Ad Code

Responsive Advertisement

बहिर्जी नाईक | Bahirji Naik Part 61 to 65 | बहिर्जी नाईक भाग ६१ ते ६५

 !!!  बहिर्जी नाईक  !!! भाग ६१ ते ६४


मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

भाग १ ते ५

भाग ६ ते १०

भाग ११ ते १५

भाग १६ ते २०

भाग २१ ते २५

भाग २६ ते ३०

भाग ३१ ते ३५

भाग ३६ ते ४०

भाग ४१ ते ४५

भाग ४६ ते ५०

भाग ५१ ते ५५

भाग ५६ ते ६०

भाग - ६१.

            

शिवाजीराजेची इतकी आक्रमक घोाडदौड व आदिलशाहीचे किल्ले व मुलूक घेण्याचा सपाटा बघून आदिलशहाने राजेंचे परिपात्य करण्यासाठी रुस्तमेजमान सोबत अफझलखानाचा पुत्र फाझलखान, मलिक इतबार, सादतखान, मुल्ला या सरदारांना पाठवले. आधीच थकलेल्या सैन्यानिशी रुस्तमेजमानने राजेंवर आक्रमण केले परंतु त्याचा पराभव झाला. त्याचे सरदार व सैन्य जीव वाचवून विजापूरला पळून गेले. हाती सांपडलेल्या रुस्तमेजमानला राजेंनी मुद्दाम जीवदान दिले. कारण तो शहाजीराजेंचा परममित्र रणदुल्लाखानचा पुत्र होता. या ५-६ महिन्यात स्वराज्यसीमा बर्‍याच विस्तारल्या होत्या.

           

विजापूरच्या दरबारात बडी बेगम चांगलीच तापली होती. तिच्यासमोर पळून आलेले सरदार खाली मान घालून उभे होते. त्यांची कानउघाडणी चालू असतांनाच, संदेशवाहकाने कर्नुलचा सरदार मुहम्मदनूर सिद्दी जौहरचे पत्र तिच्या हाती दिले. हा बंडखोर सरदार असल्यामुळे आदिलशाहीतून त्याला बेदखल करण्यात आले होते.

           

त्याने लिहिले होते, "आजपर्यंतचे सर्व अपराध माफ करुन, शिवाजीराजेची मोहीम माझेवर सोपवावी. वचन देतो, शत्रूला संपवूनच आपल्यासमोर हजर होईन." 


बेगमच्या मागे उभी असलेल्या मार्जिनाने ते पत्र वाचले. स्वराज्यावर सिद्दी जौहरला पाठवणार हे तिने ताडले. त्याच  दिवशी ही महत्वाची खबर मार्जिनाने जिवाजी कुडाळकर या हेरास पोहोचवली. खबर नाईकांना कळल्यावर, मिरजेत असलेल्या राजेंना भेटायला नाईक गेले. राजेंचे अभियान अतिशय वेगवान चालू होते.

          

राजे आपल्या छावणीत बसले असतांना नाईकांनी प्रवेश करुन राजेंना मुजरा केला. आसनस्थ झाल्यावर नाईक म्हणाले, 

"सिद्दी जौहर विशाल फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत आहे. सद्य परिस्थितीत आपले सैन्य अनेक मोहिमांत विखुरले आहे. नव्याने जिंकलेल्या प्रदेशात शासनव्यवस्थेची घडी नीट बसवण्यात आपले सरदार गुंतलेले आहेत. एवढ्या कमी वेळात त्यांना बोलावणे कठीण आहे. तुम्ही मिरजेत थांबणे धोकादायक आहे." 

           

"ठीक आहे नाईक, आम्ही ससैन्य पन्हाळगडावर जातो. गड मजबूत असून तिथे धान्यसाठा, दारुगोळा मुबलक आहे. चढाई करण्यास शत्रूला अवघड किल्ला आहे. सिद्दी जवळपास आल्यास नेताजी बाहेरुन आक्रमण करतील आणि आमच्या सोबतची बांदल-सेना गडावरुन आक्रमण करतील. शिवाय पावसाळा लवकर येत असल्यामुळे ही मोहीम त्याला लवकरच संपवावी लागेल." 

राजेंची ही कल्पना नाईकांना पटली.

     

"आम्ही जर राजगडी गेलो तर तो अफाट सैन्यासह स्वराज्यात शिरकाव करेल. रयतेला त्रास देईल. मंदिरे उध्वस्त करेल. रयतेला उपद्रव नको म्हणून सीमेवर असलेल्या पन्हाळगडावरुनच त्याच्याशी मुकाबला करु. नाईक, तुम्ही सिद्दीची बारीक सारीक माहिती घेऊन पन्हाळगडी भेटा."

           

नाईकांनी पुन्हा एकदा स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाला परतवण्याचा निश्चय केला.

             

दौलताबादच्या नदीतून बहिर्जीचा हेर बाजी शिवराळकर उर्फ हैदर बाहेर आला. त्याची जुनी सवय होती, मुसलमान हैदर बनून कामाला लागण्यापूर्वी आधी सूर्याला अर्ध्य द्यायचे मगच कामाला सुरुवात करायची. तो गेली अनेक वर्षे मुगल-सल्तनतच्या सत्तांतरापासून हैदर बनून आग्र्यात होता. औरंगजेबाने मुरादबक्षची हत्या केल्यावर, त्याला शाईस्तेखानाच्या  सोबत पाठवण्यात आले असल्यामुळे सध्या तो दौलताबादला वास्तव्यास होता.

             

हैदर पाण्यातून बाहेर आल्यावर; झाडावर लपून पहारा देत बसलेले त्याचे अंगरक्षक राया व खंडेराव जवळ येऊन म्हणाले 

"हैदरमियाॅं, कांहीतरी मोठी गडबड दिसते. एवढ्या सकाळी मानुजानने चारही दिशेने सहा संदेशवाहक पाठवले. कालपर्यंत तर कांही घडले नाही, मग रात्रीतूनच असे काय घडले? खूप रात्री उशीरा औरंगजेबचा खलिता घेऊन जासूद आला होता. नक्कीच मोठं कारण असावं. पत्ता लावावा लागेल." 

             

विजापुरातील जिवाजीच्या दुकानी नाईकांनी प्रवेश केला. जिवाजीने दिलेल्या खबरीने नाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. जिवाजी सांगत होता,

"नाईक, बडी बेगमने अत्यंत गुप्तपणे औरंगजेबची मदत मागण्याचा खलिता पाठवला आहे." 

हे ऐकून क्रोधित झालेले नाईक म्हणाले,

"जिवाजी, दरबारातील आपलं हेरांचं इतकं मजबूत जाळं आहे,आदिलशहा शिंकला तरी आपल्याला कळते. असं असतांना आज १५ दिवसांनंतर आपल्या हेरांकडून आपल्याला माहिती मिळते. नाही जिवाजीऽ, आपल्या एवढ्या मोठ्या व्यवस्थापनेचं हे अपयश आहे. बडी बेगमने औरंगजेबाला पाठवलेल्या खलित्याची आपल्याला खबर नाही ?" 


स्वराज्यावरच्या एवढ्या मोठ्या संकटाचा नुसत्या विचारानेच नाईक प्रथमच हतबल वाटले.

         

क्रमशः🙏🙏🙏🙏

!!! बहिर्जी नाईक  !!!

                

भाग - ६२.

             

जिवाजी म्हणाले,

"नाईक, बडी बेगमने महाभयंकर कट रचला आहे. यावेळी सिद्दी जौहर युध्दासाठी जात नसून राजेंना वेढ्यात अडकवण्यासाठी जात आहे. त्याला वैयक्तिक कटाने राजेंना संपवायचे आहे. सिद्दी जौहर राजेंना पन्हाळगडी वेढ्यात अडकवून ठेवणार आणि उत्तरेचडून मुघल फौज स्वराज्याचे लचके तोडणार याचसाठी औरंगजेबाला आमंत्रण दिले आहे. राजे वेढ्यात अडकले असतांना, स्वराज्यावर आक्रमण करुन जेवढा जिंकता येईल तेवढा मुलूख जिंकावा. हा जिंकलेला मुलूख जरी आदिलशाहिचा असला तरी तो मुगलांना देण्याचे आश्वासन दिले गेले आहे."

              

वेळेवर खबर न मिळाल्याने, आपलं हे अपयश राजेंच्या जीवावर बेतू शकते. या संकटाने नाईक फारच चिंताग्रस्त झाले.

            

हे संकट अफझलखानापेक्षाही मोठं आहे. दोन शत्रूंच्या आघाडीवर लढण्याइतकी आपली फौज नाही. जिवाजी पहिल्यांदाच नाईकांना एवढं हतबल झालेलं बघत होता. 


दोन्ही गनिमांवर एकाचवेळी मात करण्याचा मार्ग लवकर शोधावा लागेल.!


विजापुरातील हेरांना व जिवाजींना महत्वाच्या सूचना देऊन, नाईक तात्काळ पन्हाळगडी पोहोचले. तोवर सिद्दीने युध्दाचा पवित्रा न घेता गडाला चारही बाजूने मजबूत वेढा दिला होता. बाहेरुन कोणी आंत जाऊ शकणार नाही व आतून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही इतका मजबूत वेढा आवळला होता. किल्ल्यास असणाऱ्या प्रत्येक दरवाजा जिथे येत होता त्या प्रत्येक दरवाजासमोर बंदूकधारी तैनात केले होते. राजेंपर्यंत पोहोचण्यास नाईकांना फारच परिश्रम करावे लागले. त्यांनी बंदुकधार्‍यांमधे आपले हेर पेरुन, स्वतः बंदुकधारी शिपायात मिसळून, दुपारच्या कडक उन्हात एका मोठ्या झाडाखाली विश्रांती घेत सुस्तावलेल्या सैन्यांची नजर चुकवून, गडाच्या एका दरवाज्याजवळ पोहोचले. तिथे असलेल्या आपल्या माणसांना खरी ओळख देऊन राजेंपर्यंत पोहोचले.

              

राजेंना मुजरा घालून, नाईक म्हणाले,

"राजे, माझ्या पथकाच्या पहिल्या अपयशाबद्दल क्षमा करावी." त्यांचे सांत्वन करत राजे म्हणाले, 

"नाईक, नेहमी यश मिळेलच अस नाही. असो, जे घडून गेले त्याला इलाज नाही. जौहर वेढा देणार ही खबर जरी उशीरा मिळाली तरी औरंगजेबच्या आक्रमणाची वार्ता वेळेआधी मिळाली त्यामुळे आपल्याला नक्की यश मिळेल. नाईक, निराश नका होऊ. आपले पथक अद्भुत आहे." त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचा राजे प्रयत्न करीत होते.

"चिंता नका करुं. आपण गनिमी काव्याने दोन्ही शत्रूंचा सामना करुन मात करुं. आतां फक्त गडाबाहेर निघायचे नियोजन करा. आपल्या बहिर्जी पथकाच्या ५०-५० योध्याच्या तुकड्या स्वराज्याच्या उत्तर भागात तैनात ठेवा." 

" जी राजे!" 

                

हैदरनेही वेगाने हालचाली करुन, शाइस्ताखानने कोणत्या सरदारांना खलिते पाठवले ही माहिती काढून नाईंकांना पाठवली. 


नुकत्याच एका मोठ्या राक्षसाचा वध केला व बरीचशी भूमी जिंकून स्वराज्यास जोडून रयतेला सुव्यवस्थेच्या छत्रछायेत घेत नाही तोच ह्या भयानक आव्हानाला सामोरे जावे लागत होते स्वराज्याला !!! 

              

सिद्दी जौहरच्या वेढ्यात शिवाजीराजे अडकल्यावर, औरंगजेबाने आपला मामा शाईस्तेखानाला स्वराज्य नेस्तनाबूत करण्यास पाठविले. स्वराज्यावर मुगलांची ही पहिलीच मोहिम होती. औरंगजेबने हा पहिलाच प्रहार पूर्ण ताकदीने करण्याचे ठरविले. शाइस्तेखानाच्या सोबत अत्यंत कर्तृत्ववान सरदारांना ससैन्य दौलताबादेत पोहचण्याचे आदेश दिले.

             

हे सर्व सरदार दौलताबादेस पोहोचण्याआधीच त्यांची सर्व माहिती बाजी शिरवाळकर उर्फ हैदरच्या हाती लागली. शाईस्तेखान स्वराज्यातील कोणत्या किल्ल्यावर केव्हा, कसे आक्रमण करेल ही माहिती पण त्यांनी मिळवली. तसेच तो सुपे मार्गे आधी कोकणवर आक्रमण करुन राजगडाच्या आजूबाजूचा मुलूख ताब्यात घेऊन, स्वराज्यापासून राजगडाला तोडून स्वराज्यावर हल्ला करायचा आणि जिजाऊसाहेबा समवेत शंभूराजेंना संपवण्याचा बेत असल्याची खबर हेर खंडेरावांकरवी नाईकांना पाठवली.

             

शिवराळच्या रस्त्याला लागून गावापासून लांब एक दर्गा होता. दर्ग्यावर हिरवी चादर ओढून त्यावर गुलाबाची फुले वाहिलेली दिसत होती. हा दिखावा होता. वास्तविक ते ठिकाण बहिर्जी पथकाचे प्रमुख मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र होते. नाईकांना मिळालेली माहिती राजेंना पोहोचती करून ते आता  इथे आले होते. पुढील कार्य नाईक आपल्या साथीदारांच्या सोबतीने कसे करायचे -- यावर विचारविनिमय करण्यासाठी  प्रमुख हेरांची बैठक बोलावली होती.

         

क्रमशः🙏🙏🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

                 

भाग - ६३.

             

दर्ग्याच्या मागच्या बाजूस मौलवींसाठी

बनवलेल्या एका खोलीत म्हणजे हेरांच्या विशेष खलबतखान्यात प्रमुख हेर जमा झाले. नाईक बोलू लागले...

"आपल्या स्वराज्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. राजे वेढ्यात अडकले आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच आता शिवाजीराजे बनून हे संकट निवारण करुन, स्वराज्य सांभाळायचे आहे. शाहिस्तेखानाचे नियोजनानुसार तो प्रथम कोकणपट्टी ताब्यात घेऊन मराठा आरमार उध्वस्त करणे व राजगडच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकून, राजधानीला वेढा देण्याचा त्याचा मनसुबा दिसतोय. तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. त्याचे सैन्य अफाट असले तरी तो तुकड्या-तुकड्यांमधेच स्वराज्यात वेगवेगळ्या भागात आक्रमण करणार हे आपल्यासाठी सोयीचे आहे. आपणही तुकड्यांमधे विभाजित होऊन, राजेंच्या सैन्याला गुप्तपणे मदत करायची आहे आणि बुध्दीचातुर्याने शत्रूचे मनोबल खच्ची करायचे आहे. दुसरं महत्वाचं कार्य  राजेंना वेढ्यातून बाहेर काढणे. राजे बाहेर आले की, एकाचवेळी शाहिस्तेखान आणि आदिलशाहीचा पराभव ठरलेला आहे."

      

"माझ्या शूर योध्यांनो राजेंचा आपल्याविषयी असलेला सार्थ अभिमान व विश्वास आपण उंचावायचा आहे. आपण सर्वच जाणून आहोत कार्य किती अवघड आहे. पण तुम्हा सर्वांमधे ती क्षमता आहे. तुम्ही सारेच परिपक्व आणि हेरगिरीत मुरलेले असून सक्षम आहात."

        

"राजे दोन्ही शत्रुंवर कारवाई तर करणारच पण या गुप्त साथीदारांशिवाय अवघड पण आहे." या ठिकाणी एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ती म्हणजे पन्हाळ्याचा वेढा हे आदिलशाही आक्रमण होते आणि त्याचा लाभ औरंगजेब घेऊ पहात होता. त्याचसाठी त्याने शाहिस्तेखानास स्वराज्यावर चालून जायचा हुकूम दिला होता. अफझल स्वारीच्या वेळी मोगलशाही तटस्थ राहिली होती. कारण शिवाजी आणि आदिलशाही (अफझल) दोघेही त्याचे शत्रूच ! कोणीही कोणालाही संपवले तरी त्यास तेच हवे होते. *** आत्तादेखील पन्हाळ्यास आदिलशाहीने वेढा घातलाय. राजे अडकून पडलेत. पण शाहिस्तेखान मोगलाईतर्फे आदिलशाहिच्या मदतीस येत नाहीये. फक्त इतर मुलुखातच लुटालूट करतोय. म्हणजे या दोन्ही "शाह्या" एकत्र येणार नाहीत हे जसे राजेंच्या पारखी नजरेने हेरले -- तसेच नाईकांनी पण विचार केले आणि अगोदर राजेंच्या सुटकेबद्दल ते बोलत आहेत. 

    

सुरू असलेल्या बैठकीत सावजी म्हणाले --

"नाईक, आपले हेर किनारपट्टी भागात अधिक सक्षम झाले असल्यामुळे मराठ्यांचे आरमार उध्वस्त नाही होऊ शकणार."

       

या सावजींवर आधीपासूनच किनारी भागाची जबाबदारी होती. त्यांनी नुकतीच आपल्या साथीदारांच्या साह्याने ६० स्त्रियांची हबश्यांच्या  तावडीतून सुटका करुन त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले होते. त्यातील कांही स्त्रिया बहिर्जी-पथकाशी जुडल्या. त्यातील कांहीजणी बहिर्जी पथकाला बातम्या पुरवत होत्या तर कांही बाजहेरांना सहकार्य करीत होत्या. शाहिस्तेखानापासून आरमाराचे रक्षण करण्याची जबाबदारी सावजीवर सोपवली गेली होती. 

            

रायजीला नाईक म्हणाले -- 

"शाहिस्तेखान दौलताबादवरुन (म्हणजे सध्याचे औरंगाबाद/संभाजीनगर) निघाल्यावर राजगडापर्यत पोहोचतांना वाटेतील तो ज्या ज्या किल्ल्यावर आक्रमण करेल ते हाणून पाडायचे. बाज योध्यांच्या तुकड्या तुम्हाला नीळकंठराव पुरवतील. शत्रु-सैन्याचे मनोबल खचवावे, ज्यामुळे स्वराज्य सैनिकांना लढणे सोपे होईल. मी आणि विश्वासराव राजेंना वेढ्यातून काढण्याचा प्रयत्न करणार."

             

शाहिस्तेखानने बोलावलेले सर्व सरदार ससैन्य दारुगोळ्यासह दौलताबादेत दाखल झाले. दूरवर सैन्याचे तंबू पडलेले होते. त्याने किल्ल्यावर दरबार भरवला, दरबारात ४६ सरदार व एक महापराक्रमी रणरागिणी पंडिता सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबाघनही होती. एका युध्दात ती औरंगजेबाकडून लढली होती आणि त्या  युध्दात तिच्या डोळ्यासमोर पुत्र मारला गेल्यावरही ती त्वेषाने लढतच होती. मुगलसैन्याचे नेतृत्व करणारी ती एकमेव हिंदु स्री होती. तिच्या पराक्रमाने प्रभावित होऊन औरंगजेबने तिला "रायबघन" किताब दिला होता.

        

शाहिस्तेखान बोलू लागला...

"औरंगजेबांच्या आदेशाने आपल्याला 

दक्षिण काबीज करुन, शिवाजींचा आणि आदिलशाहीचा मुलूख जिंकून; मोगल सल्तनशी जोडायचा आहे. आदिलशाहीच्या मदतीने आधी शिवाजींला पराभूत करुन, खिळखिळ्या झालेल्या आदिलशाहीस मोगल सल्तनीत सामील करायचे आहे. यह आक्रमण हमे बिना रुके करना है। उद्यापासूनच या आक्रमणाला सुरुवात होईल." एकाचवेळी शिवाजींच्या मुलुखात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आक्रमणातील चौथाई लूट आपल्या सैनिकांना मिळेल."


ही जुनीच पध्दत आणि या लोभापायी अधिक अमानुष विध्वंस करीत मोगली फौज स्वराज्यात घुसली. शाहिस्तेखानाचा; बैठकीतील शब्द न् शब्द शिवाजीराजेंना कळविण्यात आला होता.

              

नाईक आणि विश्वासराव  पन्हाळगडाजवळ पोहोचले. ते राजेंना वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होते. एका दरीत दोघेही उभे होते. पहाडावरुन पडलेल्या शिळा पसरल्या होत्या. पाणी नव्हते तरी एक एक पाऊल टाकणे देखील अतिशय जिकीरीचे होते. सिद्दीच्या छावण्या चारही बाजूनी पसरल्या होत्या. हा भाग सुध्दा दुर्लक्षित नव्हता. पण बरेच दिवसांपासून वेढा पडलेला असल्यामुळे या भागात किंचित शिथिलता आली होती. राजेंकरितां हाच अवघड मार्ग नाईकांनी ठरवला.


"पण नाईक, राजे विशाळगडाकडे निघतील तेव्हा सिद्दीची माणसे पाठलाग नाही करणार का?" 

"बरोबर आहे तुमचे! सटीक योजना आखण्यासाठी राजेंशी चर्चा करायला गडावर जाऊन राजेंची भेट घ्यावी लागेल."

       

क्रमशः🙏🙏🙏🙏🙏

!!!  बहिर्जी नाईक  !!!

                

भाग - ६४.

               

गडावर जाण्यासाठी एक निसरडी अरुंद वाट उत्तरेकडील घळणीतून  होती. पण पावसात तिच्यावरुन जाणे म्हणजे जिवावरचा खेळच होता. पण सध्या तरी ती एकच थोडी दुर्लक्षित वाट होती.


"विश्वासराव हे आपलं प्रात्याक्षिक समजू या. याच वाटेने राजेंना आणावे लागणार आहे. योगायोगाने या वाटेवर काटेरी झुडपांचे रान माजल्यामुळे गस्तकर्‍यांचे लक्ष जाणार नाही." राजेंविषयीची चिंता विश्वासरांवाच्या मुखावर बघून, नाईक म्हणाले ; 

"राजेंना व आम्हाला अशा दुर्गम वाटांवरुन चढउतार करण्याची आदत आहे. मग दोघेही त्या दुर्गम वाटेवरुन जात एकदाचे दिंडी दरवाजाजवळ पोहोचले. दिंडी दरवाजावर आल्यावर, पहारेकर्‍याने दोघांना दोरखंडात जखडून राजेंसमोर उभे केले. 

   

काही इतिहासकारांच्या मते महादेव नांवाचा हेर उत्तरेकडच्या घळणीतून / दरीतून संन्याशाच्या वेषात वर पोचला होता. अर्थात तोही बहिर्जी पथकातलाच होता. बहुधा बहिर्जी अगोदर आणि हा महादेव नन्तर पोचले असावेत असा तर्क आहे. कारण नन्तर दोघांचे संभाषण काही बखरीतून दिले आहे. *** ते कसंही असलं तरी हेर वरपर्यंत गेले होते एवढं महत्वाचं ! आता बहिर्जी आणि विश्वासराव वर कसेबसे जाऊ लागले तेव्हां विश्वासरावांना एक चिंता सतावत होती की; ते स्वतः आणि बहिर्जी दोघेही प्रशिक्षित हेर, कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता असून देखील, त्यांना एकएक पाऊल उचलणे कठीण जात होते. मग राजेंना अशा अवघड वाटेवरुन आणणे म्हणजे केवढा मोठा धोका पत्करणार होते? पण नाईकाचे सहाय्यक (मदतनीस/हेल्पर) असल्यामुळे त्यांचे सारे आदेश निमूटपणे पाळणे त्यांना आवश्यक होते.

            

गडकरी  डोळ्यात तेल घालून गडावर पहारा देत होते. असाच कडक पहारा जौहरच्या पहारेकर्‍यांचा पण होता. तरी देखील हे दोघे जौहरचा पहारा चुकवून किल्ल्यात दाखल झाले होते.

                

पहारेकर्‍यांनी दोघांना राजेसमोर आणले. राजेंना ते पहारेकरी म्हणाले  

"महाराज, ही दोघेही मराठा दिसतात पण जौहरने यांना घातपात करण्यास पाठविले असण्याचा संभव असू शकतो. यांचेजवळ खंजीर आणि बिचवा आहे." 

राजेंनी दोघांना निरखून पाहिले. नाईकांच्या कमरेत खोचलेल्या शिवतीर्थ खंजीरावर त्यांची नजर पडली. राजेंनी पहारेकर्‍यास जायला सांगितले; तेव्हां त्याची मनःस्थिती द्विधा झाली. या सशस्त्र दोघांबरोबर महाराजांना एकटे ठेवण्यास तो हिचकतांना बघून राजे म्हणाले, 

"ही आपलीच माणसं आहे. यांना ताबडतोब दोरखंडातून मुक्त करा आणि आता आम्हाला सर्वाना एकांत द्या." 

              

राजाज्ञेने दोघे आसनस्थ झाल्यावर, राजेंनी विचारले, 

"तुम्ही दिंडी दरवाजातून प्रवेश केला तेव्हां शत्रूने बघितले तर नाही? " 

"गडापर्यंत कसे पोहोचायचे हा रस्ता शोधून आलो." आणि नाईकांनी  रस्त्याची संपूर्ण माहिती देऊन ते म्हणाले, 

"मसईच्या रस्त्यावर शत्रूचा पहारा किंचित शिथिल आहे, कारण त्यांना खात्री असावी या अवघड वाटेने कोणीच कधीच जाऊ शकणार नाही. त्यामुळे हाच एकुलता एक मार्ग निवडला." 

राजेंनी सहमती दर्शविली. मसईच्या पुढे गेल्यावर चोपवाडी, कर्पेवाडी, म्हसवडे, पांढरेपाणी व घोडखिंड पार करुन विशाळगडावर आपण जाऊ शकतो." 


"पण राजे, मार्ग अत्यंत घातक आहे,"  मधेच विश्वासराव म्हणाले. आणि राजेंनी हसून विचारले ---

"जौहरपेक्षा ?" 

विश्वासरावांच्या मनातील सारे संशय फिटले आणि तोच मार्ग निश्चित झाला.

"विशाळगडावर सूर्याजी सुर्वेचा वेढा आहे. त्याला गाफील ठेवून, आम्ही पोहोचेपर्यंत आत असलेल्या आपल्या सैन्यांना त्याचेवर आक्रमण न करण्याच्या सूचना आपल्या हेरांकरवी त्यांना द्या." 

"राजे, सूर्याजीची काळजी नाही. पावसाळा सुरु झाला की, दर्‍यांमधून चालणे अत्यंत जिकीरीचे होईल, हीच मोठी अडचण आहे."

              

"पावसाळा सुरु झाला की, जौहरच्या पहार्‍यात थोडी तरी शिथिलता येईल त्यात आपल्या रणनीतीची भर घालून त्यांना आणखी गाफील करुन अशी परिस्थिती निर्माण करु की, आपण विशाळगडी पोहोचेपर्यंत सिद्दीला संशय येणार नाही." 

योजना उत्तम होती पण प्रश्न होता दर्‍यांमध्ये  साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा ! 

"नाईक, संकट तर चोहोबाजूंनी आहे. सामना तर करावाच लागेल." 

"होय राजे, निसटण्यास हीच वेळ अगदी योग्य आहे." 

"पावसाळा संपल्यावर, सिद्दीच्या मदतीला आदिलशहा आणखी एक लाख सैन्य दारुगोळ्यासह पाठवणार आहे. त्यावेळी किल्ला लढवणे आणखी कठीण होईल. त्याआधीच आपण हा किल्ला सोडू," 


स्वराज्यावरील दुसरे संकट  शाहिस्तेखानाचे होतेच. त्याबद्दल राजेंनी विचारल्यावर, नाईक म्हणाले,

"राजे, आपल्या योजनेनुसार कार्य सुरु आहे. आपले सैन्य आणि पथक सज्ज आहे. शाहिस्तेखानाने भिवंडी व पनवेलचा भाग काबीज केला असून एक तुकडी कोकणात पाठवली आहे; आणि स्वतः चाकणच्या किल्ल्याला वेढा घालून बसला आहे." 


टीपः- कांही दिवसांपूर्वी पावनखिंड बघितली. सव्वाशे कदम लांब; दोन्ही बाजूनी प्रचंड उभे सुळके ! आणि ही इतक्या वर्षात सुधारणा झालेल्या स्थितीत. तरी सुध्दा इतकी अवघड आहे की, खालच्या दरीपर्यंत पोहचणे अगदी दुश्वर आहे. एक-एक पाऊल जपून टाकावे लागते;  नाहीतर कपाळमोक्ष झालाच म्हणून समजा. त्यावेळच्या अविकसित स्थितीत काय हाल झाले असतील त्या वीरांचे ?

          

क्रमशः🙏🙏🙏🙏🙏

( वरील कथेचे लेखन श्रेय आम्ही घेत नाही. सदर श्रेय अज्ञाताचे आहे. आम्ही केवळ कथाकार आणि आमचे वाचक यामधील दुवा आहोत. )