!!! बहिर्जी नाईक !!! भाग ५६ ते ६०
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भाग - ५६.
शहाजीराजे गनिमी-काव्याचे जनक होते. त्यांनी आपल्या डावपेचांनी शत्रूचे दमन केले होते. विश्वनाथरावांनी इस्माईलखानला विचारले, "अफझलखानची काय खबर?"
"बहुतेक कांही दिवस शांत राहण्याच्या विचारात तो असावा." खानाच्या तंबूत गुप्त मसलत सुरू होती.
त्यामध्ये खानाचे विश्वसनीय सरदार मोसेखान व कांही प्रमुख सरदार उपस्थित होते आणि खानाच्या गोटात प्रवेशलेले बहिर्जींचे हेरच पहार्यावर होते. मोसेखान म्हणाला,
"पावसाळा संपला, दसराही संपला."
प्रतापराव मोरे व कृष्णाजीपंत गप्प होते. कारण योजना त्या दोघानीच आखण्याचे ठरले होते. खान पण प्रतापरावांशी मसलत करीतच होता. प्रतापराव मोरे जावळीतच लहानाचे मोठे झाले होते. त्यांनी खानाच्या स्पष्ट निदर्शनास आणून दिले की ---
"इतक्या प्रचंड सेनेसह प्रतापगडावर पोहोचणे शक्य नाही. तरीही आपण प्रयत्न करुन आक्रमण केले तर, इकडे शहाजीराजे जावळीवर चालून येतील. पुढून शिवाजी, मागून शहाजीराजे असे आपण कात्रीत सांपडू."
शहाजीराजेंचे मुत्सुद्दी कोडे खानाला किंवा त्याच्या सल्लागारांना सोडवताच आले नाही; त्याचाच हा परिणाम !
खानाचा विचार खानाने बोलून दाखवला ----
"आधी शिवाजींची भेट घेऊन इतक्या प्रेमाने समजावू की, आदिलशहाशी युध्दाचा विचारच तो सोडून देईल."
वास्तविक खानाला अशी योजना आखण्यास राजेंनीच त्यास त्याच्याही नकळत विवश केले होते. राजेंना केव्हाही नाईकांना सहज भेटता यावे, खानाची प्रत्येक खबर कळावी म्हणून, नाईक व त्यांचे साथीदारांना गडावरील भवानी-आईच्या देवळात सेवेकरी म्हणून नेमले असल्यामुळे नाईक व राजेंची सतत भेट होत होती.
"राजे, अफाट दूरदृष्टी आहे तुमची! युध्दासाठी तुम्ही प्रतापगड का निवडला ? हे त्यावेळी खानाला समजलेही नसेल. पण, प्रतापराव मोरेने जावळीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर त्याला मर्म नक्कीच कळले असणार. टप्प्याटप्प्याने फौज पाठवून तो आक्रमण करण्याच्या बेतात होताही पण, आबासाहेबांच्या खलित्यामुळे
खानाचा हाही डाव फसला. आतां परत त्याला नवा डाव आखावा लागला. राजे, लवकरच खान कृष्णाजी भास्करांकरवी आपणास आता खलिता पाठवेल."
"असे शत्रूकडील मंत्रणा, कावेबाजी हाणून पाडण्यासाठी प्रत्येक राजाकडे बहिर्जी नाईक नसतात." राजे कौतुकाने म्हणाले.
"नाईक, खानाच्या युध्दनीतीचा उलगडा झाला. त्याला एकट्याला भेटीसाठी लवकरच विवश करु. त्यासाठी आपले पंतोजीकाका बोकील कार्य यशस्वी करतीलच. तुम्हीही वातावरण निर्मिती करीत रहा; आणि जेव्हा तो भेटीला येईल तेव्हा त्याच्या पोषाखापासून ते त्याच्या जवळच्या हत्यारापर्यंतची अचूक माहिती आम्हाला मिळण्याची व्यवस्था करा."
एवढ्यात देवळाबाहेर एका सेवकाने येऊन कृष्णाजीपंत भेटीची अनुमती मागत असल्याचा निरोप दिला. देवीला साष्टांग प्रणिपात करुन राजे बाहेर आले. पंतोजी बोकीलाना काही सांगून इशारा केला; आणि पंतोजी लगेच निघाले -- कृष्णाजी भास्करांचे स्वागत करायला.
इकडे नाईक देवीपुढे नतमस्तक होऊन पुटपुटले, "आई भवानीमाते, तूं जाणतेस आता मंत्रयुध्दाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष युध्दापेक्षा हे युध्द किती गंभीर असते, नियोजनात किंचित जरी चूक झाली तर सरळ जीवावरच बेतेल. माते, तुझे आशीर्वाद राजेंच्या पाठी असूं दे. या महासंहारात स्वराज्य धन्यावर तुझी कृपादृष्टी असू दे!"
पंतोजी कृष्णाजीना भेटले. सर्व व्यवस्था चोख ठेवली त्यांची ! कृष्णाजी आणि पंतोजी --- दोघेही चतुरच; पण पंताजीकाका बोकील सगळ्यांनाच कसे पुरुन उरले ते पुढे येईलच. इथे पंतोजीकाका पण हेरगिरीत सामील झालेत. राजेंचा मनसुबा अचूक ओळखून त्यांनी कृष्णाजींची बडदास्त उत्तम ठेवली; पण त्यांची कोणाशीही भेट होऊ दिली नाही. (या उलट पंतोजी खानाच्या छावणीत गेले तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी कित्येकांची भेट घेऊन माहिती काढली होती.) लवकरच कृष्णाजी आणि राजेंची भेट घडवून आणली गेली.
कृष्णाजीपंतांनी आणलेला आदिलशाहीच्या पंजाचा शिक्का उमटवलेला खलिता राजे वाचू लागले. खानाने लिहिले होते,
"तुम्ही आमचे स्नेही शहाजीराजेंचे सुपुत्र! तुमच्याशी युध्द करण्याचे आदेश मिळाले, परंतु तुमचे पिता व आमचा भाईचारा असल्यामुळे, तुम्हाला एक मौका द्यावासा वाटला. आदिलशाहीचे किल्ले व गडकोट घेतल्यामुळे आदिलशहा अत्यंत खफा झाले आहेत. निजामशाही संपल्यावर, आदिलशहाने तहात मोगलांना दिलेला मुलुखही तुम्ही बळकावला. शिद्दीची राजापुरी मारुन त्याला जंजिर्यात ढकलले. चंद्रराव मोरेंची जावळी हिसकावली. त्यामुळे तुमचा कायमचा बंदोबस्त व्हावा ही सर्वांचीच मनिषा आहे, आणि तेवढे सामर्थ्य आमच्यात निश्चितच आहे. तुम्हाला उध्वस्त करुन, तुम्ही बळकावलेला प्रदेश घेण्यास, दख्खनचे वतनदार आम्हास सहाय्य करण्यास तत्पर आहेत. - - -
वडिलकीच्या नात्याने सल्ला देतो की, जावळीचा मुलुख व कांही किल्ले आमच्या स्वाधीन करुन हे महायुध्द टाळावे. सविस्तर बोलण्यासाठी वाईस येऊन आमची भेट घ्यावी."
खानाचा यापूर्वीचा इतिहास सर्वजण जाणून होतेच. विश्वासघात त्याच्या रोमारोमात भरला आहे. श्रीरंगपट्टणच्या राजाला सलोख्यासाठी भेटीस बोलावून त्याच्याशी दगा करुन वध केला होता. खानाचा सल्ला पटल्याचे चेहर्यावर भाव आणून कृष्णाजीपंताला राजे म्हणाले,
"आम्ही तर एका छोट्या रियासतीचे जहागीरदार ! खानसाहेब मोठे ! त्यांच्यापुढे आम्ही लहानच. आमचे गुन्हे पदरात घेऊन खानकाका आम्हाला भेटू इच्छितात -- हा किती मोठेपणा त्यांचा ?
खानाचा सल्ला आम्हास मान्य आहे. त्यांची भेट घेण्यास आम्ही तयार आहो."
आपला पहिला डाव (राजेना खानाची भेट घेण्यास राजी करण्याचा) यशस्वी झाल्याचा आनंद कृष्णाजीपंताला झाला. पण, राजेंच्या मुत्सद्यांना मात्र राजेंचा हा निर्णय पटला नव्हता. खानाचा धोकेबाज स्वभाव सर्वच जाणून होते.
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग ५७.
या भागात आपण राजे + त्यांचे मंत्रीमंडळ + हेरखाते --- यांच्यातील सुसंवाद बघणार आहोत. अशा संवादामुळेच घवघवीत विजय-प्राप्ति होत असते. आता बघा --- विजापूर दरबारात "राजेंना चढे घोडियानिशी धरून आणतो"; असा अफझलखानाने विडा उचलल्यापासूनच राजेंची रणनीती सुरू झालीय. अगदी बारीक-सारीक तपशील सुद्धा त्यांना पोचवण्याचे काम हेरखात्याने केले आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की; राजेंनी नियोजनपूर्वक स्वतःला सोयीस्कर असं रणक्षेत्र निवडलं आहे प्रतापगड ! आणि खानाला तिथं यायला भाग पडलं आहे. त्यानुसार खान वाईत आलाय. माणूस येनकेनप्रकारेण एकदा का कलला -- की त्यास कलंडायला वेळ लागत नाही. खानाचं तसंच झालंय. "चढे घोडियानिशी "सीवा"ला पकडणे " त्याच्यासाठी मुख्य ! आणि राजे तर प्रतापगड सोडायला तयार नाहीत. म्हणून खानाने कृष्णाजी भास्कर यांस खलिता देऊन प्रतापगडी पाठवलंय. ★★★ इथेच राजेंच्या रणनीतीतला पहिला टप्पा पूर्ण झालाय -- तोही अनपेक्षितपणे ! कारण खान वकील पाठवून बोलणी सुरू करील ही शक्यताच नव्हती; पण हे हेरखात्याच्या चतुरपणामुळे घडलंय खरं !
आता रणनीतीतला दुसरा टप्पा म्हणजे खानाला प्रतागडाच्या पायथ्याशी यायला लावून संपविणे ! या चरणात पंताजी गोपीनाथ बोकीलानी केलेली अचाट कामगिरी आणि हेरगिरी --- अशा सर्वच चातुर्यपूर्ण घटनांचे तपशील त्या त्या स्थानी आपण बघणारच आहोत. *** आणि पुढील टप्पा म्हणजे खानाने बळकावलेला मुलुख मोकळा करुन आदलशाहीचाच आणखी मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याशी जोडणे ! ★★★ आता याच्याशी संबंधित इतिहास यथास्थानी आपण बघणारच आहोत. आता आपले कथानक पुढे बघू.
कृष्णाजींबरोबर मुलाखत होत असताना राजेंनी आपण खानाला अनुकूल असल्याचे भासवले; त्यात ते इतके यशस्वी झाले की त्यांचे जवळचे लोक देखील अचंभित झाले. मोरोपंत तर थक्कच !
शेवटी न राहवून मोरोपंत पेशवे कांही बोलणार असे दिसताच, राजेंनी इशार्याने थांबवत,
राजे, कृष्णाजीला म्हणाले,
"पण आमची एक अडचण आहे."
"कोणती? "
"आम्ही खानांना भेटण्यास जावळीत येऊ शकत नाही. त्यांनीच स्वतः इथे यावे."
राजे पुढे म्हणाले ---
"खान आमच्यासाठी काकांच ! म्हणून तर आमचे गुन्हे माफ करून भेट घेऊ म्हणतात. पण अपराधी तोंड घेऊन त्यांच्यासमोर यायला भय वाटतं. म्हणून खानकाकांनीच इथे येऊन आमचं बोट धरून दिलासा देऊन बादशहांकडे आम्हास न्यावं ! त्यात त्यांचाही थोरपणा आहे.
राजे कांहीही अट न ठेवता भेटीस तयार झाले, पण प्रश्न होता फक्त जागेचा ! म्हणून कृष्णाजीपंत म्हणाले,
"बोलतो खानाशी ते बघू काय म्हणतात ते !"
राजेंची पहिली चाल यशस्वी होतांना दिसताच राजे म्हणाले,
"भेटीपूर्वी खानसाहेबांकडून अभयाची शपथ अपेक्षित आहे त्यासाठी आमचे वकील गोपीनाथपंत उद्या येतील. त्यांची खानाशी भेट घडवून आणावी. ते आमचे म्हणणे खानसाहेबांना सांगून, रीतसर शपथनामा लिहून घेतील." कृष्णाजीना यात कांही वावगे वाटले नाही. त्यांनी आनंदाने होकार दिला.
रावणाच्या दरबारात प्रभू रामांनी पाठवलेल्या अंगदासारखी शिष्टाई वकील गोपीनाथपंत बोकीलांना करायची होती.
कृष्णाजीपंतांची योग्य संभावना करून राजेंनी त्यांना परत पाठवले. आणि दुसरे दिवशी गोपीनाथपंत खानाच्या छावणीत पालखीतून गेले. बरोबर नजरबाजांचे पथक होतेच. कृष्णाजीनी त्यांची खानाशी भेट घालून दिली.
कृष्णाजीबरोबर पंत बोकील; खानासमोर गेल्यावर त्यांनी खानाला मुजरा केला. खानासाठी राजेंनी पाठवलेली मानाची वस्रे भेट देत, बोकील म्हणाले,
"मावळचे राजे शिवाजी भोसलेंनी आपल्याकरितां पाठवलेला नजराणा स्विकार करावा."
राजेंप्रती "मावळचे राजे" हा शब्द खानाला खटकला. खानाचा माथा ठणकला. आदिलशाहीला शिवाजी हे स्वतंत्र राजे आहेत हेच मुळी त्याला स्विकारार्ह नव्हते. राजे स्वतंत्र आहेत आणि खान आदिलशहाचा सरदार आहे हे खानाला सुचवायचे काम बोकीलांनी बरोबर पार पाडले. खानाने संयम ठेवून कृष्णाजीकडे दृष्टीक्षेप टाकल्यावर त्यांनीही शांत राहण्याचा इशारा केला.
राजेंनी दिलेला खलिता पंतांनी विनयपूर्वक खानाच्या हाती दिला. तो वाचू लागला...
राजेंनी खानाची भरमसाठ स्तुति करत लिहिले होते, "आपण आमच्यावर दया दाखवून ऋणी केले. आपल्यासारख्या महान पराक्रमी व्यक्तीने येऊन जावळीचे वैभव वाढवल्याने आम्ही निर्भय झालो. आपण मागितलेले किल्ले आणि जावळीचा प्रदेश आपल्या सुपुर्द करु."
खानाला अतिशय आनंद झाला व त्या भरात भेटीस येण्याचे मान्य केले.
"शिवाजीला माझ्या छावणीत येण्याची भीती वाटते तर मी स्वतः त्यांची भेट घेण्यास तयार आहे."
शिवाजीराजेंची भेट घेणे खानासाठी फार आवश्यक होते. नंतर तो आपले कार्य सहज साधणार होता. म्हणूनच राजेंच्या म्हणण्यानुसार, कोणताही 'दगा फटका' होणार नाही असे वचन पत्र खानाने वकील बोकीलांच्या स्वाधीन केले.
खानाच्या लेखी अशा आणाभाकांना कवडीची किंमत नव्हती. हे राजेही जाणून होते. पण राजे सावध आहेत हे खानाला कळू द्यायचे नव्हते. शिवाजीराजे अगदीच साधेसुधे असून, त्यांना कसलेही कपट करतां येत नाही, असेच खानाला दर्शवायचे होते. खानानेही त्याच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.
बहिर्जी पथकाच्या हेरांनी कृष्णाजी व खानाच्या बैठका व गुप्त मसलतीवर डोळ्यात तेल घालून लक्ष केंद्रित केले होते.
आंबेनळीतील घाटात बहिर्जी पथकाच्या गुप्तस्थळी नाईक पोहचले. आंबेनळी घाट ही अशी जागा होती की, तिथून खानाच्या छावणीत व प्रतागडावर अगदी कमी वेळात पोहोचू शकत होते.
खान आपली विशाल सेना वाईत ठेवून जावळीत आला. दोन्हीकडच्या वकीलांनी ४-५ वेळा चर्चा करुन, राजे आणि खानाच्या भेटीची वेळ व जागा ठरवली. राजेंनी अनेक युक्त्या, प्रयुक्त्या, डावपेच खेळून, प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला भेटण्यास शेवटी राजे केलेच. या दोघांच्या भेटीदरम्यान फक्त १०-१० अंगरक्षक राहणार होते.
राजेंनी त्यांची रणनीती नाईकांना स्पष्ट सांगून, बहिर्जी पथकावर कांही जबाबदार्या टाकल्या होत्या. नाईकांनी खानाच्या सैन्यात असलेल्या व रानात लपून असलेल्या आपल्या हेरांवर खानावर लक्ष ठेवण्यास सांगीतले होते.
नाईक आपल्या साथीदारां समक्ष उभे होते. त्यांचे समोर विश्वनाथ प्रभु, महादेव, महादूअण्णा, रायप्पा, नीळकंठ होते. विश्वासरावांना नाईक म्हणाले,
"आजवरची तुमची कामगिरी पाहून फार महत्वाची जबाबदारी आज तुमच्यावर सोपवीत आहे. खान राजेंच्या भेटीस निघतांना तो कोणती वस्रे घालतोय ? वस्रात कोणती शस्रे लपविली ? याची अचूक माहिती तो येण्याआधी गडावर राजेंकडे पोहोचावयाची आहे. तुमच्या या माहितीवर राजेंचे पुढील नियोजन अवलंबून आहे एवढे लक्षात असू द्या."
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग -- ५८.
गनिमी कावा, हेरगिरी, उत्कृष्ठ राजकारणपटू, मुत्सुद्दीपणा पुरेपूर भरलेल्या शहाजी राजांच्या तालमीत तयार झालेले गोपीनाथपंत बोकील ! शहाजी राजांप्रमाणेच या सर्वच बाबतीत अतुलनीय ! *** आपण खान वाईत आला आणि शिवाजीराजेना भेटायला तयार झाला इथपर्यंतचे कथानक बघितले. दरम्यानच्या काळांतल्या शिवरायांच्या, पंताजींच्या, आणि बहिर्जी पथकाने केलेल्या कामगिऱ्या आता बघू.
खान वाईत आला ही चूकच होती त्याची ! त्यानंतर कृष्णाजीना वकील म्हणून स्वतःहून पाठवणे ही तर अशी घोडचूक की -- "अस्वलाच्या आधी दरवेशाचीच आरोळी" -- अर्थात कृष्णाजीपंत देखील;
"गळ्यात माळ अन पोटांत काळ" मध्येच मोडणारे पाताळयंत्री व्यक्तिमत्व !
पण त्यांनाही पुरून उरणारे निघाले गोपीनाथ पंत ! *हेरगिरी आणि मुत्सुद्दीपणाचा अर्कच जणू !* सूर्यचंद्राना बघू शकणे हे तीक्ष्ण नजरेचे लक्षण नव्हे; तर शत्रूच्या डोळ्यांत त्याचीच चाल बघू शकतो तो खरा मुत्सुद्दी ! गडगडणारे ढग ऐकू शकणे हेही उत्तम ऐकण्याचं लक्षण नव्हे; तर शत्रूच्या बंद ओठाआडचे शब्द जो ऐकू शकतो तो खरा हेर ! शत्रूच्या गोटात आणि पोटांत शिरावं पंताजी काकांनीच ! बगळा पाण्यात असताना कसा ध्यानस्थ दिसतो ? पण योग्य वेळी चोचीत मासा पकडण्याची पूर्ण तयारी असते त्याची... गोपीनाथ पंत बोकील हे असेच अनेक गुणांचे मिश्रण असलेलं धोरणी व्यक्तिमत्व !
अफझलच्या गोटात पंत गेले; आणि खानानं त्यांनाच खच्ची करायला सुरुवात केली -- "पंतोजी; आप एक गुनाहगार के वकील हो । सीवा आदिलशाहीचा जहागिरदार असूनही त्यानं आदिलशाहीशी बगावत केली. किल्ले ताब्यात घेतले. मुलुख मारला. चंद्रराव मोरेला मारलं. जावळीवर कब्जा केला. ऐसा ये गुनाहगार है सीवा ! "यावर हजरजबाबी पंत बोलले--" जी हुजूर ! तुम्ही कैद केलेल्या शहाजीराजाना; मोगलांकडून दबाब आणून सोडवलं हा शिवाजी राजांचा आणखी एक गुन्हा !आदिलशाहीच्या एका सरदाराची हत्या करणं हा आणखी एक गुन्हा ! म्हणून तर तुमचा खलिता मिळताच राजे भयभीत झालेत. अशा या सगळ्या गुन्ह्यांची माफी मागायला यायलाही धीर पुरत नाही त्यांना ! म्हणून आपणच जावळीला आलात तर थोर गोष्ट होईल."
गोपीनाथ पंतांच्या चातुर्याची ही फक्त एक झलक दिली इथे. सगळंच देणं कठीण आहे.
शिवाजी राजाना संपविण्याचा खानाचा हेतू एकदा स्पष्ट झाल्यावर; राजांच्या पुढच्या सर्वच चाली; अफझलला संपविण्याच्याच असणं साहजिकच होतं. एकदा का खान जावळीत आला की जिवंत माघारा जाऊच नये हे नियोजनात ठरलेलंच होतं.
आता खानाच्या अफाट सैन्याचा फडशा पाडण्याचं पण नियोजन केलं गेलं. भेटीचा दिवस ठरल्यावर; जेधे-बांदल आणि मोरोपंत पारगावच्या घाटात फौजा घेऊन दबा धरून बसले. वाई, सुपे, सासवड, शिरवळ येथे तानाजी आणि नेताजींचे सैन्य ! जावळीच्या खोऱ्याबाहेर वाईकडचा भाग अडवून एक दोन तुकड्या तयार ठेवल्या गेल्या की जेणे करून खानाला वाईकडून कुमकच मिळू नये.
हेरांनी दिलेल्या खबरांनुसार खानाकडचे ७५ हत्ती, १२०० उंट, हत्यारे, बंदुका, शेकडो तोफा, उंची कापड, जड-जवाहीर, गाडे, पालख्या, मेणे, अंबाऱ्या, हौदे, संपत्ती --- सगळंच ताब्यात घ्यायच्या दृष्टीने नियोजन केले गेले. भेटीच्या दिवशी खानाच्या छावणीला सुग्रास भोजन दिले गेले. त्यात जायफळ भरपूर घालून ! कारण जायफळाने सुस्ती येते. *** भेटीच्या दिवशी खान आपल्या बरोबर १५०० सैनिक घेऊन निघाला; तेव्हा "राजे दहशत खाऊन माघारी जातील" असे सांगून पंताजींनी हे सैन्य भेटीच्या माचीखालीच ठेवायला लावले आणि फक्त पालखीचे भोई आणि १० अंगरक्षक एवढेच लोक घेऊन खान भेटीस येईल अशी चोख व्यवस्था पंतोजीनी मोठ्या हुशारीने केली. हे १५०० स्वार कापून काढायलाही राजांचं सैन्य दबा धरून बसलंच होतं. वर आलेले खानाचे १० अंगरक्षक आणि सय्यद बंडाला संपवायचं नियोजन देखील चोख होतं. आणि अफझलला संपविणार होते खुद्द शिवाजीराजे !(या ठिकाणी वाचकांनी या परिसराचा नकाशा समोर ठेवून बघावं. म्हणजे अचूक नियोजनाची कल्पना येईल.) आता पुढचं कथानक बघू....
ठरल्याप्रमाणे खान आपले सैन्य सोबत आणणार नाही, हे तर ठरलंच; परंतु जावळीच्या जंगलात आपलं सैन्य कुठे कुठे दबा धरून बसलंय, ही माहिती आपल्या सैनिकाना राजानी दिली. राजेसुध्दा आपले सैन्य घाटात वेगवेगळ्या ठिकाणी पेरुन ठेवणार आहे. दोघेही एकमेकांना संपवण्याच्या इराद्यानेच भेटणार आहेत. राजेंनी खानाला संपवल्याबरोबर किल्ल्यावरुन इशारतीची तोफ डागली जाईल, आणि त्याच वेळी आपले सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडून सहज खात्मा करुं शकतील. अशी योजना सर्व मावळ्यांना समजून दिली गेली. राजांचे पुढचे आदेश असे होते - - - -
"त्यानंतर नेताजींच्या नेतृत्वाखालील सैनिक खानाच्या छावणीवर आक्रमण करतील. कदाचित ही लढाई जास्त वेळ सुरु राहू शकेल. तेव्हा वाईच्या छावणीतून अधिक कुमक येणार नाही ही काळजीसुध्दा घ्यावी लागेल. महादूआण्णा, महादेवराव, रायप्पा तुम्ही आणखी कांही साथीदारांसह वाईच्या वाटेवर थांबून, खानाचे हेर वाईत न पोहोचू देता वाटेतच त्यांचा खात्मा करा."
राजेंनी रणनीती तर अचूक आखली; पण विश्वासरावांच्या कामगिरीवरच राजेंचे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होते.
खानाच्या छावणीत खानाचा अत्यंत विश्वासू सल्लागार रशीद बरोबर झालेली गुप्त मसलत -- राजेंना कसे संपवणार हे कळल्याबरोबर राजेंना तात्काळ कळवण्यात आली.
आज सूर्योदयापूर्वीच उठून खानाने नमाज उरकला. आपल्या सर्व सरदारांना योग्य व आवश्यक सूचना दिल्या. दर्पणात बघत पुटपुटला,
"बेसबरीसे इसी दिन का इंतजार था। शिवाजी आज तेरा आखरी दिन! "
नंतर सेवकाने त्याला कपडे घालण्यास मदत केली. तो खानाला सजवत होता, तेवढ्याच बारकाईने खानावर लक्ष पण ठेवून होता. कारण तोही बहिर्जी पथकातीलच हेर होता. खानाने अंगरख्याखाली चिलखत घातले नाही; ही गोष्ट महत्वाची होती. खानाला आपल्या बाहुबलावर व पूर्वीच्या अनुभवावर जास्त भरोसा होता. खान तयार होऊन पालखीत बसला आणि पहिली संधी मिळताच त्या सेवकाने -- जो हेर होता, त्याने खानाच्या पेहराव्याची व खंजीर लपवल्याची खबर विश्वासरावांना दिली.
खानाची पालखी निघताच इस्माईलच्या सहाय्याने विश्वासरावांनी छावणी सोडली आणि वेगाने गुप्त वाटेने प्रतापगडाकडे रवाना झाले. तसेच प्रतापराव मोरेने सुचवलेली जागा, तिची माहिती देण्यास बहिर्जीचा हेर सैन्यात असल्यामुळे तोही राजेंच्या सैन्याला माहिती देण्यास निघाला.
खानाच्या पेहराव्याची माहिती जशीच्या तशी राजेंना कळविण्यात आली. तसेच जंगलात लपलेल्या खानाच्या सैन्याची नेमकी ठिकाणे तानाजी मालुसरे व कान्होजी जेधेंना हेरांनी कळवली.
आखलेल्या रणनीतीनुसार सगळे जुळून आल्याची खात्री करुन राजे आपल्या कक्षात आले. तेवढ्यात दोन सेवक एका तबकात चिलखत, जिरेटोप, बिचवा आणि वाघनखे घेऊन आले, सोबत भंडारा होता. राजे पूर्ण तयार होऊन सदरेवर आले. राजपुरोहिताने राजेंचे औक्षण केले. सगळ्यांनी त्यांना मुजरा घातला. राजे बोलू लागले
"माझ्या वाघांनो, ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण समीप येऊन ठेपला. चला अफझलखानाला संपवून अर्धी आदिलशाही काबिज करु. आज उतरलेला गड येत्या दहा दिवसांत आदिलशाहीचा काही प्रदेश हस्तगत करुनच गडावर परतू या. बोला हरहर महादेव! जय भवानी !!
या उद्घोषाने सदर गुंजली.
"महाराज, शामियान्यात खान पोहोचला." बोकीलकाकानी सांगितले.
"काका, खानाच्या आदरसत्कारात काहीही कमतरता नको."
"नाही राजे, शामियान्यातील भव्यता, इतके सस्नेह आदरातिथ्य बघून तो प्रचंड खूष झालाय; आणि त्याच्या मनातील उरलीसुरली शंकाही संपली असावी..."
सदरेहून राजे, आई भवानीच्या मंदिरात आले. त्यांचे बरोबर अत्यंत दक्ष, पिळदार शरीरयष्टीचे, शक्तीशाली वीर अंगरक्षक होते. त्यांना बाहेर थांबवून, राजेंनी गाभार्यात प्रवेश केला. आंत सेवेकर्याच्या वेषात असलेल्या बहिर्जी नाईकांनी देवीजवळच्या कुंकवाचा टिळा राजेंच्या कपाळी लावला. मासाहेब राजगडी असल्यामुळे राजेंनी मनोमन चरणस्पर्श करत म्हणाले, दादासाहेबांची हत्या करणार्या, पिताश्रींची धिंड काढणार्या दुष्टाला संपवून आपला प्रतिशोध पूर्ण होईल असा आशिर्वाद द्या. आई भवानीसमोर नतमस्तक होऊन म्हणाले,
"माते, तुझा वरदहस्त मस्तकी असू दे. या स्वराज्याच्या मोठ्या लढाईत यश दे."
डोळे उघडून त्यांनी नाईकांना विचारले,
"नाईक, नियोजनानुसार 'बाज' पेरलेत ना?"
"होय राजे, खानाच्या मृत्युची बातमी बाहेर फुटण्याच्या अवधीत, खानाची वाईतील छावणी गुरुदेव कान्होजी जेधे उध्वस्त करणार आणि इथली जावळीची छावणी आपले जांबाज मावळे उध्वस्त करतील. पण राजे नुकतीच आग्र्याहून बातमी आली...."
क्रमशः🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ५९.
"राजे, नुकत्याच आग्र्याहून आलेल्या बातमी नुसार, आजच्या आपल्या खान भेटीत आपला अंत होईल ही खात्री असल्यामुळे, आपण त्यांचा जिंकलेला मुलुख ताब्यात घेण्यासाठी, औरंगजेबाने शाहिस्तेखानास सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. आपण त्याचा गैरसमज दूर करुन दाखवून देऊ की, त्याने मराठ्यांना कमकुवत समजण्याची केवढी मोठी चूक केली आहे."
"नाईक, आपला विजय नक्की होईल. पण शेवटी युध्द आहे. ऐनवेळी कांही विपरित घडले, आम्ही संपलो तरी, स्वराज्याची घोडदौड थांबता कामा नये. या सह्याद्रीचे वादळ शांत व्हायला नको. आम्ही असलो नसलो तरी, अफझलखानास जिवंत जाऊ देऊ नका. यदाकदाचित आम्ही स्वराज्याच्या कामी आलो तरी, विजय मराठ्यांचाच व्हायला हवा." राजे पुढे म्हणाले - - - -
"आणखी एक लक्षात ठेवा, आमचे काही बरेवाईट झाले तरी, बाळराजे संभाजी मोठे होईपर्यंत प्रशासन व गनिमावर असाच गुप्त ताबा ठेवा. स्वराज्याचा हा वटवृक्ष बहरत ठेवा. शक्य होईल तेवढी भूमी, तुर्की, मुगल, इराणी, डच, आदिलशही आणि टोपीकरांपासून मुक्त करा. रायरेश्वरी घेतलेली शपथ विसरु नका."
गहिवरल्या आवाजात नाईक म्हणाले,
"राजे, असं काहीही होणार नाही. परकीयांपासून मुक्त केलेल्या भूमीवर आपण स्वतः भगवा फडकवणार आहात."
नाईकांच्या खांद्यावर हात ठेवून, राजे म्हणाले,
"तुमच्या ह्याच अशा सकारात्मक आणि स्फूर्तीदायी बोलण्याने योध्याच्या अंगी वीरश्री संचारते तुम्ही तुमच्या तोडीचे अनेक बहिर्जी निर्माण केलेत, ह्याच बहिर्जींमुळे धूर्त खानाला आज आम्ही बोटावर नाचवत आहोत. स्वराज्यासाठीचे तुमचे योगदान अतुलनीय आहे. तुमचे एवढे मोठे महान कार्य असून देखील उघडपणे तुमचा सत्कार, श्रेय, सन्मान आम्हास करतां येत नाही."
"राजे, तुमच्या ह्रदयात आमच्यासाठी जागा राखून आहात आपण यापेक्षा दुसरा कोणता सन्मान हवा?"
खानाला इथपर्यंत आणण्यासाठी बहिर्जी पथकाने किती अमाप कष्ट घेतले याची राजेंना जाणीव असल्यामुळेच प्रत्येक मावळा हेर स्वतःच्या प्राणाची पर्वा न करतां स्वराज्यासाठी झोकून देऊन प्रसंगी बलिदानही देत असत ही गोष्ट येथे लक्षात येते. आदर्श राजाचंच हे रूप होतं.
शामियान्यात खान बसला होता. राजेंना तो बंडखोर सरदाराचा पुत्र समजत असल्यामुळे; मुद्दामच राजेंनी त्याला भेटण्यास विलंब लावत ताटकळत ठेवले. खानाचा संयम ढांसळविण्याची ही उत्तम क्लुप्ति होती राजांची ! संयम ढांसळला की कोणाचीही निर्णय क्षमता खूप कमी होते -- हे राजे जाणून होते.
कंटाळून खानाने कृष्णाजीपंतांना विचारले,
"माझी तौहीन करण्यासाठी शिवाजी मुद्दाम दिरंगाई करीत आहे कां ? सकाळपासून सज्ज होऊन छावणीतून गडाजवळ आलो तरी, शिवाजीला पायथ्याशी यायला येवढा उशीर का?"
येवढ्यात राजे दारात येऊन उभे राहिले. राजेंना बघून, खोटे हास्य मुखावर आणत खान म्हणाला,
"याऽ शिवाजीराजे भोसले ! यावे !!
राजेंना खान प्रथमच पहात होता. ज्यांना संपविण्यासाठी एवढा आटापिटा केला, वाट बघितली ते त्याच्यासमोर उभे होते.
"तुम तो दूसरे शहाजी लगते हो। असे वाटते माझा मित्र शहाजीच भेटत आहे. दिल खुश हुआ।"
"आम्हालाही आपल्याला भेटून आनंद होत आहे. खानसाहेब, तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र ! या नात्याने तुम्ही आमचे काका!"
"बहोत खूब ! शुक्र है तुम हमसे मिलने के लिये राजी हुए; वरना हमारे भतीजेपर खामखां आक्रमण करना पडता हमे।"
"खानसाहेब आम्हीच काय, पण हिंदुस्थानमधील कोणीही आपल्याशी लढण्यास समर्थ नाही हे आम्ही जाणून आहोत. आपल्या अटी आम्हाला मान्य आहेत. आमच्या जहागिरी व्यतिरिक्त, आदिलशाहीचा घेतलेला मुलूख आपल्या स्वाधीन करण्यास आम्ही पूर्णपणे राजी आहोत."
राजेंना आपण सावध असल्याचा थांगपत्ता खानाला लागू द्यायचा नव्हता, म्हणून ते त्याच्या स्तुतीचे पूल बांधत होते.
"वाऽऽऽ शिवाजी वाऽऽ! काफी समझदार हो । पहली बार मिल रहे है हम । गले नही मिलोगे?" हात पसरत खान म्हणाला.
"कां नाही" असे म्हणत राजेंनी पाऊल पुढे टाकले, पण खानाच्या कमरेला तलवार बघून राजे जागीच थबकले.
"ओऽऽ समझ गया म्हणत त्याने म्यानासकट तलवार कृष्णाजीपंताच्या स्वाधीन केली. राजेंनीही आपली तलवार; आपले वकील पंताजी बोकीलांच्या स्वाधीन करुन त्यांना बाहेर थांबण्याचा इशारा केला. बोकील बाहेर गेल्यामुळे, खानालाही आपले वकील कृष्णाजीपंताना बाहेर पाठवावे लागले.
राजे खानाच्या दिशेने निघाले व खानाने राजाना मिठी मारली. खानाच्या अक्राळविक्राळ देहापुढे राजे अगदीच खुजे वाटत होते. राजेंचे मस्तक त्याच्या छातीपर्यंत आले. आणि खानाच्या मुखावरील भाव एकदम बदलले. राजेंची मान त्याने काखेत घट्ट दाबली. राजेंच्या मानेच्या नसांवर दाब पडल्याने त्यांचा चेहरा लालबुंद झाला. खानाने पटकन लपवलेला खंजीर बाहेर काढून राजेंच्या पाठीवर वार केला.
त्यांच्या पाठीपासून मानेपर्यत खंजीर घुसवून ओढला. राजेंचा अंगरखा फाटला.
क्रमशः🙏🙏🙏🙏
!!! बहिर्जी नाईक !!!
भाग - ६०.
राजेंचा अंगरखा फाटला पण खंजीर आंत घुसला नाही, त्यामुळे चिडून त्याने त्वेषाने वार केले, पण राजेंनी आतून चिलखत घातले असल्यामुळे त्यांना काहीच झाले नाही. त्यामुळे चिडून जाऊन खान त्यांची मान आणखी आवळू लागला. राजेंनी कशीबशी ताकद एकवटून हातात लपवलेली वाघनखे चपळतेने त्याच्या पोटात घुसवली. तेव्हा झालेल्या वेदनेने राजेंच्या मानेवरची खानाची पकड ढिली झाली. त्या संधीचा फायदा घेऊन राजेंनी स्वतःची सुटका करुन घेतली आणि डाव्या हाताच्या अस्तनीत लपविलेला बिचवा काढून, खानाच्या पोटात घुसवून आतडे बाहेर काढले. कोथळाच बाहेर काढल्यामुळे पोटातून रक्ताचा पाट वाहू लागला. खान कसाबसा ओरडला दगाऽऽ आणि तोल सावरीत बाहेर येऊ लागला. त्याने तलवारीने राजांच्या मस्तकावर वार केला. पण जिरेटोप असल्यामुळे राजे सुरक्षित राहिले. फक्त निसटती जखम मात्र झाली. खान होलपडत पालखीकडे जाऊ लागला. पण भोई लोकांच्या पायांवर तलवारीचे घाव संभाजी कावजीने केले आणि पालखीत शिरलेल्या खानाच्या छातीत तलवार खुपसली. नन्तर मस्तक कापले.....
खानाचा आवाज ऐकून बाहेर असलेले कृष्णाजीपंत व बोकीलपंतांनी धाव घेतली. झालेला प्रकार बघून कृष्णाजींनी तलवार काढून राजेंवर हल्ला केला तो हल्ला राजेंनी चुकवला व पंताजी बोकीलांनी दिलेल्या तलवारीने कृष्णाजीवर वार केला. शामियान्यातील गडबड ऐकून खानाचे रक्षक आंत घुसणार तोच राजेंच्या रक्षकांनी त्यांना अडवले. लढाईच सुरु झाली. राजेंनी केलेल्या प्रहाराने कृष्णाजी खाली कोसळला. राजे त्यांना म्हणाले
"तुम्ही ब्राह्मण असून ब्राह्मणजातीवर कलंक आहात. खरे तर तुम्हाला ठार करायलाच हवे पण ब्रह्महत्या करायची आमची इच्छा नाही. जा.. जीवदान दिले तुम्हाला. पुन्हा जर स्वराज्याविरुध्द षडयंत्र रचले तर मस्तक धडावर राहणार नाही."
असे म्हणून राजे वळले. राजेंची पाठ वळल्याचा फायदा घेऊन, कृष्णाजीपंत तलवार घेऊन राजेंवर चालून गेलेले पाहताच, बोकीलांनी वेळीच सावध केल्यामुळे राजे गरकन वळत त्याच्या हातावर वार केला. तलवारीसकट हात जमिनीवर पडला.
"तुमचा हात गेला तरी, तुमचे षडयंत्रकारी मस्तक साबूत असल्यामुळे स्वराज्याला पुढे त्रास नको." असे म्हणत राजेंनी कृष्णाजीचे मस्तक धडावेगळे केले. तेवढ्यात राजेंच्या पाठीमागून सय्यद-बंडाने दांडपट्टा हवेत फिरवला व राजेंच्या मानेवर वार करणार एवढ्यात जिवा महालाने दांडपट्टयाच्या वाराने त्याचा हात पट्ट्यासकट कापला. आणखी एका वारात त्याची तडफड कायमची बंद केली. जिवाजीची पाठ थोपटून, राजे म्हणाले,
"चला लवकर गडावर, तोफेचा इशारा द्यायला हवा."
जिवा महालेच्या सुरक्षेत राजे गडावर पोहोचले. राजेंच्या अंगरक्षकांनी तोवर खानाच्या अंगरक्षकांचा सफाया केला होता. खानाचे सेवक त्याचे पार्थिव पालखीत घालून नेत असतांना, संभाजी कावजीने खानाचे मस्तक कापून नन्तर राजगडी मातोश्रींना पाहण्यासाठी पाठवले.
तोफेचा इशारा होताच, पूर्वनियोजनानुसार जावळीत लपलेल्या मावळ्यांनी; खानाच्या सेनेवर आक्रमण केले.
महाबलाढ्य खानाच्या वधाने मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. राजेनीही तेवढ्यावरच समाधान न मानता चढाईचे धोरण आखले.
वाईला खानाच्या छावणीत असलेल्या विश्वासराव प्रभूंच्या नेतृत्वाखाली बहिर्जी पथकाच्या हेरांनी छावणी उध्वस्त केली. किंमती ऐवज जडजवाहीर; इतर सर्व किमती सामान ताब्यात घेऊन, शस्रागाराला आग लावली. खानाच्या सैन्याला हे काय घडतय लक्षात येण्याआधीच नेताजी पालकर व कान्होजी जेधे वाईत दाखल झाले व विजापुरी सैन्यांची चांगलीच कत्तल केली. उरलेले सैन्य जीव वाचवून पळू लागलेले पाहताच, ससैन्य नेताजी पालकर त्यांचा पाठलाग करत वाटेत येणारे गडकिल्ले ताब्यात घेत होते.
शिवाजीराजेही वाईत आले आणि आक्रमक पवित्रा घेण्याचा आदेश दिला. खानाच्या जाण्याने धास्तावलेल्या आदिलशहा बादशहास सावरण्यास अवधी न देता, तुफानी घोडदौड करत, राजेंनी खटाव, मायणी, रामपूर, कलेढोण, वाळवे, हलजयन्तिका, आष्टे, वडगाव, बेलापूर, सावे, उरण, कोळे आणि कोल्हापूर ही गावे ताब्यात घेतली. खानाने बळकावलेला सर्व मुलुख एका दिवसात मोकळा केला गेला.
तिकडे नेताजींच्या नेतृत्वाखाली मराठी फौजेने कृष्णेच्या काठाने पुढे पुढे जात पराक्रम गाजवला. त्यांनी सैनिकांना तुकड्यांमधे विभागून मराठी सैन्यांनी बोरगाव, कवठे, कुंडल, मालगाव, घोगाव, सत्तीकीर, आड ही ठीकाणे काबिज केली. कोल्हापूर ताब्यात आल्याबरोबर दोन दिवसांच्या आत राजेंनी पन्हाळा घेतला.
याशिवाय देखील नेताजींनी मिरज, गोगाक, दोदवाड, मुरवाड, धारवाड, गढी, क्षुद्रवृंदपूर, सांगव, माथिल, हुकेरी, कडगाव, हळदी, घुणिका, किणी, अरग, तेलंगसर, अंबुप, कपळापूर, अथणी, तिकोटे याशिवाय सातारा, चंदनगड, वंदनगड, विशाळगड, पालगगड, रांगणा, प्रसिध्दगड, भिवगड, पारगड, वसंतगड हे किल्ले मराठ्यांनी स्वराज्यास जोडले. राजेंची इतकी घोडदौड बघून आदिलशहाचे धाबे चांगलेच दणाणले.
क्रमशः🙏🙏🙏🙏🙏
(वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )
