Ad Code

Responsive Advertisement

बहिर्जी नाईक | Bahirji Naik Part 51 to 55 | बहिर्जी नाईक भाग ५१ ते ५५

 !!!  बहिर्जी नाईक  !!! भाग ५१ ते ५५


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

भाग १ ते ५

भाग ६ ते १०

भाग ११ ते १५

भाग १६ ते २०

भाग २१ ते २५

भाग २६ ते ३०

भाग ३१ ते ३५

भाग ३६ ते ४०

भाग ४१ ते ४५

भाग ४६ ते ५०


भाग - ५१.

     

शिवरायांना शत्रूपक्षाचे अगदी बारीक सारीक तपशील हेरांकडून समजत असल्यामुळे; राजे प्रत्येक लढाईसाठी स्वतःस सोयीची अशीच रणभूमी निवडून प्रतिपक्षाला तिथेच येणे भाग पाडू शकत होते. अपवाद फक्त मिर्झा राजांचाच ! आत्ताही बघा -- खान वाईस निघालाय. वाई; जावळीचे खोरे; आणि प्रतापगड; राजेंना अत्यन्त अनुकूल; तर खानासाठी पूर्णतः प्रतिकूल असेच होते. आता कथानक पुढे बघू यात आपण !

  

अफझलखानची छावणी मळवडला पडली होती. संध्याकाळच्या सुमारास कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा व सोबत ८-१० सैनिकांनी खानाच्या छावणीत प्रवेश केला. कृष्णाजी भास्कर चांगला योध्दा नसला तरी, एक कुशल राजनीतीज्ञ होता. तो फक्त नामधारी ब्राम्हण होता. त्याने एकही धार्मिक कार्य केले नव्हते. तो वाईचा नामधारी किल्लेदार आणि खानाचा अतिशय विश्वासू होता. सय्यद बंडा तर खानाशी पूर्णपणे एकनिष्ठच होता. या दोघांच्या हाती कांही दिवसांसाठी खानाने वाईचा कारभार दिला होता. दोघेही आसनस्थ झाल्यावर, खान म्हणाला,

"प्रतापगडाची निर्मिती केवळ आपल्या मुलखात हस्तक्षेप करण्यासाठी केली गेली आहे. कृष्णाजी, तो किल्ला कसा आहे?" 

"शिवाजीने कमालीची गुप्तता राखली असल्यामुळे फारशी माहिती नाही मिळू शकली." 

"तुम्हाला कांही वर्षापूर्वी विचारले होते, तुमचा परिवार तुमच्या सोबत कां राहत नाही? " 

"मी धर्मकार्य करीत नाही." 

"म्हणूनच तुम्ही आमचे वफादार आहात आणि एक दिवस  आदिलशाहीचे सर्वोच सरदार बनाल."

"बघा, तुमच्या दूरदृष्टीने आज मी आदिलशाहीचा सर्वोच्च सरदार बनलो." 

"अशीच दूरदृष्टी ठेवून प्रतापगडावरुन शिवाजीला खाली आणण्याची योजना करा. वचन देतो, शिवाजी संपल्यावर वाई तुमची! तुम्ही वाईचे वतनदार व मी आदिलशाहीचा वजीर! त्याही पुढे जाऊन संपूर्ण आदिलशाहीच माझ्या मुठीत असेल."

       

"हुजूर येतांनाच माझ्या डोक्यात एक योजना आली, त्या योजनेनुसार, जर शिवाजी प्रतापगडाखाली आलाच  नाही; तर आपण गडावर जाऊन मारु."

"कसे?" 

"या मलवडमधे एक प्रसिध्द व्यक्तिमत्व आहे, बजाजी नाईक- निंबाळकर. त्याला कैद करा." 

"पण तो आदिलशाहीच्या पक्षातील आहे." 

"होय पण तो शिवाजीचा शालक आहे. त्याची मोठी बहीण सईबाई ही शिवाजीची जेष्ठ राणी आहे." 

"ठीक आहे. उद्याच निंबाळकरांना कैद करण्यात येईल." 

         

इकडे - - - - - नाईक राजेंना म्हणाले, 

"खानाला कळून चुकले आहे की शिवाजी राजे खुल्या मैदानात येणार नाहीत.

"नाईक, तुमच्या पथकाने रयतेचे संरक्षण व महाराष्ट्रातील कुलदैवतांच्या मूर्तीची पवित्रता राखली." 

"होय राजे, अशाच भविष्यकाळातील मोठ्या लढायांसाठी या पथकांची निर्मिती केली आहे. अशाच प्रशिक्षित हेरांच्या सामर्थ्यामुळेच आपण शत्रूचे डावपेच हाणून पाडीत आहोत." "खानाचा आणखी एक डाव हाणून पाडावा लागेल. खान वाईकडे सरकला आणि आपण प्रतापगडावर! या गडावर आक्रमण करणे त्याला शक्य नाही नाईक." 

"राजे, खानाने वेगळाच धूर्त डाव आखला आहे. त्याने महाराणी सईबाईचे बंधू बजाजी निंबाळकरांना कैद करण्याचे फर्मान काढले आहे. त्यांचा या युध्दात सहभाग नसला तरी ते केवळ आपले शालक आहेत; म्हणून त्यांना शिक्षा देण्यात येत आहे. ही योजना त्या कृष्णाजीच्या डोक्यातून निघाली आहे. बजाजींना सोडवण्यासाठी, युध्द; किंवा युध्दासाठी तुम्ही गड सोडून बाहेर पडणार असा दोघांचा कयास आहे." 

"ही वार्ता जर आजारी महाराणी सईबाईंना कळली तर, त्यांना हा धक्का सहन नाही व्हायचा. ही वार्ता सईपर्यत जाणार नाही ही दक्षता घ्या नाईक." 

"राजे, बजाजीची सुटका कशी करायची?"  


छावणीत खान आणि कृष्णाजी बसले होते. बहिर्जींचे हेर सर्वत्र लक्ष ठेवून होते. खानाच्या समोर एका रुबाबदार व्यक्तीला दोरखंडाने हात मागे बांधलेल्या अवस्थेत कैद करुन आणण्यात आले. ती व्यक्ती आल्या-आल्या खानावर कडाडली.

"मला कैद करण्याचे कारण? " 

"शांत! शांत व्हा बजाजी, अपराध असल्याशिवाय कां कैद केले? आणि अफझलखानासमोर कैदी गुन्हा विचारत नसतो, दयेची भीक मागतो. चल माग भीक!! "

"भीक? आणि कशाबद्दल? मी कांहीही गुन्हा केलाच नाही तर कां भीक मागू? आमच्या बापजाद्यापासून आम्ही आदिलशहाशी इनाम राखून आहोत, त्याबद्दल कां ही शिक्षा? आदिलशाही संपून अफझलशाही उदयास आली की काय?" बाजूलाच उभ्या असलेल्या पांढरे सरदारास, बजाजी म्हणाले, 

"बघा पांढरे, तुम्ही लहानपणापासूनचे माझे मित्र, म्हणून सांगतो सावध रहा! आदिलशाहीशी इनाम ठेवण्याची कशी शिक्षा मिळते? बघताय ना ?" "खामोशऽऽऽ! तुझा गुन्हा आहे, तू कित्येक शेतकर्‍यांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आहेस. रीतसर तक्रारी तुझ्याविरुध्द आल्या आहेत." 

"हा आरोप पूर्णतः खोटा आहे."


आणि क्षणात सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते शिवाजींचे शालक म्हणून त्यांना कैद करण्यात आले होते. ते कडाडले --

"असं असेल तर शिक्षा करण्याचा अधिकार केवळ मळवडीचे वतनदार पांढरेंना आहे."

"जबान बहोत चलाते हो ?" 

"होय -- कारण आम्ही स्वाभिमानी आहोत."

"घेऊन जा याला आणि हत्तीच्या पायाखाली चिरडून टाका याचा स्वाभिमान." खानाच्या हुकुमाने ओढत घेऊन जात असतांना, खान ओरडून म्हणाला, 

"आधी याला १००० चाबकाचे फटके मारा."

     

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!


भाग - ५२. 

       

"नाईक, बजाजींना क्रूर शिक्षा होण्याआधी त्यांना सोडवायला हवे. बजाजी म्हणजे आमच्या राणी साहेबांचा श्वास आहे." 

"राजे, ही करतूत त्या कृष्णाजीची आहे. तुम्ही फक्त आज्ञा द्या." 

"नाही नाईक, आपण आधी अफझलखानला संपवू. त्याला संपवायला जास्त अवधी लागणार नाही." 

          

"पण बजाजींना सोडवायचे कसे?" चिंतित होऊन नाईकांनी विचारले. नाईकांची अशी अवस्था क्वचितच होत असे. एरवी शांतपणे विचार करुन केवढीही मोठी समस्या असली तरी तोडगा काढीत असत ते ! आतां प्रश्न आहे महाराणीच्या जीविताचा. बजाजींना नुकसान पोहोचले तर, आजारग्रस्त महाराणी दुःख पचवू शकणार नाहीत. 

"राजे, बजाजींची सुटका आपले हेर करुं शकतात." 

"नाही नाईक. बजाजींची सुटका जेवढी आवश्यक आहे तेवढीच स्वराज्याचीही आहे." 

"पण खानरुपी संकट आपण बहिर्जी पथकाशिवाय परतवू शकत नाही. " 


"पण नाईक, खानाला कळले की, बजाजीची सुटका आपल्या हेरवीरांनी केली, त्याच्या छावणीत आपली माणसे आहेत, त्यानंतर तो काय करेल हे तुम्ही चांगले जाणतां." 

राजे कांही वेळ विचारमग्न झाले, मग एकाएकी म्हणाले, 

"नाईक, एक व्यक्ती आहे, तिने मनावर घेतले तर, बजाजीची सुटका सुखरुप होऊ शकेल."

"कोण राजे?" 

"सरदार पांढरे!" 

"होय राजे, पांढरे खानाचा अत्यंत विश्वासू आहे. त्याच्या आग्रहापुढे खानाला नमते घ्यावे लागेल." 

"नाईक, ठोस योजना बनवा, पण आपल्या सहभागाची किंचितही शंका खानाला यायला नको." नाईक योजना आखण्यात गढले.

            

विश्वासराव आदिवासीच्या वेशात डोंगर चढून गुहेजवळ आले. धुनी पेटवून बाहेर बसलेल्याला साधू हेराला त्याने विचारले, 

"विश्वनाथजींना निरोप कळवला ना?" 

"होय! सकाळपासून ते तुमच्याच प्रतिक्षेत आहेत. " 

     

विश्वासराव गुहेत शिरले. विश्वनाथ पलंगावर पहुडले होते. त्यांनी सर्व चित्रे काढायला घेतलीच होती. विश्वासराव आत आलेले बघताच विश्वनाथ उठून बसले. दोघेही बसले व विश्वासराव वर्णन करीत असलेल्या राजेंच्या मागावर असलेल्या सहा हेरांचे वर्णन सांगत होते आणि विश्वनाथ त्यांची चित्रे त्यानुसार पुढे रेखाटू लागले.

      

इकडे पांढरे नाईक सरदाराच्या वाड्यावर प्रतिष्ठित वतनदार गोंधळ घालून बजाजींच्या सुटकेची मागणी करीत होते. 


"बजाजी तुमचे परममित्र असून त्यांना मरणाच्या दाढेत जाऊ देता का? आज जर निरपराध बजाजींना वाचवू शकला नाही तर, उद्या तुमच्या वतनातील रयत, आमचं रक्षण कसं कराल? असं विचारू लागेल." एक व्यापारी  तर म्हणाला -----

"बजाजीमुळे आमच्या व्यापाराला संरक्षण होते. त्यांच्यामुळे व्यापाराची घडी नीट बसली होती. तुम्ही त्यांचा असा निरर्थक बळी नाही देऊ शकत. आमची पोच खानापर्यंत नाही पण तुम्हाला शक्य आहे. आमची सर्वांची विनंती आहे, तुम्ही पुढाकार घ्यावा." 

             

सर्वांचे म्हणणे पांढरे नाईक सरदारांना पटत होते. बजाजी त्यांचेही मित्र होतेच. मनांत अनुकंपा होती. पण खानापुढे ते हतबल होते. सर्व सरदार व व्यापारी पांढरेंवर दडपण आणत होते. अर्थात या सर्वामागे राजे व नाईक पथकाचा हात होता.


बहिर्जी-पथकाच्या हेरांनी मळवडच्या मुलखात पांढरे सरदाराबद्दल गैरसमज पसरवला की, विनाकारण निरपराध बजाजींना कैद केले आणि वतनदार पांढरे जराही खानाला विरोध करत नाही. पांढरेंच्या एका शब्दाने बजाजींची सुटका होऊ शकते.

        

हा समज पूर्ण मळवडमधे पसरवला होता. परिणामी बजाजींचे हितचिंतक एकत्र येऊन पांढरेंना गळ घालू लागले. आतां हा विषय पांढरेंच्या प्रतिष्ठेचा झाला होता.

"काळजी नका करु. बोलतो खानाशी."

सर्वांचा विश्वास होता पांढरेवर. सर्वांना आश्वासन देऊन खानाच्या छावणीत ते पोहोचले. ते आपला मुद्दा खानाला पटवून देत असतांना कृष्णाजी भास्कर त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत होते. कारण बजाजींना कैद करण्याची योजना त्यांची होती व ती पूर्णत्वास न्यायची होती.

          

पांढरे म्हणाले, 

"कृष्णाजी माझी बाजू समजून घ्या. आदिलशाहीचा शत्रू तो माझाही आहे. शिवाजींबद्दल कांही माझे प्रेम उतू नाही जात आहे, पण आपली योजना आपल्यावरच उलटली तर? शिवाजी महासंयमी आहे. त्यांच्या शालकाला मृत्युदंड दिला तरी झुकणार नाही. फरक मात्र आपल्याला पडेल." 

"आपल्या अवाढव्य सैन्यासमोर त्याची एवढीशी फौज कांहीच करु शकत नाही."  "प्रत्येक वेळी होणारी हानी ही सैन्यबळावर टाळता येत नाही कृष्णाजी! आपल्याच वतनात आपले सरदार, व्यापारी, आणि रयतेचा विरोध आपल्याला पत्करावा लागेल. भविष्यात फार मोठा धोका उद्ववू शकतो. खानसाहेब, विचार करा."

        

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

              

भाग - ५३ 


आता या प्रस्तुतिमध्ये आपण प्रथम शिवराय आणि बहिर्जी-पथकाचे राजनैतिक कंगोरे बघू यात.

    

स्वतःला सोयीस्कर असे रणक्षेत्र राजेंनी निवडलं. प्रतापगड ! खान नाईलाजाने वाईकडे निघालाय. खान आला की लवकरच पावसाळा पण सुरू होणार होताच. आता अलीकडील इतिहास बघा. अगदी हीच रणनीती स्टॅलिनने दुसऱ्या महायुद्धात वापरली होती. प्रथम हिटलरशी अनाक्रमण करार करून; युद्ध सुरू असताना रशिया पूर्णपणे चुप राहिला. त्या अवधीत सीमेवरील सर्व कारखाने दुसरीकडे हलवले. स्वतःची क्षमता वाढवून संभाव्य नुकसान कांहीं अंशी टाळलं. शिवाजी महाराजानी पण हेच केलंय प्रत्येक प्रसंगात. ■■ रशियात कडाक्याची थंडी सुरू होते तेव्हा जर्मनीची खुसपटे काढून हिटलरला आक्रमणास प्रवृत्त केलं. आणि हिटलर चकला तो इथेच ! परिणाम ? सम्पला तो ! ★★ अशीच रणनीती इंदिराजीनी १९७१ च्या बांगला युद्धात वापरली. हवामानात बदल झाल्यावर लष्कर-प्रमुख सॅम माणकेशा यांच्याशी चर्चा करून; थेट हल्लाबोल केला. पुढील इतिहास आपण सर्वजण जाणतोच. 

    

आता राजेंची परिस्थिती बघू. अफझल येतोय हे समजताच; कुतुबशाहीशी सख्य केले. निजामास तटस्थ राहण्यास भाग पाडले. राहता राहिली मोंगलशाही ! पूर्वी या अफझलने औरंगजेबाला पकडून त्याचे प्राण कंठाशी आणले होते. म्हणजे तो काहीही करणार नाही हे राजे ओळखून होते. अफझल वाईकडे निघाल्याची खबर औरंगजेबाला मिळाली; तेव्हा बडी बेगम आणि इतर मुत्सुदी त्यांस; हीच संधी घेऊन शिवाजीला संपवावे असा आग्रह करीत होती. त्यावेळची त्याची प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे. तो म्हणतो-- "अब दोनो काफर मिलेंगे। ये मुलाकात तो सिर्फ एक बहाना है। देखना सिर्फ इतनाही है कि; कौन किस का कत्तल करता है और कौन बचता है ?"

    

किती अचूक होती राजांची रणनीती ? 

       

आता कथानकाचा पुढील भाग या पार्श्वभूमीवर बघावा...

        

सरदार पांढरे नाईक पुढे म्हणाले, 

"जरी बजाजी निंबाळकर शिवाजींचे शालक असले तरी ते आदिलशाहीचे समर्थक आहेत. व्यापारांना त्यांचे संरक्षण आहे. रयतेच्या मनात त्यांचेबद्दल आदर, स्नेह आहे. त्यांना शिक्षा करुन आपण फार मोठी चूक करीत आहोत." आत्तापर्यंत दोघांचा वाद शांतपणे ऐकत असलेला खान  एकदम ओरडला, 

"खामोशऽऽऽ! माझ्यासमोर उभे आहात हे दोघेही विसरु नका. कृष्णाजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त माझे सल्लागार आहात. कोणत्याही योजनेचा अंतिम निर्णय माझा असेल."

मग पांढरेकडे पाहत तो  म्हणाला, 

"तुम्ही वतनदार आणि मी आदिलशाही सरदार! ही मोहीम माझ्या योजनेनुसार आखली गेली आहे. तेव्हा फायदा-तोट्याला मी जबाबदार असेन. तरी सुध्दा, आपने सही फरमाया ! बजाजीला मारुन, शिवाजींवर कांहीच परिणाम होणार नाही, झाला असतां तर, आत्तापर्यंत शिवाजीने कांहीतरी पाऊल उचललेच असते. आपलीच रयत, व्यापारी, सरदार हे आपल्यावर नाखूश होत असतील तर, रीहा करा त्या  बजाजीला," 

"पण हुजूर...."  

"बस्सऽऽ... पुरे झाले डावपेच, शिवाजीला खुल्यामैदानात खेचण्याचे. आतां शिवाजीला त्याच्या बिळात (किल्यात) जाऊनच आम्ही मारु. आता अशीच रणनीती आखणार आहे हा अफझल." 

                

जावळीच्या घनदाट जंगलात बहिर्जी पथकातील हेरांची साखळी तयार करण्यात आली. अनेक ठिकाणी डोंगर पोखरुन गुफांची निर्मिती करण्यात आली. गर्द राईच्या आडोशाने जमिनीत भुयारे बनवण्यात आली. अफझलचे सैन्य जावळीत पोहोचण्याआधीच बर्हिजीचे हेरपथक सज्ज झाले होते. खानाच्या पथकात असलेले बहिर्जींचे हेर खानाची सर्व माहिती जावळीत विखुरलेल्या हेरांना पोहोचवीत होते आणि जंगलातील हेर त्या बातम्या राजेंना पोहोचवीत होते. शिवाय त्यांना आणखी एक महत्वपूर्ण काम करायचे होते. त्यासाठी दोन हेर, महादेव आप्पा आणि गुणाजी प्रतापगडाच्या जवळ असलेल्या कुंभर्शी गावी पोहोचले. कुत्र्याला त्या दोघांचा वास लागू नये म्हणून त्यांनी विशिष्ट वनस्पतीचा रस अंगावर लेपन करुन अंधार पडल्यावर, अंगावर घोंगडी घेऊन गावात शिरले. दोन-तीन दिवसापूर्वी शोध घेतलेल्या घराजवळ पोहोचून हळूच खिडकीतून घरात शिरले. पलंगावर झोपलेल्या व्यक्तीचे तोंड बांधून त्याला पोत्यात भरले व खांद्यावर टाकून दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले. गर्द झाडीत असलेल्या बहिर्जी-पथकाचे गुप्तस्थान असलेल्रा भुयारात ते प्रवेश करणार एवढ्यात त्यांना चाहूल लागल्याचा भास झाल्यामुळे ते झुडपाआड लपले. कांही क्षणातच दुसर्‍या दोन हेरांनी आणखी एका माणसाला पोत्यात भरुन आणले होते. चौघेही हेर ती दोन पोती घेऊन सावधपणे भुयारात उतरले. भुयाराची रचनाच अशी होती की, भुयारातील आवाज किंवा प्रकाश बाहेर जाऊ शकत नव्हता.


भुयारात ५-६ हेर आणि नाईक बसले होते. पोत्याचे तोंड सोडून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. दोघेही बेशुध्द होते. नाईकांसमोर दोन चित्रे धरण्यात आली. ह्या दोन व्यक्तींची ती चित्रे होती. महादेव आप्पा पुढे येऊन म्हणाला,  

"नाईक हा वामन हरी, कुंभर्शी गावात लपला होता. याची बहिण कुंभर्शीचीच असल्यामुळे तिच्याकडे राहून, तिथून प्रतापगड जवळ असल्यामुळे, राजेंच्या हालचालीवर लक्ष ठेवणे त्याला सोयीचे होते,"


"नाईक, ही दुसरी व्यक्ती, प्रतापगडावरील मंदिरात फुलं पोहोचविण्याचं काम करीत असते. याचं नाव दिगंबर, मूळ वाईचा रहिवासी, खानाचा जुना हेर! खान विजापूरहून निघण्याआधीच हा राजगडी पोहोचला होता. याचे काम आईसाहेबांकडून राजेंकडे येणार्‍या बातम्यांवर लक्ष ठेवणे. पण या लोकांना हे माहित नाही की बहिर्जी पथकाचे हेर फक्त शत्रूगोटाकडेच लक्ष ठेवीत नाहीत तर, राजेंच्या आसपास सुध्दा लक्ष ठेवून असतात. मला खात्री आहे, याला एकाही बातमीचा सुगावा लागला नसावा." 

             

त्या दोघा कैद्यांच्या तोंडावर पाणी  शिंपडल्यावर ते शुध्दीवर आले. अजूनही ते बांधलेल्या अवस्थेतच होते. डोळे उघडल्यावर, त्यांना दिसले ---, ते अपरिचित ठिकाणी असून आजूबाजूला ५-६ अनोळखी लोक बहिर्जी नाईकांसह होते. वृध्द दिगंबरने ओरडून विचारले,  

"कोण आहात तुम्ही? इथे मला कां आणले? काय वैर आहे माझेशी? हात मोकळे करा. मी कोण आहे माहित नाही तुम्हाला. कोणाला कैद केले? याचा परिणाम अत्यंत वाईट होईल,"  

    

यावर नाईकांनी सांगितले ---

"लक्षात ठेवा. वैर तुम्हा दोघांशी नाही. वैर आहे तुमचा धनी अब्दुला-भटारी उर्फ अफझलखानाशी!

       

क्रमशः🙏🙏🙏🙏

!! बहिर्जी नाईक  !!!

            

भाग - ५४.


नाईकांच्या तोंडून अफझलखानाचे नाव ऐकताच दोन्ही कैद्यांनी चमकून पाहिले. तसे ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते. बहिर्जीच्या प्रशिक्षित तुकडीप्रमाणे अफझलची नव्हती. हे हेर फक्त बक्षिसीसाठी स्वतंत्रपणे काम करीत असत.

"म्हणजे? तुम्ही शिवाजींची माणसे आहात कां ?" 

वामन हरीने विचारले. 

"होय! असच समज." 

दोन्ही हेरांना आता कळून चुकले की ते शत्रूच्या तावडीत सांपडले आहेत. दोघेही चांगलेच गोंधळले होते. त्यांची स्थिती बघून, नाईकांनी विचारले, 

"तुम्ही अफझलखानापर्यंत कोणत्या खबरा पोहोचविल्या आहेत ? दोघांच्याही तोंडून शब्द निघत नाहीसे बघून नाईक बोलले; 

"गुणाजी यांना बाहेर नेऊन फासावर लटकवा, हे असे सांगणार नाहीत." 

"थांबा... थांबा... आम्हाला विशेष अशी कोणतीच खबर न मिळाल्यामुळे कांहीच कळवू शकलो नाही." 

"ठीक आहे. तुमच्या अंतिम क्षणी  आम्ही कोण आहोत हे कळावे म्हणून सांगतो, आम्ही आहोत शिवाजी राजेंचे हेर "शिवनेत्र"..........

"तुमचे आमचे काम एकच असले तरी, दोघांच्या कामात फरक आहे. आम्ही अशा राजाची चाकरी करतो,  की जो संहारक नसून पालक व धर्मनिष्ठ आहे आणि तुम्ही...? माफ करा, आतां तुम्हाला बर्‍याच गोष्टी माहीत झाल्यामुळे आम्ही तुम्हाला जिवंत ठेवू शकत नाही." 

कैद्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून बहिर्जीचे दोन हेर त्यांना घेऊन गेले.

         

उरलेल्या चार चित्रांकडे पहात, नाईकांनी विचारले, 

"यांचेपर्यत पोहोचले का आमचे बाज?" 

"होय नाईक!" - - - - - - - - - - - - 

            

आज पहाटेच नाईक नाथबाबाचा वेष धारण करुन, राजेंना भेटायला गडावर गेले. खलबतखान्यात कांही औपचारिक चर्चा झाल्यावर, नाईक म्हणाले, 

"राजे, अफझलचे ते चारही हेर प्रतापगडावरच आहेत. प्रतापगडाचे उरलेले बांधकाम सुरु आहे, त्याचा आधार घेऊन, बांधकाम कारागिरांमधे एक हेर मिसळला आहे. शत्रूवर तप्त तेल ओतण्याकरिता किल्ल्यावर तेल साठा करण्याकरितां जे लोक बाजारातून तेल आणतात त्या लोकांत एक हेर; आणि बाकीचे दोन हेर सैन्यात -- असे चार हेर प्रतापगडावर आहेत. त्यांची ओळख पटली आहे. जसे दोन संपवले, तसेच हे चार हेर पण लवकरच संपवले जातील. आपण निश्चिंत असावे." 

"खरोखर नाईक, तुमच्या ह्या अद्भुत कार्यप्रणालीने आम्ही थक्क तर होतोच, पण आत्मविश्वास द्विगुणीत होतो. आणखी काय खबर? खानाचा मनसुबा? नवी योजना काय?" 

         

"राजे, खान वाईमधे लवकर पोहोचणार आहे, तो पावसाळा संपण्याची प्रतिक्षा करीत असला तरी, तो एवढा दीर्घ काळ शांत बसणार नाही. तो अशा कांही कुरापती करेल की, स्वराज्य रयतेला नाहक त्रास होईल. स्वराज्य-शासनव्यवस्था कोलमडून पाडण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. त्याने कांही सैन्य-तुकड्या पाठवून लूटमार व मराठा सरदारांना फितवण्याचे कार्य सुरु केलेच आहे. आदिलशाही  शिक्क्याची पत्रे सर्व मराठा वतनदारांना पाठवून, त्यांनी या युध्दात सक्रीय भाग घेतल्यास, त्यांना मोठे पद, मानमरातब देण्याचे अमिष दाखवून आपल्याकडे असलेल्या सरदारांनाही खीळ घालत आहे."       राजे म्हणाले ----

"पण जे सरदार स्वराज्याशी व आपल्याशी एकनिष्ठ आहेत ते त्याच्या अमिषाला भुलले नाहीत आणि.. भुलणारही नाहीत ही खात्री असल्यामुळेच हे "श्री" चे राज्य उभे करण्याचे बळ आम्हाला प्राप्त झाले आहे." 


"बरोबर आहे. एकदा का कोणतीही  व्यक्ती आपल्याकडे आली  की, ती आपलीच होते राजे !  याच भरवशावर अफझलखानाला आपण संपवणार."


इकडे अफझल वाट बघून थकला होता की ---- 

१५ दिवस उलटूनही त्याने नेमलेल्या  सहाही हेरांकडून कांहीच माहिती कां मिळत नाही ? त्यामुळे तो बराच अस्वस्थ झाला होता. त्यांच्या मिळणार्‍या माहितीवरच खानाचे सर्व बेत, पुढील रणनीती अवलंबून होती. परंतु त्याचे दुर्देव! नाईकांनी त्या सहाही हेरांना फासावर लटकवले होते.

        

दरम्यान औरंगजेबने स्वतःचा पिता, शहाजहानला कैद करुन, दारा-शुकाहाला संपवून, स्वतःचे सिंहासनारोहण करुन घेतले होते. सध्या त्याला दक्षिणेत शांतता हवी होती. त्या दृष्टीने त्याने आदिलशहाशी बोलणी करुन शांतता प्रस्थापित केली होती. परंतु अफझलखान शिवाजीराजेंचा परस्परर बीमोड  करेल ही आशा असल्यामुळे, आणि  सध्या त्याला हव्या असलेल्या शांततेच्या दृष्टीने त्याने राजेंना खलिता पाठवला. त्यात त्याने लिहिले, 

"आम्ही मुगल बादशहा -- औरंगजेब  आमची आपल्यावर मर्जी आहे हे सिध्द करण्यासाठी नजराणा पाठवीत आहोत." 


राजेंना सुध्दा तूर्तास त्याच्याकडून शांतता हवीच  होती. यावेळी मुगलांचा आदिलशाहीला पाठिंबा  नव्हता. या कालावधीत औरंगजेब स्वराज्याविरुध्द मोहीम काढणार नसल्यामुळे, आणि सर्वच सरदारांची त्यांच्या वतनाची चिंता मिटल्यामुळे ते निश्चिंत झाले. आता पूर्ण ताकदीनिशी अफझलखानाविरुध्द लढायला सज्ज झाले.


क्रमशः🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

              

भाग - ५५.


मसलत सुरू असताना  सरनौबत नेताजी पालकरांनी विचारले, 

"राजे, पुढचे नियोजन काय करावे? तो प्रतापराव  मोरे, आणि चंद्रराव खानाला जाऊन मिळाले. ते जावळीच्या वाटा व रानवाटांची माहिती खानाला पुरवतील. 


"आम्हालाही हेच अपेक्षित आहे."


राजेंच्या वक्तव्यावर दरबारातील सारे मुत्सद्दी आवाक झाले. चर्चा सुरु असतांनाच, एक घामाघूम झालेला - अशा त्या संदेशवाहकाने थेट दरबारात प्रवेश केला. प्रथम राजेंना मुजरा करुन उभा राहिला. त्याची अशी अवस्था बघून तानाजींनी पुढे होऊन त्याला प्यायला पाणी दिले. थोडा शांत झाल्यावर तो बोलू लागला, 


"महाराज, मी राजगडावरुन आलोय, महाराणी सईबाईंची तब्येत अत्यंत गंभीर असून, आपल्या भेटीची इच्छा व्यक्त केली आहे."

           

डोळे मिटून क्षणभर विचारमग्न  झालेल्या राजेंना पाहून, नेताजी पालकर म्हणाले, 

"राजे, आम्ही सर्वजण प्रतापगडावर आहोत. आपण तातडीने जाऊन महाराणींची भेट घ्यावी." 

"ठीक आहे." 

सोबत जिवाभावाचे कुणी असावेत म्हणून तानाजी मालुसरेना सोबत घेऊन राजे  वेगाने राजगडाकडे निघाले.

               

अधीरतेने राजेंनी सईबाईच्या कक्षात प्रवेश केला आणि त्यांची बिघडलेली हालत बघून जागीच थबकले. बाजूला निरागस बाळ शंभुराजे खेळत होते. मातोश्रीही होत्या. राजे दिसल्याबरोबर आतांपर्यंत धरुन ठेवलेले अश्रूं  त्यांच्या गालावरुन ओघळू लागले. शंभूबाळाने राजेंकडे झेप घेतली. त्यांना अलगद उचलून  छातीशी घट्ट धरुन येत असलेले अश्रू पापण्याआड दडवले. बाळराजेंना मातोश्रीकडे देऊन ते सईबाईजवळ जाऊन हळूच आवाज दिला. आवाज ऐकून, सईबाईंनी आपली उरली सुरली ताकद एकवटून राजेंना बघण्यासाठी डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण शक्य होत नसल्यामुळे, अश्रूंचा पूर वाहू लागला. राजेंनी आपल्या हातांनी पत्नीचे अश्रू पुसले. अचानक सईबाईचा श्वास वाढला. जवळच उभ्या असलेल्या वैद्यानी त्यांना चाटण चाटवले. त्यामुळे त्या थोड्या गुंगीत गेल्या. त्यांचेजवळ थांबण्याची राजेंची तीव्र इच्छा होती, पण स्वराज्य कर्तव्य ? शेवटी मनावर मोठा दगड ठेवून ते रायगडी पोहोचले आणि खानाच्या मसलतीत  मग्न झाले.

               

आणि... आणि काही दिवसातच ती भयानक बातमी गडावर येऊन थडकली. राजेंची सई त्यांना सोडून अनंतात विलीन झाली होती. अश्रूपूर्ण गदगदित स्वरात राजे पुटपुटले; 

"खूप घाई केलीस तू सई!आम्हाला एकटे सोडून गेलात महाराणी!ही वेळ योग्य नव्हती जाण्याची. स्वराज्यावर एवढे मोठे संकट असतांना आपण आम्हाला सोडून जायला नको होते. शंभूबाळाचा तरी विचार करायचा होता आपण ! बाळांनी जर आईची मागणी केली तर त्यांना आई कुठून आणून देणार? " 


राजेंच्या कक्षात जाण्याचा कोणाला धीर होत नव्हता. शेवटी मनाचा हिय्या करुन, नेताजी व तानाजी गेलेच. व निस्तब्धपणे उभे राहिले. राजेंनीच मग स्वतःला सावरले. गंभीरपणे म्हणाले, 

"आम्ही तुम्हा सर्वांना विश्वास देतो, आम्हाला संपवायला आलेल्या अफझलचा बळी घेऊ" असे म्हणत झटकन उठले. त्यांना शोक करायलाही वेळ नव्हता.

        

इकडे शहाजीराजेंना सईबाईच्या मृत्युबद्दलचा जिजाऊसाहेबांचा खलिता मिळाला. दुसरी खबर होती अफझलखानची. जिजाऊनी लिहिलं होतं --- "महाराज, आपल्या पुत्राच्या पराक्रमावर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण आम्ही आईही आहोत. याच खानामुळे आमचा एक पुत्र गमावला आणि आता दुसरा..."  


शहाजी राजे मनात म्हणाले, "नाही राणीसाहेब, आता ते नुसता शिवबा राहिले नाहीत तर, शिवाजी महाराज झाले आहेत. जे कार्य आम्ही करुं शकलो नाही ते त्यांनी पूर्णत्वास नेले. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफझलखानला अनेक जन्म घ्यावे लागतील. "आणि खानावर दडपण आणण्याची अफलातून खेळी त्यांनी केली. जिजाऊंना उत्तर म्हणून त्यांनी पण खलिता पाठवला की---" सगळं विचारात घेतलं तरी कर्तव्यदृष्टीने शिवबाच्या मदतीसाठी १७ हजार फौज आम्ही पाठवू. तशी वेळच आली तर हा शहाजी काय आहे हे दाखवून देऊ, पण ती वेळच येणार नाही. आमचा पुत्र त्या खानाला पुरुन उरेल." 


अशा आशयाचा खलिता लिहून स्वतःचे नांव,शिक्का उठवून पाठवून दिला. (इथे एक गोष्ट जरूर विचारात घ्यायची ती हीच की; त्या सहा हेरांना बहिर्जी-पथकाने केव्हाच संपवले होते. ही खबर नक्कीच शहाजीराजेंना माहीत असणार. तरीही असा खलिता त्यांनी पाठवलाय.)

    

आता बहिर्जी-पथक इकडे खानाची दिशाभूल कशी करीत होते ते बघा. सहा हेरांची चित्रे मुद्दामच खानाकडे पोचवून त्यास दिगभ्रमित करायच्या योजनेनुसार -----

      

त्या सहा हेरांचे चित्र रेखाटण्याचे काम झाल्यावर ; आणि त्या हेरांना संपवल्यावर  विश्वनाथराव  खानाच्या छावणीत परत गेले. एका झाडाखाली कांबळी टाकून निजले होते. इस्माईल त्यांच्या शेजारी येऊन बसला. चाहूल लागल्याने विश्वनाथांनी डोळे उघडले. इस्माईलने महत्वाची खबर आणली हे त्यांनी जाणले.


पण आजूबाजूला खानसैन्याचा वावर असल्यामुळे सांकेतिक भाषेत बोलू लागले. कांही वेळाने सैनिक दूर गेल्यावर हळू आवाजात सविस्तर माहिती इस्माईल सांगू लागला.


" खानाचे व कृष्णाजीचे बोलणे मी ऐकल्यानुसार त्याच्या हेरांनी, शहाजीराजेंनी जिजाऊसाहेबांना पाठवलेला खलिता पकडला. त्यावरुन त्याला माहीत झाले की, शहाजीराजे विजापूरकरांशी बंड पुकारुन अफझल विरुध्द १७ हजाराची फौज पाठविण्याच्या विचारांत आहेत." 

" पण शत्रूची दिशाभूल होण्यासाठी, खानाच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने खलिता खानाच्या हाती लागावा असा बेत तर नसेल शहाजीराजेंचा?" आणि हा तर्क अगदी अचूक होता. 

              

क्रमशः🙏🙏🙏🙏🙏

(वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )