Ad Code

Responsive Advertisement

बहिर्जी नाईक | Bahirji Naik Part 46 to 50 | बहिर्जी नाईक भाग ४६ ते ५०

 !!!  बहिर्जी नाईक  !!! भाग ४६ ते ५०


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

भाग १ ते ५

भाग ६ ते १०

भाग ११ ते १५

भाग १६ ते २०

भाग २१ ते २५

भाग २६ ते ३०

भाग ३१ ते ३५

भाग ३६ ते ४०

भाग ४१ ते ४५

भाग - ४६.


अफझलखान सैन्याचा दुसरा मुक्काम 'तोर्वे ' इथे पडला. खानाने सूत्रे हलवणे सुरु केले होते आणि बहिर्जी पथकाच्या हेरांनीही कामास सुरुवात केली होती. नाईक व कांही प्रमुख साथीदार विजापूरच्या जवळ असलेल्या गुप्तस्थळी थांबले होते. आणि कांही हेर शाही सैन्याबरोबर खानाच्या ताफ्यात सामील झाले होते. ते हेर पहारेकरी, सरदार, सेवक, आचारी, बाजारबुगणे अशा वेगवेगळ्या वेषात सामील झाले होते. बाजारबुगणे म्हणजे सैन्यासोबत आलेले सेवक, जे युध्दात सहभागी न होता, सैन्याची काळजी घेणे त्यात वैद्य, हकीम, गुलाम सैन्यांना लागणार्‍या वस्तु बाजारातून आणून देणारे नोकर असतात.

      

इस्माइलखान शाही सैन्यातील अश्वदलाच्या एका तुकडीचा सरदार होता. इस्माईलखानच्या तुकडीत मोठ्या हुद्यावर विश्वासराव कार्यरत होते. त्यांनी आपले नाव बदलून "अहमद मुस्तफा" नाव धारण केले होते. संधी साधून विश्वासराव इस्माईलच्या तंबूत गेले. अजूनपर्यत खानाचे नियोजन कळले नव्हते. 

"आपली कांही माणसे त्याच्या तंबूबाहेर पहारा देत आहेत. कांही सल्लामसलत झाली की, आपल्याला कळवेन" असे इस्माईल म्हणाला. यावर विश्वासराव उर्फ अहमद मुस्ताफ म्हणाले, 

"नाईकांची एक सूचना आहे, खान स्वराज्यात पोहोचेपर्यत त्याच्या सैन्याचे मनोबल जेवढे खचवता येईल तेवढे खच्ची करण्याचा प्रयत्न करायचा .... पण शंका न येऊ देता....." 

         

इस्माईलला एक कल्पना सुचली. ती कल्पना विश्वासरावांना सांगून तो म्हणाला, "बडी बेगमने खानाचे मनोबल वाढण्यासाठी शुभशकुनी "फत्तेलष्कर" हत्ती दिला, त्यालाच खतम केले तर?"   

"कल्पना छानच आहे. पण त्याला अचानक मारावं लागेल, ज्यामुळे आपल्याला परिणाम मिळेल." 

"ठीक आहे. मी अशी वनस्पती आणवतो की, ती खाल्ल्याने एका दिवसात हत्ती जमिनीवर पडेल. उद्याच हे कार्य करुन सैन्यात अफवा पसरवू की, विजापुरातून निघाल्यावर  खुदाने  दुसऱ्याच मुक्कामात अपशकून दाखवला. जंगलात असणारे आपले लोक विषारी वनस्पती आपल्यापर्यंत पोहोचवितील."  विश्वासराव म्हणाले. त्यानुसार वनस्पती आणवून फत्ते लष्कर ला संपविण्यात आले. 

    

अचानक फत्तेलष्कर मरण पावल्यामुळे अपशकून झाल्याची अफवा पूर्ण सैन्यात, आदिलशाहीत वार्‍यासारखी पसरली. खान किंचित डगमगला, पण त्याने स्वतःला सावरले. व मोठ्याने ओरडला, 

"शकून-अपशकून कांही नसतो. आता शिवाजीला मारुनच माघारी परतायचे." त्याचा सल्लागार रशीद म्हणाला, 

"ही बातमी ऐकून बडी बेगमने परत बोलावले आहे आणि दुसर्‍या दिवशी पुढे निघण्यास सांगितले आहे. इतक्या मोठ्या शत्रूवर चालून जातांना कांही मान्यतेवर विश्वास ठेवावा, खर्च, आणि ही मोहीम पण मोठी आहे. असं बेगम साहिबांच म्हणणं आहे." 

यावर अफझल चिडून म्हणाला -----

"नाही सैन्य पुढेच कूच करणार." 

 

खानाने बडी बेगमला संदेश पाठवला, 

"हत्तीचा मृत्यु अपशकून-समजू नका. माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे, शिवाजीला जिवंत किंवा मृत पकडून आणणारच!" 

           

रशीद म्हणाला, 

"खानसाहेब, आपण बडी बेगमला तर समजावले, पण सैन्य ? सैन्याला  सांगा की, असल्या गोष्टीशी तुमच कांही घेणदेणं नाही. तुमचं काम आहे लढणं, मरणं किंवा मारणं. तुम्हाला फक्त लढायचे आहे शिवाजीच्या दुबळ्या सैन्याशी ! बाकी मी समर्थ आहे शिवाजीशी लढण्यास !" 

"आपली वीस हजार फौज; शिवाजीच्या पाच हजार सैन्याशी लढायला कचरते ?  हा मूर्खपणा आहे. यावर कुणी चर्चा करतांना आढळल्यास त्याला मृत्युदंड दिला जाईल." 

             

बहिर्जी पथकाने आपला पहिला डाव खेळला होता. अजून बरेच डाव खेळायचे होते. किंचित का होईना, हारण्याचे विचार खानाच्या सैन्याच्या मनावर बिंबवण्यात आले होते.

          

विजापूरजवळच्या जंगलात आदिवासी वेषात बहिर्जींचे कांही हेर होतेच. खान जसजसा पुढे सरकेल तसतसे हे हेर जंगला जंगलाने पुढे सरकणार होते. खानाच्या बातम्या लवकर मिळण्यासाठी हे नियोजन होते. स्वतः नाईक देखील आदिवासी वेषात जंगलात वावरतच होते. खानाचा मार्ग अजून कळला नव्हता. नाईक चिंतेत होते, कारण राजेंचे आणि त्यांचे नियोजन खानाच्या मार्गावर अवलंबून होते. शिवाय वाटेत येणार्‍या गावांच्या सुरक्षिततेसाठी हेरांच्या तुकड्या पाठवायच्या होत्या. त्यांना वाटले, खान प्रथम वाईत जाऊन आराम करेल व पावसाळा संपताच तो स्वराज्याकडे सरकेल.

         

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

               

भाग - ४७.

              

खानाच्या छावणीत मसलतीसाठी सैन्याधिकारी, उमराव, सरदार जमले होते. सरदारांमधे इस्माईलखान सुध्दा होता. तो खानाची योजना लक्षपूर्वक ऐकत होता. खान म्हणाला .......

"वाईत जाऊन आम्हाला आमची कबर खोदायची नाही खुल्या मैदानात युध्द करण्यास आपण शिवाजीला उद्युक्त करु. मी मूर्ती-भंजक हिंदुद्वेष्टा आहे तर शिवाजी मूर्तीपूजक आहे. शिवाजीला हिंदुधर्माचा तारक समजले जाते. रयतेचा तो राजा आहे; आणि रयत त्याला ईश्वरासमान मानते. त्यांच्या ईश्वरालाच संपवू, त्यासाठी, कत्तल, मंदिरे तोडणे, मूर्त्या फोडणे हा विध्वंस शिवाजी पाहू शकणार नाही. त्यामुळे खुल्या मैदानात आल्याशिवाय त्याला गत्यंतर राहणार नाही. खानाची योजना ऐकून, सर्वजण खानाची प्रशंसा करु लागले. मनातून चिडलेला इस्माईलला सुध्दा चेहर्‍यावरचे भाव लपवून त्यांचेत सामील व्हावे लागले.

           

शिवाजी राजेंनी राजगडावर सर्व अधिकार्‍यांची बैठक बोलावली. तेवढ्यात पिंगळ्याच्या वेषात नाईक आले. दोघेही मंत्रणा-कक्षात आले. नाईक म्हणाले, 

"खान मी विचार केला त्या मार्गाने न येता, पंढरपूर, इंदापूरकडून येण्याच्या बेतात आहे." हा अंदाज राजेंना आधीच होता. शांतपणे राजे म्हणाले,   

"आपल्याशी त्याला खुल्या मैदानात युध्द करायचे आहे पण आपण त्याच्या सोयीनुसार नाही तर, आपल्या सोयीनुसार युध्द करायला त्याला विवश करु."

"अशी कोणती जागा आहे?" 

"प्रतापगड!" 

       

राजे पुढे म्हणाले ........

नुकतीच गडाची व परिसराची पाहणी केली. गडाचे बांधकाम पूर्ण झाले असून, खानाच्या तोफांचा मारा सहन करण्यास सक्षम आहे. खानाचे कितीही सैन्य असले तरी, प्रतापगड चढणे शक्य होणार नाही. गडावर अशा कांही जागा आहेत, की तिथून मारा केल्यास खानाच्या सैन्याची हानी होईल आणि खान गडाजवळ आला तर, त्याचे सैन्य बेमौत मारले जाईल. त्याशिवाय आपण दोन वर्षे काढू शकू एवढा धान्यसाठा गडावर आहे.


"पण राजे, खान प्रतापगडाकडे येईलच कशाला? " कांही तरी करुन त्याला तसंच करायला लावलं पाहिजे आपण !! "

"तो आला तर अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा." 

"नाईक, "राजे म्हणाले, "आम्ही आमचा मुक्काम प्रतापगडीच ठेवू. तो मैदानांत येण्यास आम्हाला डिवचेल, पण आम्ही बळी नाही पडणार." 

"पण राजे, खान येतांना मार्गातील मंदिरे तोडणार; रयतेवर अत्याचार, कत्तली करणार --- " 

  

प्रश्न खरोखरच गंभीर होता. पण नाईकांना खात्री होती, राजे नक्कीच कांही मार्ग काढतील आणि झालेही तसेच.

              

राजे म्हणाले ........

"नाईक, खानाला मंदिरे तोडण्यापासून तर रोखू शकत नाही, त्याला रोखायचे म्हणजे,  आपण उघड्यावर येणे, तरी पण मंदिरांची पवित्रता नक्कीच टिकवू शकू! खानाच्या मार्गात येणार्‍या मंदिरातील पुजारी, भोपे यांना हेरांकरवी निरोप देऊन, मूर्त्या लपवून ठेवायच्या सूचना द्या. खानाने मंदिरे तोडली तरी, आधी पेक्षा भव्य मंदिरे बांधू पण मूर्ती सांभाळायला हव्यात." 


राजेंच्या आज्ञेनुसार नाईकांनी, खानाच्या मार्गात येणार्‍या गावांच्या रक्षणासाठी हेर पेरले.

"नाईक, आम्ही सांगतो असाच मार्ग खानाचा असायला हवा. पंढरपूर, मलवडी, वाई, सातारा, प्रतापगड ! नाईक, असे करा की, या मार्गाशिवाय खानापुढे दुसरा पर्यायच नसावा. यात दोन फायदे आहेत. एक सह्याद्रीत आपले मावळे खानाच्या सैन्याला डोईजड होतील. दुसरे म्हणजे या मार्गातील बराचसा प्रदेश आदिलशाहीचा असल्यामुळे, तिथल्या जनतेला तो जास्त तोशीश देणार नाही आणि तो स्वतःच वाईचा सुभेदार असल्यामुळे, तिथला प्रदेश उध्वस्त करणार नाही. खान कितीही क्रूर असला तरी, स्वतःचे वतन जतन करणारा आहे. त्यामुळे सामान्य जनता या युध्दात भरडली जाणार नाही."

          

खरोखरच या द्रष्ट्या महान शिवावतारी सत्पुरुषाला कोटी कोटी प्रणाम! काय एक एक अदभुत कल्पना त्यांचेकडून साकार होतात. आश्चर्याने आपण नतमस्तक होतो. मला तर शब्दच सुचत नाही त्यांचेबद्दल लिहायला! असो...

        

हे युध्द होते, राजेंच्या अस्तित्वाचे. खानाच्या सैन्यापुढे राजेंचे सैन्यबळ अगदीच तोकडे असूनसुध्दा, राजे, प्रथम रयतेचा विचार करत होते. 

नाईक म्हणाले, 

"आपल्या रणनीतीसमोर मनःपूर्वक नतमस्तक आहोत राजे आम्ही ! आपल्या प्रत्येक शब्दाचे तंतोतंत पालन होईल." 


"आम्हीही कांहीही हरकत न करण्याचे आदेश सैन्याला देतो. खानाने कितीही हाहाकार माजवला तरी, आपण प्रतिकार केलाच नाही तर त्याला प्रतापगडी यावेच लागेल." 

       

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

             

भाग - ४८.

           

खान ससैन्य जंगलाच्या बर्‍याच आत अगदी बहिर्जी-पथकाच्या गुप्तस्थानाजवळ पोहोचले. तिथे मंदिर दिसल्यावर, खानाने मूर्ती-भंजन करण्याचा सैन्याला आदेश दिला, थोड्याच वेळात गेलेले सैन्य परत येऊन, म्हणाले, "हुजूर मंदिरात मूर्ती नाही." 

"बढीया! " म्हणून त्याने हत्ती वळवला. त्या मंदिरामागेच बहिर्जी पथकाचे गुप्तस्थान असून तिथे हेर लपलेले होते. ते स्थान जर कां त्याच्या नजरेत आले असते तर, पथकातील हेरांची मोठीच हानी झाली असती. खान शिकारीस निघणार असल्याची खबर हेरांना अगोदरच मिळाल्यामुळे, त्यांनी आधीच मूर्ती काढून भुयारात दडवली होती आणि आतां असेच खानापासून स्वराज्यातील मंदिरातील मूर्त्यांना वाचवावे लागणार होते.

       

खानाने पंढरपूरच्या पांडुरंगाचे मंदिर व मूर्ती नेस्तनाबूत करण्याचे आदेश दिल्यावर, त्याच्याच सैन्यात पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेले मराठे पण होते; त्यांनी विरोध करून पाहिला; पण त्यांचे खानापुढे कांही चालले नाही. तरी देखील एक मराठा सरदार पांढरे-पाटील हिम्मत करुन म्हणाला,.......

"हुजूर मराठ्यांची पांडुरंगावर निस्सीम श्रध्दा आहे." पण त्याचे पूर्ण बोलणे न ऐकता, खान म्हणाला, 

"म्हणूनच तर ही खेळी खेळत आहे. मराठे तह किंवा युध्दासाठी शिवाजींवर दबाव टाकतील." 

"पण हुजूर आपल्या सैन्यात मराठा सैनिक...." 

"आदिलशाहीत असणारे सैनिक, मग ते कोणीही असो, त्यांची श्रध्दा अल्लाच्याच  ठिकाणी असावी. जास्त भावनिक होऊ नका पांढरे ! हे राजकारण आहे. विजयासाठी हे आवश्यक आहे. भरपूर धन देऊन मराठा सैनिकांची समजूत घाला."

            

पांढरे आणि इतर सरदारांचा खानापुढे नाईलाज झाला. आणि खान एवढ्यावरच थांबला नाही तर, स्वतःचा मुलगा फाजलखान याच्या बरोबर एक तुकडी देऊन, त्याला तुळजापूरच्या मंदिराकडे पाठवले. पांढरे म्हणाले,  

"हुजूर, आई भवानी हे केवळ भोसलेंचे दैवत नाही तर, इतर मराठा सरदारांचे कुलदैवत आहे." 

"फिर तो पहिली चोट वही देनी चाहीये।"

"पण हुजूर...." 

खान ओरडून मुलाला म्हणाला, 

"उस देवीकी मूर्ती बचनी नही चाहीये। आधी भोसलेंचं कुलदैवत आणि नंतर त्याचे कुलदीपक उध्वस्त करु....." 

शेवटी मराठा सरदार नाईलाजास्तव गप्प झाले. फाजलखान व इलाईसखानास दुसरे दिवशी पहाटेच निघण्याचा खानाने आदेश दिला.

"मंदिरे व मूर्त्या उध्वस्त केल्यावर, मुलखातील हवा तेवढा ऐवज व स्त्रिया लुटा. सैनिकांना खुली सूट द्या."

   

इकडे बहिर्जी-पथकाच्या पण हालचाली सुरू होत्या. नाईकांनी आदेश दिले ---

"बाळाजी तुम्ही, खानाचे लोकं पोहोचायच्या आंत, वासुदेवाच्या वेषात तुळजापूरच्या पुजार्‍याला गाभार्‍यातून मूर्ती काढून लपवायची सूचना द्या. गावातील लोकांच्या दारोदार जाऊन उद्भवणार्‍या प्रसंगाची कल्पना द्या. वासुदेवाचं कथन सत्यच असते असं समजून जनता सावध होतील." 

            

नाईक साथीदारांसह गुप्तस्थाने बदलत खानाच्या जथ्यासोबत जंगलातून पुढे सरकत होते. खानाच्या छावणीतील खबरा नाईकांना त्यांचे हेर देतच होते. 

तेव्हा नाईकांनी परत बोलायला सुरुवात केली. 

  

"आनंदराव तुम्ही वासुदेव बनून पंढरपूरच्या पुजार्‍याला, गावकर्‍याना;  तसेच पंढरपूरच्या संरक्षणासाठी गावाबाहेरील रानात मेंढ्या चारणार्‍या हेर योध्यांना देखीलसूचना द्या. तसेच   हिम्मतराव तुम्ही प्रतापगडी जाऊन, खानाच्या या हकिकतीची खबर राजेंना द्या." 


दोघांनीही नमस्कार करुन नाईकांचा निरोप घेतला.


मुहम्मद बिन कासिम, मुहम्मद गजनवी, मुहम्मद घोरी, बाबर यांनी सिंधू पार करुन हिंदुस्थान काबीज करण्यासाठी, व हिंदूंवर आपली जरब बसवण्यासाठी जीअपवित्र कृत्ये केली होती -- त्याचीच पुनरावृत्ती करण्यास, इलायस व फाजलची तुकडी पंढरपुरी दाखल झाली. परंतु पंढरपुरातील पेठा, वस्त्या सगळीकडे शुकशुकाट होता. दुकानदारांनी दुकाने मोठमोठ्या कुलुपांनी बंद केली होती. सर्व रस्ते ओस पडले होते. मंदिराजवळ पोहोचल्यावर इलियासखानने मूर्त्या व तिजोरी फोडण्याचा सैनिकांना आदेश दिला आणि म्हणाला ; 

"लपलेल्या गावकर्‍यांची खबर नंतर घेऊ."

 

मोठमोठे हातोडे घेऊन ५०-६० सैनिक मंदिरात प्रवेशले. प्रथम ज्या सैनिकाने दारावर हातोड्याचा प्रहार केला त्याच्या डोक्यावर मोठा दगड पडून तो घायाळ झाला. त्यामुळे हिंदु सैनिकांच्या मनांत देव कोपल्याची शंका उद्भवली.


 इलियासखानाच्या निदर्शनास ही गोष्ट आणल्यावर, जोराने ओरडून म्हणाला,

"चला पुढे व्हा... फोडून टाका सर्व मूर्ती." 

       

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

               

भाग - ४९.


इलियासखानचा आदेश होताच सैनिक गाभार्‍यात घुसले तर, त्यांना तिथे एकही मूर्ती नसल्याचे दिसून आले. ही गोष्ट इलियासखानाला सांगितल्यावर इलियास आणखीनच चवताळला.  

"कब तक छुपायेंगे, पूरी बस्तीको आग लगा दो ! कुछ सैनिक यहां रुककर जितना हो सके उतना नाश करो ।"

              

इलियासखानने पंढरपुरातील लाकडी घरे असलेल्या वस्त्यांना आग लावली होती. पेठांची नासधूस केली होती. खानाचे सैनिक येत असल्याची खबर बहिर्जी-पथकाच्या हेरांनी गावकर्‍यांना आधीच पोहोचविल्यामुळे, बऱ्याच  गावकऱ्यानी देशमुखांच्या वाड्यात आश्रय घेतला होता. पण, समस्त गावकरी तिथे सामावणे शक्य नसल्यामुळे, कांही लोक आपल्याच घरांत दारं बंद करुन बसले होते. त्याच्या घरांना आगीने घेरल्यामुळे, ते आकांताने बाहेर पडले, आणि त्यांची सरेआम कत्तल खानाच्या सैनिकांनी  सुरु केली. बायकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबडू लागले. तरुण मुलींना घोड्यावर टाकून पळवत होते. सर्वदूर एकच हाहा:कार माजला. स्त्रियांच्या किंकाळ्यांनी परिसर भयावह झाला होता.

                

एवढ्यात एका सैनिकाची नजर दोन लहान मुलांना घेऊन पळणार्‍या सुंदर स्री वर पडली. त्याने तिला पकडून मुलांना ढकलून दिले व तिच्याच साडीच्या पदराने बांधून घोड्यावर टाकले, आणि  स्वतः स्वार होऊन घोडा पळवला. आर्त स्वरात टाहो फोडत ती लेकरं घोड्यामागे धावू लागली. पण क्षणात घोडा लांब गेला. पती आग लागलेले घर विझवण्यात गुंतला असतांनाच ही घटना घडली. लेकरांना छातीशी कवटाळून, तो हताशपणे गेलेल्या घोड्याकडे पाहत होता. पत्नी नेहमीसाठी त्याच्यापासून दुरावली होती.

            

त्या घोड्याकडे पाहत असतांनाच तो घोडेस्वार सैनिक ओरडून खाली कोसळला. त्याच्या पाठीत कोयता घुसला होता. घोड्यावर बांधलेल्या स्रीने बघितले तर, कांही दिवसांपासून जवळच्या रानात मेंढ्या चारणारी ती धनगरीण होती. त्या स्रीला वाचवल्याबद्दल समाधान वाटत नाही तोच दुसरा सैनिक चवताळून, त्या सशस्र स्रीवर धावून गेला. ती बहिर्जी पथकाची हेर कावेरी होती. तिने त्या सैनिकाचा अंदाज घेऊन हर हर महादेव असा जयघोष करत हवेत उडी घेतली व त्या सैनिकाच्या कपाळावर कोयत्याचा वार केला. तो खाली पडताच त्याचीच तलवार उचलून येणार्‍या आणखी दोन सैनिकांवर एकटीच तुटून पडली. पथकाच्या आणखी एका हेराने एकाचा मुडदा पाडला. पंढरपूरच्या वेगवेगळ्या भागात सोळा हेर गावकर्‍यांच्या वेषात लढत होते, त्यांना गावकरी समजून यवन सैनिक पळत सुटले. दोन सैनिकांनी कावेरीला अजूनही घेरलेले होते. एकाच्या तलवारीचा तिच्या डाव्या हाताला निसटता स्पर्श झाल्याने रक्त वहात असूनही ती लढत होती. एक सैनिक मागून वार करणार तोच; लगेच तो धरणीवर कोसळला. त्याच्या मागे असलेल्या हेराचा खंजिर त्याच्या मानेत घुसला होता. सैनिक पडल्याचे पाहून, दुसर्‍यावर कावेरी तुटून पडली. तो आश्चर्यचकित होऊन खाली कोसळला. त्या हेराला बघून कावेरी म्हणाली, "धन्यवाद, महादु अण्णा!"

    

"अगऽ! असं कां केलेस? आपण हाकेच्या अंतरावर राहायचे ठरवल्यावर, एकटी इकडे कशी आलीस? आधीच आपली संख्या कमी, तुला कांही झाले असते तर?" हेर तुकडीत महादू आण्णा वयस्कर होते. दक्षिणेत त्यांनी कान्होजी जेधेचा हेर म्हणून काम केले होते.

           

कावेरी त्या स्रीजवळ गेल्याबरोबर तिने

कावेरीला घट्ट मिठी मारुन म्हणाली, 

"ताई ! आज तुमच्यामुळे वाचले. कसे उपकार फेडू तुमचे?" 

"तुला उपकारच करायचे असतील तर, अशा प्रसंगी घाबरुन न जाता, मृत्युची फिकीर न करतां असाच एखाद्या स्रीवर प्रसंग आला तर, तिला वाचव. स्री ही दुर्बल नसते जशी तिच्यात जन्म देण्याची ताकद असते, तसंच संपवण्याचीही ताकद आहे. मी सुध्दा अशा प्रसंगातून गेले आहे." 

          

एवढ्यात त्या स्रीचा पती दोन्ही मुलांना घेऊन आल्याबरोबर दोन्ही मुलं तिला रडत बिलगली. माय लेकरांची ती अपूर्व भेट बघून, कावेरीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, पण निग्रहाने तिने परतवले. खोल श्वास सोडत जड अंतःकरणाने आपल्या साथीदारांबरोबर निघून गेली. वस्तीची आग विझवण्यासाठी गावकर्‍यांची धावपळ सुरु होती आणि त्यांच्या न कळत त्यांना मदत करणारे बहिर्जी-पथकाचे हेर रानात आपापल्या मेंढ्याकडे रानात जात होते. एवढा मोठा पराक्रम करुन देखील श्रेय घेण्याचे त्यांच्या मनातही आले नाही. गुप्तता हाच त्यांचा खरा सन्मान होता.

      

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!   बहिर्जी नाईक  !!!

               

भाग - ५०.


या भागात सध्याचं ऐतिहासिक कथानक पुढे बघण्यापूर्वी; आत्तापर्यंतच्या कथानकाचा किंचित आढावा घेऊ यात. 


बहिर्जी पथक विजापुरातील अचूक खबरा आधीपासूनच काढू लागले होते. अगदी खानास मोहीम दिली गेली त्याच्याही अगोदरपासूनच्या खबरा राजेंपर्यंत जात होत्या. त्यावर विचारमंथन होऊन पुढच्या चाली निश्चित केल्या जात होत्या. याउलट; आदिलशाहीत राजेंनी उडविलेल्या धामधुमीमुळे खवळलेल्या बेगमने तडकाफडकी अफझलवर मोहीम सोपवली. खानही लगेच लाखभर फौज घेऊन निघालाय सुद्धा ! कसलेही नियोजन नाही यात. बस्स -- हुकूम आला; की निघाला. खान निघाल्यापासूनचे अगदी बारीक सारीक तपशील देखील राजेंपर्यंत जात होते. रणनीती म्हणून खानास वाईत येणे भाग पाडायचे नियोजन केले गेले ! आणि पूर्णत्वास पण गेलं हे नियोजन !! ★★ मंदिरातील मूर्ती वांचविणे हा रयतेच्या श्रद्धांना जपण्याचा भाग राजेंनी हेर-पथकाच्या साह्याने अंमलात आणला. प्रसंगी हेर देखील लढलेत यासाठी -- आणि तेही गांवकऱ्याच्या; धनगरांच्या वेषात ! लढल्यानन्तर ते सगळे चुपचाप आपापल्या स्थानी जाऊन पुढील हालचालींसाठी सज्ज झालेत. हेर गांवकऱ्यानाही मदत करून त्यांचे मनोबल वाढवताना दिसतात. 

   

आता अलीकडचा इतिहास बघा. दुसऱ्या महायुद्धात बहुतेक कोणत्याही राष्ट्राने असं नियोजन केलेलं दिसत नाही. प्रत्यक्ष युद्धाबरोबरच अंतर्गत कारभारावर म्हणावे तेवढे लक्ष दिलेले दिसत नाही. फक्त इंग्लडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल या बाबतीत अधिक चतुर निघाले. त्यांनी सैनिकांचं मनोबल तर वाढवलंच; आणि जनतेस पण राष्ट्रभक्तीनं प्रेरित केलं. म्हणून तर ६-७ वर्षे युद्ध चालले तरीही इंग्लण्डमध्ये कोठेही ढिलेपणा वा अंदाधुंदी दिसून आली नव्हती. ■■ आपला -- भारताचा शिवकालीन इतिहास त्यांनी अभ्यासला होता. ■■ आणि तीच रणनीती त्यांनी युद्धस्थानी आणि देशांतर्गत कारभारात प्रत्यक्ष उतरवून दाखवली होती आणि इकडे आपण अहिंसेच्या भोंगळ तत्वांना कुरवाळीत बसलो होतो. खरं तर ब्रिटिशांविरुद्ध जोरदार उठाव करण्याची संधी आपण व्यर्थ दवडली होती. असो ! आता मागील कथानक पुढे बघू ---


दुसर्‍या दिवशी अफझलखानाच्या दोन्ही तुकड्या, पंढरपूर व तुळजापूरची नासधूस करुन छावणीत परत आल्या. त्यांनी दोन्ही मंदिरांची तोडफोड केली पण मूर्त्यांना बहिर्जीं पथकाच्या हेरांमुळे झळ नाही पोहोचवू शकले ते !! 

       

बहिर्जी पथकाच्या योध्यानी पुन्हा आपल्या कर्तृत्वाने राजेंचा विश्वास सार्थ ठरवला होता. राजेंचे कुलदैवत आई तुळजाभवानी आणि सार्‍या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला यवनाचा स्पर्शही होऊ दिला नाही. (इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की; तुळजा भवानीची मूर्ती दूर नेऊन जिथे लपवली गेली होती; त्या गांवी आज भव्य मंदिर आहे भवानीचे.) 

            

कितीही नासधूस केली तरी शिवाजी राजे प्रतापगडावरुन हलत नाहीत असे बघून, आणखी आठ दिवस पंढरपूरला थांबून, निराश झालेला खान, त्याच्या सल्लागार रशीदला म्हणाला, 

"आतां आपल्याला वाईकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. वो डरपोक सिवा खुले मैदानमे युध्द नही कर सकता।" 

"पण हुजूर.." 

"कुछ नही होगा । अफझलखान हूँ मै । शिवाजीके बापसे टक्कर लेनेकी ताकद रखता हूँ । ये शिवाजी मेरे सामने बच्चाही है। हम उसके बिना विजापूर नही लौटेंगे। उसे जिंदा या मुर्दा बादशाह के पैरो मे पेश करुंगा। रशीद, वाईला आमचा संदेश कळवा, तीन वर्षे पुरेल एवढा दाणागोटा भरायला सांगा. तसेच सय्यद बंडा आणि चाणाक्ष कृष्णाजी भास्करला आम्हाला भेटण्याचा निरोप द्या, त्यांचेशी मसलत करायची आहे." 

             

आज सकाळीच खानाचे सैनिक मलवडीकडे निघाले आणि इस्माईल खानाच्या सहाय्याने विश्वासराव बाहेर पडले. खानाच्या सैन्यात बहिर्जी पथकाच्या हेरांनी आपले व्यवस्थित बस्तान बसवले होते. छावण्या आणि तंबूचे द्वाररक्षक बहिर्जींचेच हेर असल्यामुळे, हेरांना बाहेर जाणे व आंत येणे सुलभ झाले होते.

     

खान वाईकडे निघणार असल्याचे विश्वासरावांनी सांगितल्यावर, नाईक म्हणाले, 

"म्हणजे खान वाईकडे निघाला तर?" 

"होय नाईक!" 

नाईक कांही साथीदारांसह मेंढपाळ म्हणून एका रानात थांबले होते. गरज नसतांना;  हिंस्र श्वापदापासून संरक्षण व्हावे असे वाटावे म्हणून, शेकोटी पेटवून खाटेवर बसले होते. नाईक मेंढपाळाच्या वेषात होते. पथकातील स्त्रिया उभ्या होत्या. कावेरी आणि अण्णा देखील याच तांड्यासोबत होते. आणखी दहा हेर मेंढपाळ बनून, कांही मैलावर थांबले होते. आता हेर जंगलात लपून न राहतां, खानाच्या छावणीपासून विशिष्ट अंतर राखून मेंढपाळ म्हणून थांबत असत.


छावणीतील बाजारबुगण्यांच्या रुपातील हेर, मेंढपाळाच्या वेषातील हेरांना भेटून खबरांची देवाण घेवाण करीत असत. खानाच्या अधिकार्‍यांना गाफील ठेवण्यासाठी, बाजारबुगणे हेर; मेंढपाळाकडून दूध, तूप घेऊन छावणीत परतत असत.


"म्हणजे खानाचा रस्ता निश्चित झाला तर? " 

"होय नाईक, पण मी एवढंच सांगायला नाही आलो, ही खबर तर एखाद्या हेराकडूनही पाठवता आली असती." 

"बोला विश्वासराव!" 

"खानाने सय्यद बंडा व कृष्णाजीपंत कुलकर्ण्यांना बोलावले आहे. ही पण एवढी गंभीर वार्ता नाही." 

"मग गंभीर वार्ता सांगा लवकर."

"नाईक, खानाचे कांही हेर, राजेंवर लक्ष ठेवून आहेत. मीही त्यांचेवर लक्ष ठेवून आहे." 

नाईक प्रशंसा करत म्हणाले, "छान !"


ही पारंपारिक हेरगिरीची पध्दत आपल्या हेरांनी मोडून काढली होती. राजेंना भेटायचे झाले तर हे हेर कोणतेही सोंग वठवून भेटत असत. या हेरांना फक्त राजेच ओळखत असल्यामुळे, शत्रूच्या हेरांना -- हे राजेंचे हेर भेटतात हे कळू शकत नव्हते. तसे खानाच्या बाबतीत नव्हते. त्याच्या हेराकडे खानचा शिक्का असलेला परवाना असेल तरच द्वाररक्षकांना दाखवून मगच छावणीत येऊन एकांतात खानाची भेट घेऊन निघून जात. (हा परिच्छेद व्यवस्थित समजून घ्यावा.)

"विश्वासराव, तुम्ही त्या हेरांची ओळख लक्षात ठेवली ना? " 

"होय ! ती सहा माणसे आहेत." 

"मग तुम्ही तात्काळ शिवराळला जाऊन, त्या सहा हेरांचे वर्णन विश्वनाथजींना सांगा. त्या नुसार त्यांनी चित्र काढले की, आपल्याला त्या हेरांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल." 

नाईक त्याच विश्वनाथसंबधी बोलत होते, जे राजेंचे बालपणीचे सवंगडी होते. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांनाही बहिर्जी पथकात महत्वाचे स्थान होते. शिरवळच्या जंगलातील गुप्तस्थान असलेल्या गुहेत राहून, हेरांनी वर्णन केल्यानुसार, ते 

किल्ल्याचे नकाशे काढून देत असत. त्यामुळे राजेंना योग्य व अचूक माहिती मिळत असे. खान स्वराज्याजवळ पोहोचत होता. त्याचे मनसुबे राजेंना पोहोचवणे व त्या हेरांचा बंदोबस्त ताबडतोब करायचा होता.

          

क्रमशः🙏🙏🙏🙏🙏


(वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )