घुसला होता. जेव्हा अफझल आबासाहेबांना बेड्या घालून कर्नाटकपासून अनवाणी पायी चालवत विजापुरात आणत असतांना, आपला संदेश पोहचवण्यासाठी हा 'बाज' विश्वासराव फकीर बनून गेला होता. त्याला अफझलखानचा स्वभाव, नित्यनियम चांगलेच माहीत आहेत." 

    

"ठीक आहे. लागा तयारीला. तुमच्याकडून येणार्‍या खबरीनुसारच रणनीती ठरवावी लागेल. दोघेही खलबतखान्यातून बाहेर पडून मातोश्रींच्या भेटीस गेले. मांसाहेबांच्या मांडीवर त्यावेळी एक वर्षाचे बाळराजे शंभु होते. नाईकांनी त्यांना उचलून लाड कौतुक करु लागले. म्हणाले, 

"बाळ राजे, पहिल्या भेटीत तुम्हाला वचन देतो, जोवर हा दौलतराव जिवंत राहील तोपर्यन्त अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या प्रत्येक संकटात तुमचे संरक्षण करत राहील." 

              

राजेंचा आग्रह व आज्ञेनुसार नाईक आपल्या कुटुंबाच्या भेटीस आपल्या वस्तीकडे निघाले. आधी वाटेत असलेल्या दर्ग्यात गेले. तिथल्या हेर-प्रशिक्षण शाळेत नीळकंठ उर्फ बाबा चाॅंद मियाची भेट घेऊन आणि त्यांना कांही महत्वाचे सल्ले देऊन एक तुकडी सज्ज ठेवण्यास सांगितले. ते वस्तीत पोहचले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. त्यांच्या डोळ्यासमोर कितीतरी आठवणी तरळत होत्या. स्वराज्याच्या प्रत्येक अधिकार्‍याला वाडा असतो. पण स्वराज्याचे गुप्तहेर पथक व बहिर्जी हेर-प्रमुख असूनही त्यांचा परिवार एका झोपडीत राहत होता. पण त्याबद्दल त्यांना किंचितही खेद वा खंत नव्हती. उलट सुरक्षिततेच्या दृष्टीने तेच योग्य होते.

            

नाईकांनी झोपडीच्या दारावर थाप दिली. पण आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने थोडे आशंकित झाले. लगेच त्यांच्या लक्षात आले, सुरक्षिततेच्या दृष्टीने शारदा दार उघडत नसावी. मग त्यांनी पतीपत्नीच्या आवडीच्या गीतातील एक कडवे गायला सुरुवात केल्या बरोबर शारदेने दार उघडले. समोर पतीला बघून आश्चर्याने म्हणाली, 

"तुम्हीऽ"

घरात आल्यावर नाईकांनी सर्वांची चौकशी केली. 

"बापू दिसत नाही ?" 

"त्यांना जाऊन वीस दिवस झाले."  डोळ्यातील अश्रू त्यांनी निग्रहाने परतवले. पत्नी म्हणत होती ---

"खूप वर्षांनी आलात."

            

खाटेवर झोपलेल्या दामोदरच्या डोक्यावरुन त्यांनी प्रेमाने हात फिरवला. ते शारदेला म्हणाले, 

"दामोदरला गुरुकुलात पाठवावे तिथे तो शास्र आणि शस्रात पारंगत होईल." 

"पण, तो गुरुकुलात गेल्यावर इथे मी पूर्णपणे एकटी पडेन. त्यापेक्षा एक सुचवू कां? त्याने इथेच राहून तुमच्या सारख्या सार्‍या विद्या ग्रहण कराव्यात. तुमच्यासारखी त्याने परक्याची नोकरी करण्यापेक्षा तो सामान्य माणसाचे जीवन जगला तरी मला आनंद वाटेल. मी आणि त्याची होणारी पत्नी सुध्दा आनंदात राहू!" 


शारदेच्या बोलण्यातली खोच नाईकांनी ओळखली. हसून तिला मिठीत घेत म्हणाले, 

"माफ कर शारदा." 

शारदानेही त्यांच्या मिठीत स्वतःला झोकून दिले. परत ही मिठी मिळण्यासाठी किती वाट पहावी लागेल ही खात्री नव्हती.

    

नाईकांच्या सल्ल्याप्रमाणे -----

विश्वासराव फकीर बनून अफझलखानाच्या छावणीत आला. (याचे नांव होते विश्वासराव भोसेकर. याची हकीगत फारच विलक्षण आहे.) नंतर पाडगांवपासून जवळ असलेल्या त्याच्या वडिलोपार्जित गावात राहून जरी शेती करत असला तरी हेरखात्याशी संलग्न होता. सामान्य जीवन जगत वाईमधे अफझलखानच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. त्याला संदेश मिळाल्यानुसार गावाबाहेर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली थडग्याजवळ फकिराच्या वेशात स्वतः बहिर्जी नाईक त्याची वाट पाहत होते.

"नाईक, कधीपासून नवीन मोहिमेच्या प्रतिक्षेत होतो. ती प्रतिक्षा आतां संपणार आहे."  

"आता नुसती मोहिमच नाही तर महामोहीम आहे."


नाईकांनी असे म्हटल्यावर धास्तावून विश्वासरावांनी विचारले,


"स्वराज्यावर मोठे संकट येणार आहे का?" 

"होय! अफझलखान नावाचा महाभयंकर राक्षस स्वराज्याकडे यायला निघाला आहे. तुम्ही त्याला चांगले ओळखत असल्यामुळे, या मोहिमेत तुमची भूमिका महत्वाची असेल." 

"नाईक तुम्ही फक्त आज्ञा द्या. कसं काय करायचं एवढं कळलं की...." 

         

क्रमशः🙏🙏🙏🙏

(वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )