!!! बहिर्जी नाईक !!! भाग ४१ ते ४५
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग - ४१.
नाईक म्हणाले, "आपण लवकरच सर्व हेरांंची बैठक बोलावू. ही मोहीम पूर्णपणे राजेंच्या निर्णयाने पार पाडायची आहे. त्यांंना निर्णय घेण्यास दिरंगाई व्हायला नको, म्हणून प्रत्येक हेराची कामगिरी निश्चित करावी लागेल, सर्व खबरा राजेंपर्यत वेगाने पोचायला हव्यात आणि तितक्याच वेगाने राजेंनी दिलेला निर्णय खानाच्या गोटातील आपल्या हेरांपर्यत जायला हवेत."
येथे एका गोष्टीचा उल्लेख काही जुन्या बाडातून आहे की -- खानाच्या गोटातील प्रमुख नजरबाज होता विश्वासराव भोसेकर ! आणि विशेष म्हणजे त्याला सर्वजण "अल्लाह का बंदा" म्हणून ओळखत असत. खानाचा देखील त्याच्यावर प्रचंड विश्वास होता.
बहिर्जी पथकाची सूत्रे वेगाने हलू लागली. प्रतिक्षा होती फक्त विजापुरातील हेरांकडून येणार्या खबरांची.
ससैन्य अफझलखान विजापूरच्या बाहेर आला. रात्रीची वेळ असल्यामुळे, बडी बेगमची भेट होऊ शकणार नव्हती, पण म्हणून त्याने वेळ वाया घालवला नाही. शिवाजीविरुध्द कोणती रणनीती वापरावी यावर विचार-विमर्श केला. कारण ही लढाई जणू त्याच्या अस्तित्वाचीच होती. भोसले घराण्याशी त्याचे जुने वैयक्तिक शत्रुत्व होते. त्याने प्रमुख सल्लागाराला सैन्यासाठी लागणार्या खर्चाचा व सैन्यबळाचा आढावा तयार ठेवण्याची आज्ञा दिली, आणि म्हणाला -- "उद्या बडी बेगम साहिबांची भेट झाल्यानंतर आपल्या मोहिमेला सुरुवात करुं!"
अफझल विचारात गढून गेला होता. "अब वखत आया, शहाजीका वजूद खत्म करनेका ! पहले संभा को मारा, अब शिवा को मारेंगे ! उसके बाद शहाजीकी बारी आहे. शिवाजीला मारल्यावर आदिलशाहीमधे आपलं आणखी वर्चस्व वाढेल. मग शहाजींना संपवणे कठीण नाही."
"ख्याल तो नेक है हुजूर. पण शिवाला संपवणं एवढं सोपं नाही. सह्याद्रीच्या पहाडात तर आणखीनच कठीण आहे. त्याच्या मागे बारा-मावळांतील सारे मावळे,आणि देशमुख आहेत."
"खरं आहे रशीद. त्याला कमजोर करण्याच्या क्लुप्त्या शोधाव्या लागतील." खान आतां संपूर्ण ताकदीनिशी मोहिमेवर निघण्याच्या तयारीत होता.
विजापूरच्या राजमहालाबाहेर इराणी संगीत सुरु होते. सारे विजापूरकर संगीताचा आनंद लुटत होते. मार्जिना मात्र राणीमहालातून खलबतखान्याकडे लक्ष ठेवून होती. खलबतखान्यात अफझलबरोबर बावीस उमराव, आणि वजीर आत होते. त्या सर्वांना ती ओळखत होती. ते सर्व आदिलशाहीतील प्रतिष्ठित होते. मोहिमची रुपरेषा आखली जात होती. बडी बेगमने तिला आंत येण्यास मनाई केल्यामुळे बेगम येण्याची प्रतिक्षा करत बाहेर उभी होती. मोहिमेचा तपशील अत्यंत गुप्त रहावा याची दक्षता घेतली जात होती. ज्या कार्यासाठी ती आदिलशाही गोटात आयुष्य खर्च करीत होती, ते कार्य ती ऐन वेळी करुं शकत नसल्याचे दुःख तिला अस्वस्थ करीत होते. एकाएकी तिला कांही सुचले.
पाकगृहात हबीबुल्ला होता. त्याला मार्जिनाकडून मिळालेली खबर बाहेर पोहोचवावयाची होती. खलबतखान्यात दीर्घकाळ चाललेल्या चर्चेतील एकही खबर कोणत्याही हेराला न मिळाल्यामुळे सारेच नैराश्यग्रस्त व चिंतातुर झाले होते. आचारी, सैनिक, अधिकारी पदांवर असलेले बहिर्जी पथकातील हेर फक्त प्रतिक्षाच करुं शकत होते. दुसरा काही मार्गच दिसत नव्हता.
सर्व उमरावांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असलेल्या कक्षात हबीबुल्ला येत असलेला मार्जिनाने पाहिल्यावर तीही तिथे आली. आसपास आपलीच माणसे असल्याची खात्री करुन मार्जिना हळूच म्हणाली,- - - - -
"आतली खबर मिळणे अवघड आहे. तुमचे कांही नियोजन आहे कां?"
"नाही. खलबतखान्याच्या दारावर आपलीच माणसे पहारेकरी आहेत पण दार बंद असल्यामुळे अशक्य आहे. पण कसंही करुन खबर मिळवणे आवश्यक आहे. इथली क्षणाक्षणाची खबर वेगाने मिळावी असा नाईकांचा निरोप आहे. आपण आताच अपयशी होत आहोत. नाईकांपर्यत खबर कशी पोहचणार?"
मार्जिना म्हणाली,
"त्या बावीस उमरावांपैकी एखाद्याला फितूर केले तर?"
"कल्पना चांगली असली तरी अशक्य आहे. सगळेच प्रतिष्ठित व आदिलशाहीशी निष्ठावान आहेत."
"पण हाच एक मार्ग आहे. उद्यापर्यंत मला या बावीसही उमरावांची माहिती उपलब्ध करुन द्या."
"कोण किती समृध्द, कोणाची काय ताकद, कोणाची दुबळी बाजू कोणती या सर्वांचा पुरा इतिहास काय? या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन एखाद्या उमरावाची निवड करुन त्याला लक्ष करुन त्याच्यापर्यत पोहोचण्याची जबाबदारी माझी. मी माझं सर्वस्व अर्पण करुन त्याच्याकडून मोहिम नियोजनाचा तपशील काढेन."
"स्त्री गुप्तहेरा"बद्दल दुसऱ्या महायुद्धावरील युद्ध-वर्णनात बरंच लिहिलं गेलंय. पण मूळ मात्र बहिर्जी-पथकातच आढळून येतं ! आणि विशेष म्हणजे महायुद्धाच्या काळात स्त्री हेरांना सूचना दिल्या जात आणि त्यानुसार त्या कार्य करीत असत.
इथे बघा ही मार्जिना कुणाच्याही सूचनांची वाट न बघता स्वतः निर्णय घेतेय; आणि पुढे बघालंच की यशस्वीपणे अमलात देखील आणून दाखवतेय ती !!!
सहमती देऊन हबीबुल्ला झटकन कक्षाबाहेर निघून गेला. सध्या तरी राजेंना बावीस उमरावांचीच खबर पोहचणार होती.
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ४२.
विजापूरमधील बावीस उमरावांच्या राहण्याची व्यवस्था विशेष कक्षामधे करण्यात आली होती. हे कक्ष राणीमहालापासून बरेच लांब होते. मार्जिना बुरखा घालून एका खांबाआड लपली होती. तिला उमरावांच्या कक्षापर्यत पोचायचे होते. शिपायांचा पहारा कडक होता. त्या पहारेकर्यांमधे बहिर्जी-पथकाचे २-३ हेर होते. हबीबुल्लाने त्या बावीस उमरावांची कुंडली (सर्व माहिती) काढून मार्जिनाला दिली होती. मार्जिनाने पहारेकर्याच्या वेषातील बहिर्जी-पथकाच्या एका हेराला इशारा केल्याबरोबर त्याने जवळ लपवून ठेवलेला सैनिकी गणवेश तिला दिला. ती पुन्हा खांबाआड गेली. पथकाचे हेर सावध झाले. मार्जिना उमरावांच्या कक्षापर्यत पोहोचतांना कुणाला संशय येणार नाही ही खबरदारी त्यांना घ्यायची होती. थोड्याच वेळात ती सैनिकी वेषात पहारेकर्यात सामील झाली. आपल्या साथीदारांना इशारा करत पहारा देत पुढे पुढे जाऊ लागली. पथकाच्या हेरांची जबाबदारी फक्त तिला त्या उमरावाच्या कक्षापर्यत सुखरुप पोहोचविण्याची होती. पुढचे नियोजन तिलाच करायचे होते.
साथीदारांच्या मदतीने मार्जिना उमरावाच्या कक्षापर्यंत पोहोचली. तिथे पोहोचल्यावर सैनिकी पोशाख बदलला. आत इराणी जाळीदार पोषाख होता. हबीबुल्लाने दिलेल्या माहितीनुसार तिने आपल्या कार्यासाठी स्री-आकर्षण असलेल्या खान पहिलवान उमरावची निवड केली होती. त्याच्या कक्षाबाहेर पथकाचे हेर पहार्याला होते. एकाने तिच्या हाती विडा दिला; तो घेऊन तिने खानाच्या कक्षाचा दरवाजा ठोठावला. त्याने दरवाजा उघडताच समोर सौंदर्यमूर्ती मार्जिनाला बघून तो आऽ वासून बघतच राहिला. तिचा पोषाखही उत्तेजित करणारा असाच होता. तिचे ओसंडून वाहणारे मादक रुप बघून त्याच्या मनावरचा ताबा सुटला. त्याने तिला आंत घेतले.
"आपकी तारीफ?"
"मै बडी बेगम साहिबाकी दासी मार्जिना ! "
हे ऐकून त्याच्या आशंकांवर पाणी पडले. ही यावेळी आपल्या कक्षात कशी? पण तीच सलज्जपणे पुढे म्हणाली - -
"सकाळी तुम्हाला पाहिल्यापासून कधी एकदा तुम्हाला भेटते असे झालं. लपत छपत आले."
"आम्हाला भेटण्याची इच्छा? पण कां?"
"बस दिल ने डोर खीची और हम चले आये। "
"क्या आप हमे पसंद करती हो?"
"बहोत ज्यादा, त्याशिवाय का एवढी जोखीम घेऊन रानीमहल से आपके पास आयी?"
त्याने तिला मिठीत घ्यायला हात पसरले. मिठीत जायला टाळत ती लाजत म्हणाली, "आपके लिये अपने हाथसे विडा बना के लायी हूँ ।"
तो विडा तोंडात टाकणार तोच त्याला शंका आली. एवढ्या रात्री एक अनोळखी स्री अचानक येऊन विडा खाऊ घालते ? त्याच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजली.
"काय झालं हुजूर? माझ्या प्रेमावर विश्वास नाही कां? द्या तो विडा..."
असे म्हणत तिने तो विडा घेऊन दाताने अर्धा तोडला आणि अर्धा त्याच्या समोर धरला.
"आता तरी विश्वास आहे ना?"
तिच्या हातातील विडा घेऊन त्याने तोंडात टाकला आणि तिच्या आणखी जवळ गेला. तिच्या नजरेत नजर गुंतली. आता तो पूर्ण आहारी गेला. तिला तर हेच हवे होते. योजनेनुसार त्याला झुलवत ठेवून सुखरुप बाहेर पडायचे होते. ती बाजूला सरकली.
"क्या हुआ?"
"मुझे जाना है।"
"थोडी देर रुककर जाती।"
"हुजूर थांबले असते पण कुणाला कळले तर, माझं राणी-महालात राहणे अवघड होईल."
"नको चिंता करुस. नाही कळणार कुणालाच !" तो तिची प्रशंसा करु लागला. मार्जिना लाजून दाराकडे जाऊ लागली तोच खानाने तिचा हात पकडत म्हणाला,
"आजची रात्र थांब ना!"
"माझी मजबूरी समजून घ्या. उद्या पुन्हा संधी साधून येईन. मग हवी ती सेवा या दासीकडून करुन घ्या."
असे म्हणून ती पटकन दाराबाहेर पडली. खान खुश होऊन उद्याच्या रात्रीची वाट बघू लागला.
दुसऱ्या दिवशी कालच्याप्रमाणेच सावधानता बाळगत मार्जिना खान पहिलवानाला भेटायला आली. आज त्याने कक्ष सजवला होता. स्री-भोग घेण्याआधी तो मदिरा घेत असे. त्याची ही संवय तिला माहीत झाल्यानेच तिने खानाची निवड केली होती.
आज मात्र त्याने बोलण्यात वेळ न घालवता तिला बाहुपाशात घेऊन चुंबने घेऊ लागला. पूर्वी ती गुलाम असतांना असे प्रसंग तिच्यावर अनेक वेळा आले होते. पण आज महान अशा स्वराज्य-कार्यासाठी ती स्वतः या लांडग्यापुढे आली होती. स्वतःच्या अब्रूचे रक्षण करणेही ती शिकली होती. त्याला कुठे, कसे थांबवायचे याचे नियोजन तिने आधीच केले होते. त्याला हलका धक्का दिल्याने तो थोडा दूर होऊन मंचकावर बसला व तिला मद्य आणायला सांगितले. तिने स्मित करत विचारले,
"नशेत तुम्ही बोलू शकाल?"
"पांच जाम घेतल्यानंतर थोडीशी गुंगी येते, तरी सुध्दा आज तीनच घेईन..."
मार्जिनाने....
क्रमश 🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ४३.
लचकत, मुरकत जात; सुरईतील मद्याने जाम भरुन मार्जिनाने खानाच्या ओठाला लावला. त्याचे चाळे सुरुच होते. आपली अदाकारी दाखवत आणखी दोन जाम त्याला पाजले. पुन्हा पाजल्यावर अडखळत बोलू लागला. तिला हव्या त्या स्थितीत तो पोहोचला. आपल्या हाताचा हार त्याच्या गळ्यात हात घालत तिने त्याला लेटवले. त्यानेही तिला बाहुपाशात घेतले, तो पूर्णपणे झिंगला. प्रत्येक शब्द दोन दोन वेळा बोलत होता.
"प्रिये, तुम रानी-महल छोडकर हमसे निकाह कर लो।"
"लेकीन आप तो मोहीमपर जा रहे हो।"
"फिर क्या हुआ? जीत कर आनाही है।
"आनेके बाद जश्न के साथ निकाह करेंगे।"
"लेकिन हुजूर, शिवाजीला हरवणे एवढं सोपं नाही."
"वो चूहा क्या हमारी इतनी बडी सेना के सामने टिकेगा?"
आणि मग तिचे प्रश्नावर प्रश्न विचारुन त्याच्याकडून पूर्ण माहिती काढून घेतली. इतकेच नव्हे तर, अफझलखानाच्या सोबत मोठा खजिना व शिवाजीच्या पोटात खुपसायला रत्नजडित कट्यार पण त्याला दिली गेली आहे हे सुध्दा तिला समजले. शुभशकून समजला जाणारा फतेहलष्कर नावाचा हत्ती पण दिला गेला आहे हेही तो बोलून गेला.
तसेच -----
संपूर्ण अधिकार देऊन, दख्खनच्पा वतनदारांना वतन वाटून बादशहाशी इमान ठेवण्यास राजी करायचे आदेशही दिले गेले आहेत; एवढेच नव्हे तर, शिवाजींशी जे निष्ठा ठेवून आहेत, त्यांनाही अमिष दाखवून आदिलशाहीत येण्यास त्यांचे मन वळवण्याचे आदेश दिले गेले आहेत. अशा गोष्टीही तो बोलून गेला.
"आम्ही विजयी होऊन परत आलो की, निकाह नक्की होणार."
बोलता बोलता त्याने मार्जिनाला जवळ ओढले. संधी साधून तिने कानात लपवून ठेवलेल्या कापसाच्या बोळ्यातील दोन थेंब त्याच्या अलगद नाकात सोडले.
"कितना खुशबुदार इत्र है ?" आणि कांही क्षणातच तो बेशुध्द झाला. आता दोन तास तरी तो शुध्दीवर येणार नव्हता. क्रोधाने त्याच्याकडे बघत ती पुटपुटली,
"बस निकाहाचे स्वप्न पाहत. तुम्ही लोकांनी गुप्तता राखून आखलेली रणनीती लवकरच राजेंकडे पोहोचेल." आणि झटकन ती कक्षाबाहेर पडली.
आज हबीबुल्लाने बिर्याणीची मेजवानी ठेवली होती. मागच्या वर्षी त्याने विजापुरातील एका चांगल्या इमामाच्या मुलीशी निकाह लावला होता. त्याचे मित्र नेहमीच घरी येत असल्याने ती सर्वांना ओळखत होती. पण आज दोन तीन नवीन मित्र पठाणी वेषात आले होते, मित्रांच्या जेवण्याची व्यवस्था आतल्या खोलीत केली होती. त्यांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच रंगल्या होत्या.
नवीन आलेल्या मित्रांबद्दल हबीबुल्लाच्या पत्नीने विचारल्यावर तो म्हणाला ---
"अगऽ! ते शिवाजीराजेंचे प्रमुख हेर बहिर्जी नाईक व त्यांचे साथीदार आहेत."
आयेशाला अतीव आनंद झाला. नाईकांना आपल्या हातचे जेवू घालायचे भाग्य प्राप्त झाले.
हबीबुल्लाची पत्नी आयेशा ही जरी इमामाची पुत्री होती तरी ती, बहिर्जी पथकाची एक वर्षापूर्वी पथकाला जोडलेली हेर होती. विजापुरातील हेरांना एका ठिकाणी भेटतां यावे यासाठी हबीबुल्लाने तिच्यासोबत निकाह केला होता. हबीबुल्लाचे घर हेरांसाठी सुरक्षित होते. भरवस्तीत असलेल्या या घराचा कोणालाच संशय येऊ शकणार नव्हता.
आजपर्यंत आयेशा फक्त शिवाजींचे व बहिर्जींचे नावच ऐकून होती. आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. आदिलशहाच्या मृत्युनंतर वारसाहक्काच्या संघर्षात बडी बेगमने विरोधकांच्या सर्रास कत्तली केल्या होत्या. त्यात तिचे वडीलही होते, म्हणून तिचा बेगमवर राग होता. आयेशाचा थोरला बंधू इस्माईल हा हबीबुल्लाचा निकटचा मित्र होता. तो देखील बहिर्जी - पथकाचा हेर होता; तसेच विजापूर सैन्यात शिलेदार पण होता. इस्माईलमुळेच आयेशा व हबीबुल्लाची ओळख झाली आणि हबीबुल्लाने तिला योग्य मार्ग दाखवला.
नाईकांच्या निर्देशानुसार विजापूर दरबारात हेर पेरण्यात हबीबुल्लाचा मोलाचा वाटा होता. हबीबुल्ला हा विजापुरातील सर्व हेरांचा केंद्रबिंदू होता.
आयेशा म्हणाली,
"तुम्हीच वाढा. मी नाईकांसमोर कशी येऊ? मी सामान्य हेर, ते पथकाचे प्रमुख. त्यांचे नुसते नांव ऐकले तरी धडकी भरते."
"बरं घालतो नाईकांच्या कानावर तुझे म्हणणे !" आणि हसतच वाढायला निघून गेला.
नाईकांसोबत विश्वासराव, प्रतापराव, इस्माईल आणि आणखी कांही हेर बिर्याणीवर ताव मारत होते. विश्वासराव विजापुरी प्रथमच आला होता. नाईकांनी विश्वासरावांची ओळख करुन त्यांचेबद्दल सांगू लागले. यांनी खानाची झोप कशी उडवली ?, पूर्वीचे असलेले नावाडी कसे हेर झाले ?, बहिर्जी पथकाची कामगिरी कशी फत्ते केली ?, प्रमुख अधिकारी बनल्यावर, कशा प्रकारे हेरांना योग्यस्थानी नोकरी दिली गेली ? ही सर्व माहिती दिल्यावर नाईक मूळ विषयाकडे वळले. मार्जिनाने अफझलखानाच्या मोहिमेची रणनीती हबीबुल्लापर्यंत पोहोचविली होतीच.
हबीबुल्ला म्हणाला,
"फारच धाडसाचं काम केलं त्या महान स्री ने. ती नुसती धाडसीच नव्हे तर बुध्दीचातुर्य, शौर्यवान, धाडसी व महान योध्दाही आहे."
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ४४.
नाईक म्हणाले,
"खान आज आखलेली रणनीती जशीच्या तशी कधीच अमलात आणत नाही. विश्वासराव, तुम्ही खानाच्या सैन्यात सामील व्हा. व्यवस्था करण्यात येईल. तुम्ही सदैव त्याच्या निकट राहून खडा न् खडा माहिती बाहेर पोहोचविण्याची जबाबदारी तुमची. या मोहिमेच्या अखेरपर्यंत तुम्हाला हेच कार्य करायचे आहे. खानाच्या सेनेत आपले आणखी दहा हेर असतील. राजेंच्या आज्ञेने योग्यवेळी मी सुध्दा सहभागी होईल. खान सह्याद्रीत येईपर्यंत तुमच्याकडून आलेल्या बातम्यांवर विसंबून मी राजेंसोबत चर्चा करुन ठरवली गेलेली रणनीती तुमच्यापर्यंत पोहोचवीत राहीन. " सर्वांनी हमी भरली. मग ते इस्माईलला म्हणाले,- - -
"तुम्हाला आदिलशाही सैन्यात काम करण्याचा तजुर्बा जास्त असल्यामुळे, तुम्ही विश्वासरावांना सहाय्य करावे."
"आणि मी लवकरच मिळालेल्या माहितीनुसार राजेंशी चर्चा करुन तुम्हाला कळवीन. तोवर तुम्ही सर्वजण आपापली स्थाने काबीज करा." गंभीर होत, नाईक पुढे म्हणाले,
"प्रत्येकाने प्रत्येक क्षणी अत्यंत सावध असावे. अफझलखान दुसरा औरंगजेबच नव्हे, तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. हा महाधूर्त, चलाख, रणनीतीनिपुण, क्रूर, निर्दयी, कपट-कारस्थानात प्रवीण आहे. त्याला किंचित जरी शंका आली तरी, सर्व हेरांच्या जीवावर बेतू शकेल, राजेंची मोहीम फसेल आणि स्वराज्याची मोठी हानी होईल ही जाणीव हरक्षणी ध्यानात ठेवा."
सर्वांनी सावधगिरीने कार्यसिध्दीचे वचन दिले. मग पथकाच्या गुप्ततेची, चुकुन डाव फसला, आणि पकडले गेले तर स्वतःहून मृत्युस कवटाळण्याची सर्वांनी शपथ घेतली.
मनसोक्त बिर्याणी खाऊन झाल्यावर सर्वांना विडे दिले. हबीबुल्लाने गंमतीने आयेशाचे बोलणे सांगितल्यावर, नाईक म्हणाले;
"ती नाही तर आम्हीच आमची बहीण आयेशाची भेट घेतो." असे म्हणून ते उठले व हबीबुल्ला सुध्दा !
दोघेही समोर आल्याबरोबर मंचकावर बसलेली आयेशा लगबगीने उठली व दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
"भावाला बघून एक बहीण एवढी कां गडबडली आऽऽ? अरेऽ, मला थोरला बंधू समज. या भाऊबीजेला माझं औक्षण कर." तिच्या मनातील त्यांचे विषयीचा आदर आणखी दुणावला.
"भैया, आजवर विजापुरातील सरदार, उमरावांनी कोणाला बहीण मानल्याचे पाहिले नाही. आदिलशाहीशी इमान असलेला प्रत्येक सरदार, उमराव, स्री मग ती मुसलमान असो वा हिंदु, तिच्याकडे स्रीच्या नजरेनेच पाहतो. फक्त स्वराज्यातच प्रत्येक स्री माता, बहिण मानली जाते असे ऐकले होते, आज प्रत्यक्ष अनुभवले. मला गर्व आहे, अशा महान राज्याची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले." आणि पटकन ती नाईकांच्या पायाशी वाकली. अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देत त्यांनी खिशातून कांही नाणी काढून तिला भेट दिली. त्या रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.
आदिलशाहीकडून दुर्लक्षित झालेला शिवापट्टण किल्ला कांही दिवसांपूर्वीच स्वराज्यात दाखल झाला होता. किल्ल्यातील मंत्रणा-कक्षात राजे आणि व्यापाऱ्याच्या वेषात आलेले नाईक भेटत होते. अफझलची योजना त्यांनी राजेंना कथन केली. खानच्या जवळ असलेल्या सैन्यसंखेबद्दल राजेंना चिंता नव्हती. चिंता होती मुत्सुद्यांना युध्दासाठी राजी कसे करावे? निम्म्याहून अधिक सरदारांनी तह करण्याचे सुचवले होते. त्यांच्या दृष्टीकोनातून ते चुकीचे नव्हते. अफझलखान येणार म्हणजे, रयतेची नासधूस, कित्येक जीवने उध्वस्त होणार, पुढील दोन पिढ्याही भरुन काढणार नाही एवढे नुकसान होणार.
"परंतु नाईक, आदिलशाही मोडून काढायची असेल तर, अफझलखानास संपवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या मुघलांचे लक्ष दक्षिणेकडे नसल्यामुळे हीच परिस्थिती अनुकूल आहे. ही वेळ गेली तर, भविष्यात मुघल व आदिल या दोन्ही शाह्यांशी सामना करावा लागेल. म्हणून आदिलशाहीचा आताच बीमोड करावा लागेल. सध्यातरी अफझल हा एकच शत्रू आहे, त्याच्याशी सामना अवघड असला तरी अशक्य नाही."
"म्हणूनच लढणे हाच पर्याय आहे. पण तहाची भाषा करणारे सैन्य बरोबर घेऊन कसे लढावे? सर्वात आधी सैन्यात नवचैतन्य भरावे लागेल. रयतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी लागेल. नुसती हमी नाही तर खरोखरच रयतेचे रक्षण करावे लागेल. अन्यथा अफझलखानावर विजय मिळाला तरी, स्वराज्याची आर्थिक हानी भरुन काढणे कठीण जाईल. प्रथम यावर योग्य मार्ग शोधावा लागेल, नंतरच खानाशी कसे लढायचे हे ठरवतां येईल."
राजेंनी प्रथम स्वतःच्या कमकुवत बाजूंचा विचार केला. क्षणभर थांबून नाईक म्हणाले,
"राजे...."
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ४५.
नाईक म्हणाले,
"बहिर्जी-पथकात सध्या १५०० हेर आहेत. त्यातील कांही पूर्ण प्रशिक्षित तर कांहीचे प्रशिक्षण सुरु आहे. राजे, आपले हेर, प्रत्यक्ष समोर न जाता गुप्तपणे लढण्यात माहीर आहेत, आपला एक एक हेर ५० गनिमांचा सामना करण्याइतका सक्षम आहे. स्वराज्याकडे येण्याचा खानाचा मार्ग कळला तर, मार्गात येणार्या गावाच्या सुरक्षेसाठी त्या त्या गावात हेरांच्या तुकड्या स्थापित करुं. त्यामुळे उत्पात माजवणार्या गनिमांवर सैनिकी कारवाई करण्याची आपल्याला गरज भासणार नाही आणि आपले संपूर्ण लक्ष खानावर केंद्रीत करतां येईल." नाईकांचे विचार ऐकून राजेंना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले --
"नाईक, आणखी एक जबाबदारी हेरांवर टाका."
"कोणती? "
"सर्व पीठांचे संत, देवस्थानचे पुजारी, महंत यांना राजी करुन रयतेत अफवा पसरवा की, त्यांना प्रत्येकाला साक्षात्कार झाला की, मराठ्यांच्या हातूनच अफझलखानाचा वध होणार आहे. त्यामुळे स्वराज्य-रयतेत व सैन्यात आत्मविश्वास वाढेल. खानाच्या हेरांकडून ही वार्ता खानापर्यत पोहोचल्यावर त्याच्या आत्मविश्वासाला काहीं अंशी तडा जाईल आणि आपल्या सैन्याचा आत्मविश्वास वाढल्याने ते इर्षेने तुटून पडतील, त्यात भर घालण्यासाठी आम्ही सुध्दा नाटक करुं!"
राजे म्हणाले,
"आम्ही सुध्दा सरदारांना सांगू की स्वप्नात येऊन आईभवानीने आम्हाला आशीर्वाद दिला." आईभवानीने आशीर्वाद दिला म्हटल्यावर, ती खानाचा निःपात केल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच राजेंचा हा असामान्य दूर दृष्टीकोन आणि रयतेच्या मनांत उत्साह निर्माण करणारी अशी ही मनोवैज्ञानिक मजबूत पकड होती.
नाईक म्हणाले,
"राजे, इतका गंभीर प्रश्न बघा कसा चुटकीसरसा सुटला."
"आतां खानाचा सामना कसा करायचा याचे नियोजन करायचे."
नाईक म्हणाले,
"हेरांना खानाच्या सैन्यात योग्य ठिकाणी स्थापित करतो. त्यामुळे खानाच्या प्रत्येक योजनेची विश्वासार्ह माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल."
"उत्तम !"
राजेंनी मनापासून नाईकांची प्रशंसा केली. "राजे, प्राप्त माहितीनुसार खान सह्याद्रीच्या डोंगरात खुले युध्द करण्याची शक्यता फार कमी आहे. एवढं अफाट सैन्य फक्त दहशत पसरवण्यासाठी बाळगलेलं दिसतंय. राजे, खानाचा इतिहास बघतां तो पराक्रमी असला तरी महाकावेबाज असून तत्वाचे पालन कधीच करत नाही. युध्द नियम, दिलेला शब्द मोडणे या त्याच्यासाठी शुल्लक गोष्टी आहेत." नाईक पुढे म्हणाले ----
"त्याने" शिरेपट्टणचा तत्वनिष्ठ राजा कस्तुरीरंगाचा विश्वासघात करुन हत्या केली. मोठा संघर्ष करुनही शिरेपट्टण जिंकता न आल्याने, कस्तुरीरंगाला त्याने पत्र पाठवले. त्यात लिहिले,
"आपण सामंज्यास्याने वाटाघाटी व नीट चर्चा करु. वाटाघाटी फसल्या तरी आमच्याकडून तुम्हाला धोका उद्भवणार नाही." विश्वासाने कस्तुरीरंगा खानाला भेटायला त्याच्या छावणीत गेला आणि खानाने नियोजनपूर्वक राजाला संपवले. खान प्रत्येक मोहिमेवर जातांना बादशहाच्या पंजाचे ठसे उमटवलेले कोरे पत्र सोबत घेत असे व त्यावर आपल्या सोयीनुसार मजकूर लिहून उपयोग करीत असे.
आबासाहेबांना देखील असेच धोक्याने कैद केले होते. शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजींना सुध्दा असेच धोक्याने मारले. म्हणून या अफझलखानालाही आपण दगलबाजीनेच मारायला हवे. शिवाय त्याचे सैन्यसुध्दा प्रचंड आहे,"
"नाईक, कांही तरी अनोखी कल्पना शोधून काढायला हवी. तुमच्याकडून पुढील खबर मिळाल्यावरच कांही ठरवता येईल."
"राजे, तो लवकरच विजापूरहून निघणार. त्यानंतरच त्याच्या खर्या योजना समजू लागतील आपल्याला !"
"ठीक! आपण प्रतीक्षा करु."
विजापूरहून निघालेल्या खानाचा विजापूरपासून अवघ्या सहा मैलावर पहिला मुक्काम पडला. ह्या विशाल सैन्य व राहुट्यांमुळे एक भव्य शहरच वसवल्यासारखे वाटत होते.
सकाळी स्वराज्याच्या दिशेने कूच करण्याचा सैन्याला आदेश देऊन,अफझलखान नुकताच ६२ राण्यांचा उपभोग घेऊन बाहेर आलेला, पुन्हा जनानखान्यात गेला, पण आता तो उपभोगासाठी नाही तर, ६२ राण्या व १४० दासींना संपवण्यासाठी गेला होता. त्याने एक एक करत ६२ राण्यांची हत्या केली व १४० दासींना विहिरीत ढकलून देण्याची आज्ञा अधिकार्याला दिली. हे अमानुष कृत्य करण्यामागे, ज्यावेळी त्याने शहाजीराजेंना कैद केले होते, व त्याने शहाजींच्या राण्यांबद्दल अपशब्द वापरले होते, तेव्हाचे शहाजींचे शब्द "खान तुझ्याही बासष्ट बेगमा आहेत, हे लक्षात ठेव!" हे शब्द खानाने लक्षांत ठेवले होते. पण त्या मूर्खाला मराठ्यांच्या संस्काराविषयी थोडी जरी माहिती असती तर त्याने असे अविचारी भीषण कृत्य केले नसते. बासष्ट बेगमा संपवल्यावर त्यांच्या कबरी तिथेच खोदण्याची त्याने आज्ञा दिली.
आता मनावर कोणतेही ओझे, दडपण न ठेवता स्वराज्यावर चालून जाण्यास मोकळा झाला होता.
क्रमशः🙏🙏🙏🙏
(वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )
